Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

इंधन पुरवठा स्थिर ठेवण्यासाठी 5 किलो एलपीजी सिलेंडरचा दैनंदिन कोटा दुप्पट; लाखो भारतीयांना फायदा!

xtreme2day   07-04-2026 23:03:07   638427221

इंधन पुरवठा स्थिर ठेवण्यासाठी 5 किलो एलपीजी सिलेंडरचा दैनंदिन कोटा दुप्पट; लाखो भारतीयांना फायदा!

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - होर्मुज सामुद्रधुनीतून होणारी जहाज वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे भारतात येणाऱ्या इंधनाच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. अशातच आता इंधन पुरवठा स्थिर ठेवण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. प्रवासी कामगारांसाठी बाजारभावाने मिळणाऱ्या 5 किलो एलपीजी सिलेंडरचा दैनंदिन कोटा दुप्पट करण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील लाखो ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. 

 

भारतात घरगुती वापरासाठी असलेल्या अनुदानित 14.2 किलो सिलेंडरच्या तुलनेत, 5 किलोच्या सिलेंडरची किंमत बाजारभावानुसार वेगळ्या प्रकारे ठरवली जाते, जी थोडी महाग असते. दिल्लीमध्ये 5 किलोच्या सिलेंडरची किंमत 549 रुपये आहे, तर 14.2 किलो घरगुती सिलेंडरची किंमत 913 रुपये आहे. 5 किलोचे सिलेंडर एलपीजी वितरकांकडून थेट विक्रीसाठी उपलब्ध असतात. यासाठी फक्त ओळखपत्र दाखवावे लागते (पत्त्याचा पुरावा आवश्यक नाही). नियमित घरगुती गॅस कनेक्शनसाठी मात्र पूर्ण KYC प्रक्रिया आवश्यक असते.

 

युद्धामुळे ऊर्जा पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याने, सरकारने घरगुती स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसला प्राधान्य दिले आहे. अनेक प्रवासी कामगारांकडे नियमित गॅस कनेक्शन नसल्याने त्यांचा ताण कमी करण्यासाठी 5 किलो सिलेंडरची उपलब्धता वाढवण्यात आली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 6 एप्रिलच्या पत्राद्वारे प्रत्येक राज्यात प्रवासी कामगारांना वितरित होणाऱ्या 5 किलो ‘फ्री ट्रेड एलपीजी’ (FTL) सिलेंडरची दैनंदिन संख्या दुप्पट करण्यात आली आहे. ही वाढ 2–3 मार्चदरम्यान झालेल्या सरासरी पुरवठ्याच्या आधारावर ठरवण्यात आली आहे. सुजाता शर्मा यांनी पुढे बोलताना सांगितले की, फेब्रुवारी महिन्यात 77 हजार FTL सिलेंडर विकले गेले होते, तर 2-3 मार्चदरम्यानची विक्री त्याहून जास्त होती. 23 मार्चपासून आतापर्यंत सुमारे 7.8 लाख 5 किलो FTL सिलेंडर विकले गेले आहेत. सोमवारी देशभरात 1.06 लाखांहून अधिक 5 किलो सिलेंडर विकले गेले असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे कामानिमित्त बाहेर राहणाऱ्या नागरिकांना सहजपणे सिलिंडर मिळणार आहेत.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती