एका युगाचा अंत! अजरामर गीतांना स्वर देणाऱ्या आशा भोसले यांचं निधन!
xtreme2day
12-04-2026 19:36:00
378036718
एका युगाचा अंत! अजरामर गीतांना स्वर देणाऱ्या आशा भोसले यांचं निधन!

गेली सात दशके आपल्या गाण्याने संगीत क्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या, आपल्या आवाजाने प्रत्येक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या चिरतरुण ...चतुरस्त्र गायिका #आशा_भोसले यांचे आज (१२ एप्रिल २०२६ रोजी) निधन झाले.
आशा भोसले यांचा अल्पपरिचय.
जन्म. ८ सप्टेंबर १९३३
शेवट पर्यत एखाद्या विशीतल्या तरुणाला मागे पाडेल, एवढी प्रचंड ऊर्जा, लगबग त्यांच्यात होती . ९३
व्या वर्षीही त्यांच्यात गाण्याची, स्वर उंचावण्याची क्षमता एवढी आहे की, ऐकणारे थक्कच होतील. ‘ऐंशी वर्षांची म्हातारी बुढी अन् वय काय सांगते सोळा? आंधळा मारतो डोळा...’ या दादा कोंडकेंच्या गाण्यातील मर्म आशाताईंनी कर्तृत्वाने सार्थ करून दाखवले आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे नाव संगीतविश्वात मोठ्या आदराने घेतले जाते. या झगमगत्या जगात त्यांनी सात दशकांहून अधिक काळ उत्कृष्ट आणि अगणित काम करून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते. आशा भोसले यांनी प्रत्येक शैलीतील खोडकर आणि रोमँटिक गाणी गाऊन इंडस्ट्रीत मोठे स्थान मिळवले. आशा भोसले यांच्या सुरांना जी ‘शार्प धार’ होती , जे माधुर्य होते, शब्दफेकीची अनोखी नजाकत आहे, ते अन्य कोणत्याही गायिकेकडे नाही. गाण्यांची जेवढी व्हरायटी; मग ते शास्त्रीय गीत असो, गज़ल असो, मादकगीत असो, भक्तिगीत-भावगीत असो, पॉपगीत-कॅबरेगीत असो,लावणी-ठुमरी असो वा कव्वाली असो; सादरीकरणाची खास शैलीतील विलक्षण हातोटी आशा भोसलेंनी जोपासली होती, जी अन्य कुठल्याही गायिकेच्या वाट्याला आली नाही, याची पावती तर दस्तुरखुद्द लतादीदीही देत असत ! स्वतंत्र छाप आशाताईंनी संगीत विश्वााच्या सुरील्या दुनियेत उमटवली, तेही लतादीदींसह शमशाद बेगम, गीता दत्त, नूरजहॉं, सुरैया यांसारख्या पट्टीच्या गायिका फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असताना! सर्वांत मोठी गोष्ट अशी की, आशा भोसले यांना वैवाहिक जीवनात, चित्रपटसृष्टीत जो संघर्ष करावा लागला, तेवढा अन्य कुठल्याही गायिकेला नाही! ‘मेलोडी क्वीन’ आशाताई यांचा सहा दशकांचा प्रवास अतिशय संघर्षपूर्ण, खडतर असाच राहिला. प्रारंभी अतिशय वाईट दिवस त्यांनी आयुष्यात अनुभवलेले आहेत. वयाने जवळपास दुप्पट असलेल्या ज्या व्यक्तीवर नितांत प्रेम केले व लतादीदींसह घरातील सर्वांचाच कडाडून विरोध असताना त्यांचा रोष पत्करून आयुष्याचा जोडीदार म्हणून घरातून पळून जाऊन ज्याची मोठ्या विश्वासाने निवड केली, त्याच्याचकडून म्हणजे गणपतराव भोसले यांच्याकडून विश्वाशसाला तडा गेल्यानंतर जिव्हाळ्याचे सर्वच लोक गमावल्याचे जे दिवस आशाताईंनी अनुभवले व त्यानंतरही त्या न डगमगता कुणाच्याही सहकार्याविना केवळ आपल्या गानकौशल्याच्या बळावर ज्या धीरोदात्तपणे उभ्या राहिल्या आणि प्रचंड यशस्वी झाल्या, त्याला खरोखरच तोड नाही! ‘संघर्षाचं प्रतीक’ म्हणूनही आशाताईंकडे पाहिल्यास ते वावगं ठरणार नाही. कारण ती वस्तुस्थिती आहे. त्यांच्या जागी अन्य दुसरी कुठलीही महिला राहिली असती, तर कदाचित कधीच आत्महत्या करून मोकळी झाली असती. कारण, पदरात दोन मुले टाकून व गर्भात एक बाळ सोडून गणपतराव भोसले व त्यांचे बंधू आशाताईंच्या जिवावर उठले होते.अतिशय घाणेरडी वागणूक मिळाल्याने आशाताईंनी ६० साली गणपतराव भोसले यांच्याशी घटस्फोट घेतला होता, हा सत्य परंतु कटु असा खाजगी इतिहास आहे. आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याच स्वीय सचिवासोबत लग्न केले म्हणून संपूर्ण मंगेशकर कुटुंबाच्या कर्त्या करवित्या लतादीदी यांचीही साथ-जिव्हाळा त्या गमावून बसल्या होत्या. गणपतराव हे लतादीदींचे स्वीय सचिव होते. लग्नाच्या वेळी आशाताईंचं वय १६ तर गणपतराव ३१ वर्षांचे होते. अशा कठीण दिवसांत आशाताईंनी कारकीर्द घडवायला प्रारंभ केला तेव्हा त्यांना अनेक खडतर, कटु अनुभवांचा सामना करावा लागला. कुणी गाणे गाण्याची संधी देत नसत, अन्य गायिकेने नकार दिलेली गाणी त्यांच्या वाट्याला येत असत, अल्प मानधनावर त्यांना टुकार गाणी गावी लागत असत. बी ग्रेड, सी ग्रेड नायिकांवर चित्रित असलेली गाणी त्यांना गावी लागत असत. हे सर्व आशाताईंच्या वाटेला प्रारंभी येत गेलं व आशाताईंनीही नशिबाचे भोग समजून ते स्वीकारलं. स्वीकारण त्यांना भागच होतं, परिस्थितीच तशी होती! मात्र त्यांनी, मिळालेल्या या प्रत्येक संधीचं सोन्यात रूपांतर केलं, असं की ‘देखनेवाले देखतेईच रह्य गये!’ प्रत्येक गाणं तन-मन ओतून असं काही तडाखेबाज गायलं की बस्सं! आशाताईंच्या वाईट दिवसांमध्ये गुरुदत्त यांची पत्नी गीता दत्त, शमशाद बेगम, लता मंगेशकर या फिल्म इंडस्ट्रीतील टॉपच्या गायिका होत्या. पुढे पंचमदांची साथ मिळाल्यानंतर आशाताईंनी एकापेक्षा एक अशा गाण्यांची ज्या गोडव्याने बरसात केली, त्याने ‘चिंब’ झालेले रसिकमन कधीच ‘कोरडे’ आजही होत नाही. लावणी, भावगीतं-भक्तिगीतं, गज़ल, पॉप, उडत्या चालीतली गाणी, लोकगीतं, कव्वाली, रवींद्र संगीत आदी सर्वांमध्ये आशाताईंनी अमिट मुद्रा उमटवली.
१९४३ साली ‘माझा बाळ’ या चित्रपटात दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘चला चला नव बाळा...’या गाण्याने आशाताईंनी चित्रपट गायनाला प्रारंभ केला होता. ४८ साली हंसराज बहल यांच्या ‘चुनरियॉं’ या चित्रपटात ‘सावन आया...’हे गीत गाऊन आशाताईंनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.५३ साली बिमल रॉय यांनी ‘परिणीता’साठी आशाताईंना संधी दिली, ५४ साली राज कपूर यांनी ‘बूट पॉलिश’मध्ये मोहम्मद रफी यांच्यासोबत ‘नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुठ्ठी मे क्या है...’ गायला दिलं. पुढे ओ. पी. नय्यर यांनी ५६ साली ‘सीआयडी’साठी संधी देऊन आशादीदींच्या पदरात मोठं यश दिलं.
५७ साली ‘नया दौर’मध्ये ओपींच्या उडत्या चालीवर रफीसाहाबसोबतचं ‘मॉंग के साथ तुम्हारा’, ‘उडे जब जब जुल्फे तेरी’, हेमंतकुमार यांच्या संगीतातलं ‘जागृती’मधलं ‘दे दी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल’, सी. रामचंद्र यांचा संगीतसाज आणि भरत व्यास यांनी रचलेलं ‘नवरंग’मधलं ‘आधा है चंद्रमा रात आधी’, ‘तू छुपी है कहॉंऽ मै तडपता यहॉं’, जयदेव यांचं संगीत असलेलं देव आनंद-साधनावरचं ‘हम दोनो’मधलं रोमॅण्टिक ‘अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही’, ‘काला पानी’तलं देव आनंदला विनंती करणारं मधुबालाचं ‘अच्छा जी मै हारी चलो मान जाओ ना’,मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं ‘मेरा साया’तलं ‘झुमका गिरा रे’, ओपी-कमर जलालाबादींचं ५८ सालच्या ‘फागून’मधलं ‘एक परदेसी मेरा दिल ले गया, जाते जाते मिठा मिठा गम दे गया’, ‘तिसरी कसम’चं लोकगीतं ‘पान खाये सैया हमारो, सावली सुरतीयॉं होठ लाल लाल’, ‘किस्मत’मधलं शमशाद बेगमसोबतचं ‘कजरा मोहोब्बतवाला अखियों मे ऐसा डाला’, ‘पेईंग गेस्ट’मधलं चुलबुल्या नूतनला देव आनंद छेडतो तेव्हाचं ‘छोड दो आँचल जमाना क्या कहेगा’, ‘वक्त’मधलं ‘आगे भीऽ जाने ना तूऽ,पिछे भी जाने ना तू, जो भी है, बस यही एक पल है’, कोंबडी पकडणार्याव ‘बांगडू’ किशोरदांसोबतचं ‘हाल कैसा है जनाब का’, ‘हावडा ब्रिज’मधलं ‘आईयेऽ मेहरबॉं’, झीनतवरचं ‘हरे रामा’तलं ‘दम मारो दम’, ओपींचं ‘चॉंद उस्मानी-किशोरदां यांच्यावरचं ‘बाप रे बाप’मधलं ‘पिया पिया पिया मोरा जिया पुकारे, हम भी चलेंगे सैया संग तुम्हारे’, शहरयार यांनी रचलेलं खय्याम यांनी संगीत दिलेलं ‘उमराव जान’मधलं ‘इन आँखो की मस्ती के, मस्ताने हजारों है’, ‘ये क्या जगहा है दोस्तो, ये कौनसा दयार है’, ‘तुमसा नही देखा’तलं ‘सर पे टोपी लाल, हाथ मे रेशम का रूमाल, हो तेरा क्या कहना’, ‘एक मुसाफिर एक हसीना’तलं ‘बहुत शुक्रिया बडी मेहरबानी’, नासिर हुसेन यांच्या ‘तिसरी मंझील’मधलं अतिशय गोड ‘ओ मेरे सोना रे सोना रे सोना रे, दे दुंगी जान जुदा मत होना रे’, ‘ओ हसीना जुल्फोवाली जानेजहॉं’, ‘आजा आजा मै हू प्यार तेरा’, ‘आदमी और इन्सान’मधलं ‘जिंदगी इत्तफाक है’, ‘अनहोनी’मधलं ‘मैने होठो से लगाई तोऽऽ हंगामा हो गया’, ‘बांगडू’सोबतचं ‘आशा’मधलं ‘इना मिना डिका’, ‘काश्मीर की कली’तलं ‘इशारों इशारों मे दिल लेनेवाले’, गुलजार यांचं ‘मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है’, हेलनच्या बहारदार नृत्यावरचं ‘कारवॉं’तलं ‘पिया तू अब तो आजा’, ‘मेरे सनम’चं ‘जाईये आप कहॉं जायेंगे, ये नजर लौटके फिर आयेंगी’, ‘ज्वेल थिफ’चं ‘रात अकेली है, बुझ गए दिये’, ‘शिकार’चं ‘पर्दे मे रहनें दो पर्दा ना उठाओ’, ‘द ग्रेट गॅम्बलर’मधलं अमिताभ-झीनतवरचं फॉरेनमध्ये होडीतलं रोमॅण्टिक ‘दो लफ्जों की हैऽऽ दिल की कहानी’,‘पुकार’मधलं ‘बचके रहना रे बाबाऽऽ बच के रहना रे’, परवीनबॉबीचं नृत्य असलेलं ‘जवानी जानेमन हसीन दिलरूबा’,‘हम किसी से कम नही’तलं ‘ये लडका हाये अल्ला कैसा है दिवाना’, ‘चुरा लिया है तुमने जो दिलको’, ‘मुकद्दर का सिकंदर’चं ‘ओ साथी रे तेरे बिना क्या जिना’, ‘लगान’चं ‘राधा कैसे ना जले’ अशी खूप मोठी गाणी आशाताईंची आहेत. मराठीत गदिमा-यशवंत देवांचं ‘उघडी नयन शंकरा, वसंत ये वनांतरी’, ‘सिंहासन’मधलं सुरेश भटांचं ‘उष:काल होता होता काळरात्र झाली’, बहिणाबाईंचं ‘अरे खोप्यामंधी खोपा सुगडिणीचा चांगला’, खेबुडकरांचं ‘सतीचं वाण’ मधलं किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला’, ‘फटाकडी’तलं नांदगांवकरांचं ‘लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा, बेंगलोर गोवा नि काश्मीरला, कुठं कुठं जायाचं हनीमूनला’, हेमंतकुमार यांच्यासोबत गायलेलं सुधीर मोघेंचं ‘हा खेळ सावल्यांचा’मधलं ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय’, पी. सावळाराम यांचं ‘भालू’मधलं ‘गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन, व्हावे मिलन’, सुधीर फडके उपाख्य बाबुजींसोबत गायलेलं खेबुडकरांचं ‘पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला, चंद्र आहे साक्षीला, चंद्र आहे साक्षीला’, भटांचं ‘चांदण्यात फिरताना माझा धरलास हात’, शांता शेळके यांनी रचलेलं ‘जिवलगा, राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे’,भा. रा. तांबेंचं वसंत प्रभूंच्या संगीतसाजातलं बाबुजींसोबत गायलेलं ‘तुझ्या गळा, माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा’, ‘शापित’ मधलं सुधीर मोघेंचं गीत. परंपरेने चालत आलेले भारतीय शास्त्रीय संगीतात प्राविण्य मिळवत असताना या संगीताच्या चौकटीत त्यांनी स्वतःला अडकवून घेतले नाही. पाश्चात्य संगीत पण तेवढ्याच सहजपणे स्वीकारले. पार्श्वगायनाच्या क्षेत्रामध्ये गायकाचे प्रमुख संगीत संयोजक म्हणजेच म्युझिक डायरेक्टर असतात. पण आशाताईंनी ओळखले की ज्या कलाकारांवर त्याचे गाणे चित्रीत होणार आहे ते पण महत्त्वाचे आहेत. म्हणून ज्या कलाकारांवर आपले गाणे चित्रीत होणार आहे त्या कलाकारांच्या चेहेरपट्टीशी आवाजाशी, बोलण्याच्या लकबिशी, उच्चाराशी इतकेच नव्हे तर बॉडी लॅन्वेजशी आपला आवाज मिळता जुळता होईल हे कौशल्य आशाताई शिकल्या. आशाताईंची सर्वच गाणी काही मोठ्या किंवा प्रसिद्ध कलाकारांवर चित्रीत झालेली नाहीत. तर त्यांची अनेक गाणी छोट्या कलाकारांवर पण चित्रीत झालेली आहेत. पण पडद्यावर ही गाणी बघताना तो कलाकार स्वतःच्याच आवाजात गात आहे असे वाटते. लोकांच्या आवडीनिवडीमध्ये होत चाललेला बदल म्हणजेच ‘मार्केट ट्रेन्ड’ मधल्या बदलाची आशाताईंना बरोबर जाणीव असायची. म्हणूनच त्या नूतन, वहिदा रेहमान, साधना, हेमा मालिनी, नर्गीस यासारख्या आघाडीच्या नायिकांबरोबरच हेलनसारख्या अभिनेत्रीलाही योग्य आवाज देऊ शकल्या. दीर्घकाळ गायन करणाऱ्या आशा भोसले यांनी वयाच्या ८० व्या वर्षी २०१३ साली अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला. आशा भोसले यांनी 'माई' या मराठी चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांना या क्षेत्रात लोकांनी खूप पसंती दिली. त्यांचा अभिनय पाहून लोकांनी हे मान्य केले की त्या एक चांगली गायिका असण्यासोबतच एक बहुगुणसंपन्न व्यक्तिमत्व देखील आहेत. हा चित्रपट आपल्या वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात सोडणाऱ्या मुलांची कथा सांगणारा होता. या चित्रपटात आशा भोसले यांनी 'माई'ची भूमिका साकारली होती, जी अल्झायमरने त्रस्त आहे आणि जिला तिची मुले वृद्धाश्रमात ठेवण्याचा निर्णय घेतात. आशा भोसले यांनी ज्या पद्धतीने ही व्यक्तिरेखा साकारली, त्यास प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यांच्या मुलांच्या भूमिका राम कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरे यांनी साकारल्या होत्या.
