Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 स्पेशल स्टोरी

बुलेट ट्रेनच्या मुंबई पुणे हैदराबाद मार्गामुळे महाराष्ट्रातील सहा जिल्ह्याच्या दळणवळणाला गती मिळणार; विकासाचा वेग प्रचंड वाढणार!

xtreme2day   09-02-2026 21:55:21   273052297

बुलेट ट्रेनच्या मुंबई पुणे हैदराबाद मार्गामुळे महाराष्ट्रातील सहा जिल्ह्याच्या दळणवळणाला गती मिळणार; विकासाचा वेग प्रचंड वाढणार!

 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - पुणेकरांचे बुलेट ट्रेनचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार असून मुंबई आणि हैदराबाद या दोन्ही शहरांशी पुणे हायस्पीड रेल्वेने जोडले जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2,81,377 कोटी रुपयांच्या विक्रमी निधीची तरतूद केली असून यामध्ये सात नवीन हायस्पीड कॉरिडॉरची घोषणा केली आहे. यामध्ये मुंबई ते पुणे आणि पुणे ते हैदराबाद या दोन स्वतंत्र बुलेट ट्रेन मार्गांचा समावेश असल्याने महाराष्ट्रातील  पालघर,  ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या दळणवळणाला नवी गती मिळणार आहे.

 

मुंबई-पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. हा मार्ग 350 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी सज्ज केला जाणार आहे. बुलेट ट्रेनमुळे प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. सध्याच्या रेल्वे किंवा रस्ते प्रवासाच्या तुलनेत हा वेग थक्क करणारा असेल. 

 

मुंबई ते पुणे- सध्या 3 ते 4 तास लागणारा हा प्रवास आता केवळ 48 मिनिटांत पूर्ण होईल. पुणे ते हैदराबाद- या लांबच्या प्रवासासाठी आता केवळ 1 तास 55 मिनिटे लागतील. प्रकल्पाचा वेग: या मार्गाचा डीपीआर (DPR) आधीच तयार असल्याने कामाला वेग मिळणार आहे. साधारण 5 ते 6 वर्षात ही ट्रेन रुळावर धावण्याची शक्यता आहे.

 

बुलेट ट्रेनचे नियोजन करताना शहराच्या गर्दीचा विचार करून स्वतंत्र स्थानकाची व्यवस्था करण्यात आली आहे: लोकेशन- पुण्यातील स्टेशन हे मुख्य रेल्वे स्टेशनऐवजी हडपसर किंवा लोणी काळभोर परिसरात असण्याची शक्यता आहे. कनेक्टिव्हिटी: हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) असेल आणि मेट्रो तसेच रिंगरोडशी जोडले जाईल, जेणेकरून प्रवाशांना शहरात ये-जा करणे सोपे होईल.नवी मुंबई कनेक्शन: नवी मुंबईतील स्थानक भुयारी असेल आणि ते थेट विमानतळाशी जोडले जाणार आहे.

 

हा हायस्पीड कॉरिडॉर एकूण 711 किलोमीटरचा असून त्याचा मार्ग खालीलप्रमाणे असेल: प्रमुख स्टेशन- नवी मुंबई – लोणावळा (शहरापासून 4 किमी दूर) – पुणे – कुर्डुवाडी – सोलापूर – कलबुर्गी (गुलबर्गा) – विकाराबाद – हैदराबाद. बांधकाम: मुंबई-पुणे घाटात विशेष बोगदे तयार केले जातील, तर इतर ठिकाणी मार्ग पिलर्सवर (एलिव्हेटेड) असेल.

 

 

दरम्यान, पुणे-हैदराबाद प्रवासाचं गणित आता पूर्णपणे बदलणार असून या हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला जणू बुलेट ट्रेनचा वेग मिळणार आहे. तासनतासांचा प्रवास काही मिनिटांवर येणार असल्याने केवळ प्रवासच सुखकर होणार नाही, तर सोलापूरच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीची नवी दारे उघडली जाणार आहेत. मुंबई, पुणे आणि हैदराबाद यांसारख्या मोठ्या आयटी हबला जोडणारा हा प्रकल्प सोलापूरसाठी गेमचेंजर ठरणार असून, भविष्यात सोलापूर शहर दळणवळणाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येईल अशी चिन्हे आहेत.  पुणे ते हैदराबाद हे सुमारे 600 किलोमीटरचे अंतर रस्ते मार्गाने पार करण्यासाठी 8 ते 10 तास लागतात, तर रेल्वेने सरासरी 9 तास खर्च होतात. मात्र, हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर हेच अंतर अवघ्या 1 तास 55 मिनिटांमध्ये पार करणे शक्य होणार आहे. यामुळे सोलापूर आणि पुणे किंवा हैदराबाद ही शहरे एकमेकांच्या इतकी जवळ येतील की, नागरिक दैनंदिन कामासाठी सहज ये-जा करू शकतील. सोलापूर जिल्ह्यासाठी या प्रकल्पाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सोलापूरमधून मोठ्या प्रमाणावर लोक नोकरी, शिक्षण आणि व्यवसायानिमित्त पुणे किंवा हैदराबादला स्थलांतर करतात. हायस्पीड रेल्वेमुळे हे स्थलांतर थांबण्यास मदत होईल, कारण लोक सोलापूरमध्ये राहून काही मिनिटांत पुणे किंवा हैदराबाद गाठू शकतील. सोलापूरचा वस्त्रोद्योग, वैद्यकीय सेवा आणि कृषी क्षेत्राला या वेगवान कनेक्टिव्हिटीचा मोठा फायदा होईल. इंदापूर, दौंड आणि उरुळी या भागातील प्रवाशांनाही या सुविधेमुळे मोठा दिलासा मिळणार असून, स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. वाहतूक तज्ज्ञांच्या मते, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमधील शहरांची अर्थव्यवस्था या प्रकल्पामुळे झपाट्याने सुधारेल. सध्या सोलापूर-पुणे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावत असली, तरी हायस्पीड कॉरिडॉरमुळे प्रवासाला मिळणारी गती अभूतपूर्व असेल. विमानसेवेच्या तुलनेत हा पर्याय अधिक किफायतशीर ठरणार असल्याने सर्वसामान्यांनाही याचा लाभ घेता येईल.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती