भारतातील हजारो लोक युद्धभूमीत अडकले; महाराष्ट्रातील एका खासदारासहित, विद्यार्थ्यांचा आणि पर्यटकांचा समावेश
xtreme2day
02-03-2026 22:19:56
225762645
भारतातील हजारो लोक युद्धभूमीत अडकले; महाराष्ट्रातील एका खासदारासहित, विद्यार्थ्यांचा आणि पर्यटकांचा समावेश
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मध्य पूर्वेत युद्धाचा भडका उडाला आहे. इस्रायल आणि अमेरिका सातत्याने इराणवर हल्ले करत आहेत. त्यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. इराणकडूनही या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले जात आहे. इराणने दुबईसह आखाती देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. तसेच दुबई आणि इतर काही शहरांमधील महत्त्वाच्या इमारतींनाही लक्ष्य करण्यात आले आहे. राज्यासह देशातील हजारो लोक युद्ध भूमीत अडकून पडले आहेत. यात राज्यातील एका खासदाराचाही समावेश आहे. जालना मतदार संघाचे खासदार डॉ. कल्याण काळे दुबईत अडकले आहेत. इस्रायल आणि अमेरिका इराणवर सतत हल्ले करत आहे. इराणकडूनही या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले जात आहे.
इराणकडून दुबईसह इतरही अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले आहेत. भारतातील हजारो लोक युद्धभूमीत अडकले आहेत. यात राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी चिंता व्यक्त केली असून या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी सरकारकडे विनंती केली आहे.
पुणे येथील एका महाविद्यालयाची शैक्षणिक सहल दुबई येथे गेलेली आहे. मात्र दुबईत निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत सहलीत गेलेले 80 विद्यार्थी दुबईत अडकून पडलेले आहेत. या सहलीत हिंगोली शहरातील खुशी बडेरा या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा समावेश आहे. खुशी बडेरासह 80 विद्यार्थी सुखरूप असल्याची माहिती खुशी बडेराचे वडील महावीर बडेरा यांनी दिली आहे.
नागपूरच्या चिकटे आणि घारफेंडे कुटुंबातील 9 जण दुबईत अडकले आहेत. पर्यटनासाठी आखाती देशात गेलेल्या या लोकांना 3 मार्चला विमानाने परत यायचे होते. मात्र दुबई विमानतळ बंद केल्याने पर्यटक दुबईत मध्येच अडकून पडले आहेत. हॉटेल मधून बाहेर जाण्यास पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. हॉटेल कडून नाश्ता, जेवणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मिसाईल हल्ल्यामुळे सर्वांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. दुबई मधून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी या पर्यटकांनी सरकारला विनंती केली आहे.
चंद्रपूरमधील शेकडो मराठी विद्यार्थी दुबई, यूएई आणि अबुधाबी येथे अडकले आहेत. यात आश्रय तायडे या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. दुबईच्या जेबल अली पोर्ट भागात इराणचे मिसाईल हल्ले भागात होत आहेत. या हल्ल्यांमुळे या भागात वास्तव्याला असलेले विद्यार्थी भयभीत झाले आहेत. आश्रयच्या पालकांनी जिल्हा प्रशासनाच्या मार्फत केंद्र सरकारकडे विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी आणण्याची मागणी केली आहे. यात आश्रय तायडे, श्रावणी धाबेकर, मोहन काळे, स्वप्निल खरतड, मयूरी खरतड, इवान खरतड शिल्पा चन्ने आदींचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील 40 ते 50 हजारांपेक्षा जास्त मुस्लीम मक्का मदिना येथे अडकल्याची माहिती समोर आली आहे. ‘उमरा’ या धार्मिक विधीसाठी गेलेले लोक इरान आणि इस्राईल युद्धामुळे निर्माण झालेल्या तनावात अडकले आहेत. “सउदी अरब येथे गेलेल्या मुस्लिम बांधवांनी चिंता करु नये, सरकार तुमची मदत करणार. सऊदी अरेबिया येथे अडकेलल्यांनी त्वरीत भारतीय दुतावासाशी संपर्क करावा असे आवाहन राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केले आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.