सोने चांदीच्या दरात मोठी घसरण; तब्बल 85 हजार रुपयांनी चांदीचे दर घसरले, सोन्याची किमतीही कमी झाल्या
xtreme2day
30-01-2026 21:06:37
31890397
सोने चांदीच्या दरात मोठी घसरण; तब्बल 85 हजार रुपयांनी चांदीचे दर घसरले, सोन्याची किमतीही कमी झाल्या
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सोने चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून येत आहे. तब्बल 85 हजार रुपयांनी चांदीच्या दरात घसरण झाली असून सोन्याची किमतीही कमी झाल्या आहेत. सोने आणि चांदीच्या दरांनी आता ऐतिहासिक तेजीनंतर गुंतवणूकदारांना जमिनीवर आणले आहे. शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी, सोन्या आणि चांदीच्या एक्सचेंज-ट्रेडेड फंड म्हणजे ईटीएफमध्ये मोठी घसरण झाली. विक्रमी उच्चांकावरून गुंतवणूकदारांनी नफा बुक करण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक ईटीएफ जवळजवळ 14% आपटले. सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण होताना सोने आणि चांदीच्या ईटीएफमध्येही लक्षणीय घट नोंदवली जात आहे. निप्पॉन इंडिया ईटीएफ गोल्ड बीईएस जवळजवळ 10% घसरून प्रति युनिट 132 रुपयांवर आले, तर आयसीआयसीआय प्रुडेन्शियल गोल्ड ईटीएफ देखील जवळजवळ 10% घसरला आणि अॅक्सिस गोल्ड ईटीएफ जवळजवळ 9% खाली आहे.
आज अवघ्या 24 तासांत चांदीच्या दरात 85,000 रुपयांची घट झाली, तर सोन्याच्या दरातही मोठी घट दिसून आली. या घसरणीमुळे सोन्या चांदीच्या किंमत वाढीचा बुडबुडा फुटला आहे. शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता MCX वर मार्च वायदासाठी 1 किलो चांदीची किंमत सुमारे 65000 रुपये घसरून 3,35,001 रुपयांवर पोहोचली होती. मात्र, गुरुवारी संध्याकाळी चांदीची किंमत 4,20,048 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली होती. यानुसार, 24 तासांत चांदीच्या दरात सुमारे 85,000 रुपयांची घसरण झाली. त्याचप्रमाणे, सोन्याच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळत आहे. 29 जानेवारी, गुरुवारी सोने आपल्या विक्रमी स्तरावर 1,93,096 रुपयांवर होते, परंतु शुक्रवारी ते 16,000 रुपये घसरून 1,67,406 रुपयांवर आले. म्हणजेच, 24 तासांत सोन्यात 25,500 रुपयांची घसरण झाली.
दरम्यान, सोने आणि चांदीच्या दर ातील मोठ्या घसरणीमुळे सिल्व्हर आणि गोल्ड ईटीएफच्या दरात मोठी घसरण झाली. शेअर बाजार बंद होईपर्यंत सिल्व्हर आणि गोल्ड ईटीएफचे दर 20 टक्क्यांपर्यंत घसरले. काही तज्ञांचे असेही म्हणणे आहे की सोने आणि चांदीमध्ये जशी विक्री वाढली, तसे शॉर्ट सेलर्स बाजारात आले आणि ट्रेडिंग दरम्यान चांदीची शॉर्ट सेलिंग केली, ज्यामुळे त्याच्या दरात मोठी घसरण झाली. तर ही नफावसुली आहे. कारण अनेक दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ दिसून येत होती आणि त्यांच्या किमती दररोज विक्रमी स्तर गाठत होत्या. चांदीने तर काही आठवड्यांत 3 लाख रुपयांवरून 4 लाख रुपयांचा स्तर पार केला होता. सोन्यामध्येही मोठी वाढ झाली होती. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदार नफावसुली करत आहेत.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.