आशाताईंनी उत्तम पार्श्वगायिका होण्याबरोच उत्तम गृहिणी आणि उत्तम आई होण्याचे कसब पण उत्तम रितीने पार पाडले होते. त्यांच्या तिन्ही मुलांची उत्तम शिक्षणे झाली आहेत.त्यांचा मोठा मुलगा हेमंत पायलट झाला. मुलगी वर्षा उत्तम इंग्रजी पत्रकार झाली.तर धाकटा मुलगा आनंद याने बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे.आपल्या मुलांना घडवण्यामध्ये पण आशाताईंचा मोठा हात होता.
आशाताईंचा दुसरा आवडता छंद होता तो म्हणजे स्वयंपाक. मी आयुष्यात गायिका झाली नसती तर नक्कीच चांगलीच शेफ झाली असती.लोकांना चांगले खायला घातले असते.असे एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते.पार्श्वगायनाच्या छंदाबरोबर त्यांनी हा पण छंद जोपासला.निरनिराळ्या व्हेज आणि नॉनव्हेज डिशेस शिकून घेतल्या.लोकांना उत्तम संगीताबरोबरच उत्तम खाण्याचा आनंद पण द्यावा असे त्यांना वाटू लागले. याच छंदाचे रुपांतर त्यांनी उद्योग व्यवसायात केले. परदेशामध्ये ‘आशाज’ या नावाच्या रेस्टॉरन्टची सुरुवात आपला धाकटा मुलगा आनंद याच्या सहाय्याने केली. पहिले रेस्टॉरंट दुबई येथे सुरु केले.आशाताईंच्या खास रेसिपी मिळतील अशी व्यवस्था केली.आज ही किचनवर अशाताईंचे खास लक्ष असते.तिथल्या कुकना त्या स्वतः ट्रेनिंग देतात.बघता बघता हे रेस्टॉरन्ट लोकप्रिय झाले.आता त्यांची गल्फ आणि ब्रिटनमध्ये मिळून सहा रेस्टॉरन्ट्सची मालिका आहे.ब्रिटनमधल्या बर्मिन्गहॅम येथल्या रेस्टॉरन्टला तर ‘सर्वोत्तम रेस्टॉरन्ट’ म्हणून पुरस्कार पण मिळाला आहे.हा सगळा कारभार जरी त्यांचा धाकटा मुलगा आनंद बघत असला तरी मूळ कल्पना आशाताईंची आहे. यामुळे त्या आता एक यशस्वी मराठी उद्योजिका पण झाल्या आहेत. आशा भोसले यांनी आपल्या घरात फक्त गायकीच आणली असे नाही तर उद्योजकता आणि उद्यमशीलता पण आणली.मिळालेल्या पैशांची उद्योग व्यवसायात गुंतवणूक केली.
'राष्ट्रीय पुरस्कार', असंख्य 'फिल्मफेअर पुरस्कार', मध्य प्रदेश सरकारचा 'लता मंगेशकर पुरस्कार', 'महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार' आणि २००८ मध्ये मिळालेला 'पद्मविभूषण पुरस्कार' - हे पुरस्कार आशाताईंना बहाल करण्यात आले होते . सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘दादासाहेब फाळके सन्मान’ आशाताईंना २०००-२००१ मध्ये प्रदान करण्यात आला. भारत-पाकिस्तान असोसिएशनचा ‘नाईटिंगेल ऑफ एशिया’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. तसेच ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान टोनी ब्लेअर यांच्या हस्ते, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने 'जीवनगौरव पुरस्कार'ही त्यांना देण्यात आला. आशाताईनी आजपर्यंत सुमारे ९०० चित्रपटांना आवाज दिला आहे. त्यांनी आत्तापर्यंत १४ भाषांमध्ये सुमारे १२००० गाणी गायली आहेत. आशा भोसले यांच्यावर ९० मान्यवरांनी लिहिलेल्या ९० लेखांचं आणि दुर्मिळ छायाचित्रांचं *स्वरसामिनी आशा* हे पुस्तक आहे. या पुस्तकात गायक, संगीतकार, गीतकार, साहित्यिक, दिग्दर्शक, लेखक आणि कुटुंबीय अशा ९० मान्यवरांनी लिहिलेले ९० लेख, तसेच आशाताईंची दुर्मीळ छायाचित्रे आहेत.
आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
संकलन.*#संजीव_वेलणकर पुणे.*
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.