देशासह महाराष्ट्रात उष्णतेची लाट; अनेक शहराचं तापमान हे 42 अंश सेल्सिअसच्याही पुढे, अकोला आणि अमरावती शहरात 45.6 !
xtreme2day
27-04-2026 21:13:21
34158306
देशासह महाराष्ट्रात उष्णतेची लाट; अनेक शहराचं तापमान हे 42 अंश सेल्सिअसच्याही पुढे, अकोला आणि अमरावती शहरात 45.6 !
पुणे (विशेष प्रतिनिधी) - देशात सर्वाधिक तापमान असलेल्या दहा शहरांमध्ये पहिल्या दोन स्थानावर महाराष्ट्रामधील शहरांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील अकोला आणि अमरावती शहरात 45.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोदं झाली आहे. या शहरातील तापमानाने यापूर्वेचे सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार भारतातील जवळपास 100 शहरात तापमानाचा रेकॉर्ड मोडला गेला आहे.
देशात सर्वाधिक तापमान असलेल्या टॉप टेन शहरांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील वर्धा शहर आहे. वर्ध्यामध्ये 45.5 अंश सेल्सिअस एवढ्या विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. तर चौथ्या क्रमाकांवर पंजाब राज्यातील फरीदकोट हे शहर असून इथे 45.2 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. पाचव्या नंबरवर हरियाणा राज्यातील रोहतक शहर असून, या शहरात उन्हाचा पारा 44.6 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. सहाव्या क्रमाकांवर ओडिशा राज्यातील झारसुगुडा शहर असून येथे 44.6 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोदं झाली आहे. तर सातव्या क्रमाकांवर गुजरातमधील सुरेंद्रनगर हे शहर आहे. या शहरामध्ये 43.8 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. आठव्या क्रमाकांवर अहमदाबाद शहर असून इथे 43.8 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. तर नवव्या स्थानावर नागपूर शहर असून दहावा क्रमांक मध्य प्रदेशमधील इंदोर या शहराचा आहे. इंदोरमध्ये 42.2 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे.
भारतीय हवामान विभागाने नुकताच उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी केला. सुर्य आग ओकताना दिसत आहे. यादरम्यान नागरिकांनी काळजी घ्यावी. अतिमहत्वाच्या कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे. दुपारी 12 ते 4 घराबाहेर निघणे टाळा. अकोला आणि अमरावती येथे 46 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान नोंदवले गेले. अमरावती, अकोला आणि वर्धा येथे भारतीय हवामान विभागाने उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी केला. अनेक जिल्ह्यांमध्ये 44 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमानाची नोंद झाली. नागपूर, बुलढाणा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला. यादरम्यान नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. उष्णघाताची समस्या निर्माण होऊ शकते. प्रशासनाकडून नागरिकांना सर्तकतेचा अलर्ट जारी करण्यात आला. राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सूचना जारी केल्या आहेत. रायगड जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता आणखी वाढली असून तापमान थेट 38 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने आजसाठी रायगडमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला आहे. साधारण 26 ते 27 अंशांदरम्यान असणारे तापमान अचानक वाढून 38 अंशांवर गेल्यामुळे नागरिकांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा प्रचंड कहर पाहायला मिळत आहे. पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव या तिन्ही तालुक्यांमध्ये तापमानाने 43 अंशांचा टप्पा गाठला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वाढत्या तापमानामुळे रस्ते अक्षरशः निर्मनुष्य झाल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये आणि बाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यात सध्या उष्णतेचा प्रचंड कहर पाहायला मिळत असून तापमानाने तब्बल पुन्हा 43 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. एप्रिल महिन्यातच उष्णतेने धोक्याची पातळी ओलांडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दुपारच्या वेळात उकाड्याची तीव्रता एवढी वाढली आहे की रस्त्यांवर अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळत आहे. वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून उष्माघाताचा धोका देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पार पोहोचला आहे. याचा मोठा परिणाम दैनंदीन कामकाजावर होताना दिसत असून, रस्ते आणि बाजारपेठेत शुकशुकाट पहायला मिळत आहे. परभणीमधून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे परभणीत उष्मघातामुळे पहिला बळी गेला आहे. नाशिक येथून परभणीत भावाकडे आलेल्या 37 वर्षीय व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. परभणीच्या नांदखेड रोड भागात ही घटना घलडी आहे. शिवाजी बबन कांबळे वय 37 असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेनंतर शिवाजी कांबळे यांच्या भावाच्या फिर्यादीवरू नानलपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अकोला जिल्ह्यात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट पहायला मिळत आहे. आज अकोला जिल्ह्यामध्ये 44 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. शनिवारी अकोल्यातील तापमानाने 45.6 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे देशातील सर्वाधिक तापमानाचा विक्रेम नोंदवला गेला. आजही त्याच धर्तीवर उष्णतेचा कडाका कायम असून पुढील तीन ते चार दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कडक उन्हातही वाहतूक पोलीस कर्तव्य बजावताना दिसत असून त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे. दरम्यान, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. बाहेर पडताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा गॉगल वापरणे, तसेच पाण्याची बाटली सोबत ठेवणे आवश्यक असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे. दरम्यान अकोल्याचे तापमान 44 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
पुण्याचं तापमान 40.9 अंशावर पोहोचले आहे. लोहगाव परिसरात 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. रात्रीच्या तापमानातील सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. अकोला – 45.6 अंश सेल्सिअस, अमरावती – 45.6 अंश सेल्सिअस, भंडारा – 44.0 अंश सेल्सिअस, बुलढाणा – 42.2 अंश सेल्सिअस, चंद्रपूर – 44.2 अंश सेल्सिअस, गडचिरोली – 43.6 अंश सेल्सिअस, गोंदिया – 43.6 अंश सेल्सिअस, नागपूर – 44.2 अंश सेल्सिअस, वर्धा – 45.5 अंश सेल्सिअस, वाशीम – 43.0 अंश सेल्सिअस आणि यवतमाळ- 43.0 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.