तामिळनाडू राजकारणातील 'धुरंधर' ठरला थलपती विजय; अवघ्या आठ महिन्यातच टीव्हीके या पक्षाने सत्ताधारी डीएमकेचे केले पानिपत!
xtreme2day
04-05-2026 22:15:37
189063417
तामिळनाडू राजकारणातील 'धुरंधर' ठरला थलपती विजय; अवघ्या आठ महिन्यातच टीव्हीके या पक्षाने सत्ताधारी डीएमकेचे केले पानिपत!
बंगळुरू (विशेष प्रतिनिधी) - तमिळनाडू विधानसभा निवडणूक २०२६ चा मोठा उलटफेर करणारा निकाल लागला आहे. तमिळनाडूत गेली अनेक दशके सुरू असलेला राजकीय DMK आणि AIADMK चा ट्रेंड उद्ध्वस्त झाला आहे.
अभिनेता विजय_थलपती च्या अवघ्या आठ महिन्याचा TVK पक्षाने सत्ताधारी डीएमके पक्षाचे पानीपत केले आहे.
विजय थलापतीने तमिळनाडूत आता वेगळा पर्याय हवा असं म्हणत ज्यावेळी त्यानं पक्ष स्थापन केला त्यावेळी त्याने आपल्या पक्षाचे नाव तमिलगा वेट्टरी कझगम (Tamilaga Vettri Kazhagam) असं नाव ठेवलं. तमिळनाडूमधील इतर पक्षांप्रमाणेच याचा शॉर्टफॉर्म (TVK) सर्वाधिक जास्त लोकप्रीय झाला.
तमिलगा वेट्टरी कझगम याचे इंग्रजी भाषांतर हे तमिळनाडू व्हिक्टरी फेडरेशन असा होतो. याची स्थापना अभिनेता विजय थलापतीने २ फेब्रुवारी २०२४ रोजी केली होती. हा पक्ष तमिळ नाडू आणि पाँडेचेरी या राज्यात कार्यरत आहे.
थलपती विजय याचं पूर्ण नाव सी. जोसेफ विजय आहे. हा तामिळ चित्रपटसृष्टीतील एक सुपरस्टार अभिनेतेत्यासह गायक आणि राजकीय नेता सुद्धा आहे. तो तामिळ सिनेमातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानला जातो आणि त्याला चाहत्यांमध्ये "थलपती" म्हणून ओळखलं जातं.
थलापती विजय हा दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहे. तो एक अभिनेता असण्यासोबतच तो एक राजकारणी देखील आहे. विजयने १९९२ मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. तेव्हापासून त्याने अनेक हिट चित्रपट दिले असून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. कालांतराने त्याने राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला.
राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या विजय यांचे वडील एस. ए. चंद्रशेखर हे चित्रपट दिग्दर्शक आहेत. त्यांनीही राजकीय पक्ष, राजकीय संघटना बांधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना त्यात फारसं यश आलं नाही. त्यांच्या मुलानं मात्र पहिल्याच फटक्यात तामिळी राजकारणातल्या धुरंधर नेत्यांना चारी मुंड्या चित केलं आहे. प्रस्थापित नेत्यांवर सातत्यानं होणारे भ्रष्टाचाराचे आरोप आणि विजय यांची कोरी राजकीय पाटी हे समीकरण जुळून आल्यानं तामिळनाडूत हा चमत्कार बघायला मिळाला.
वयाच्या १८ व्या वर्षी विजयने नलय्या थेरपू या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात त्याचे नाव विजय होते. या नावाने त्याने ८ चित्रपटांमध्ये काम केले आहे. विजयने त्याच्या कारकीर्दीत आतापर्यंत सुमारे ६५ चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यापैकी बहुतांश चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले आहेत.
विजयचे तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. तो अनेकदा गरजू लोकांना मदत करताना दिसतो. विजय हा सर्वाधिक मानधन घेणारा तमिळ अभिनेता आहे. त्याने 'थलपथी ६५' या चित्रपटासाठी १०० कोटी रुपये मानधन घेतले आहे.
त्याचे इन्स्टाग्रामवर १०.५ दशलक्ष आणि ट्विटरवर ४.९ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
संकलन - संजीव_वेलणकर पुणे.
--//००//--
थलपती विजयने कोणत्याही राष्ट्रीय पक्षांच्या कुबड्या न घेता, अगदीच कमी वेळात स्वतंत्र प्रादेशिक पक्ष स्थापन करून स्वतःची ठळक वेगळी ओळख निर्माण करत निवडणुकीत भरघोस यश मिळवता येते, हे प्रभावीपणे सिद्ध करून दाखवले.
हीच धमक आपल्या प्रदेशिक पक्षात का नाही?
विजय आणि मी .......
माझे काही काळ वास्तव्य तामिळनाडूतील कृष्णागिरी जिल्ह्यातील कावेरीपाट्टीनम, सेलम, धर्मपुरी येथे होते.
त्या काळात मी तामिळ संस्कृतीशी पूर्णपणे मिसळलो आणि तेथील भाषा देखील आत्मसात केली. तिथल्या लोकांसाठी चित्रपट हा केवळ मनोरंजन नसून त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. चित्रपटातील गरीबांना न्याय देणारा हिरो खऱ्या आयुष्यातही तसाच असतो, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. म्हणूनच अनेक वर्षे तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेत्यांचे वर्चस्व राहिले आहे.
अशा या पार्श्वभूमीवर माझा आवडता हिरो म्हणजे विजय (थलपती विजय). त्यांचा Kadhalukku Mariyadhai हा चित्रपट पाहिल्यापासून मी त्यांचा चाहता झालो. त्या चित्रपटातील भावना, साधेपणा आणि प्रेमाची ताकद मनाला भिडणारी होती.
विजय फक्त एक सुपरस्टार नाही, तर जनतेशी जोडलेला, त्यांची वेदना समजून घेणारा कलाकार आहे, असे मला नेहमी वाटते. पडद्यावर न्यायासाठी लढणारा हा हिरो खऱ्या आयुष्यातही समाजाशी प्रामाणिक राहतो, हीच त्याची खरी ताकद आहे.
आज त्याने केवळ चित्रपट क्षेत्रातच नव्हे, तर राजकारणातही आपली छाप उमटवली आहे. Tamilaga Vettri Kazhagam (TVK) च्या माध्यमातून तामिळनाडूत मिळवलेले भरघोस यश हे त्याच्या नेतृत्वगुणांचे आणि जनतेच्या प्रचंड विश्वासाचे प्रतीक आहे.
तामिळनाडूच्या जनतेने त्याच्यावर दाखवलेला विश्वास आणि प्रेम पाहून मनापासून आनंद वाटतो. पडद्यावरचा “जनतेचा हिरो” आज वास्तवातही लोकांचा नेता म्हणून उभा राहत आहे, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल विजय यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.