संभाजीनगरवर सावे ह्यांचे निर्विवाद वर्चस्व
xtreme2day
17-01-2026 22:11:23
4530632
संभाजीनगरवर सावे ह्यांचे निर्विवाद वर्चस्व
(राजेंद्र शहापूरकर याजकडून)
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने अभूतपूर्व विजय नोंदविला आहे. हा विजय छत्रपती संभाजी नगर शहर आणि जिल्ह्यातील पूर्वपार राजकारणाची दिशा बदलवून टाकणारा हा विजय आहे. या विजयाचे पडसाद आगामी जिल्हा परिषद निवडणुकी बरोबरच आमदार खासदार सारख्या मोठ्या निवडणुकीवरही पडल्या शिवाय राहणार नाही असा निष्कर्ष काढावा लागतो.
छत्रपती संभाजीनगर मनपाची ही पहिलीच निवडणूक म्हटल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या नसतील तरच नवल. तर त्यांच्यासाठी, या शहराच्या मनपाची तशी ही सातवी निवडणूक. यापूर्वी 1988, 1995, 2000, 2005, 2010 आणि 2015 अशा सहा निवडणुका झाल्या पण या सर्व औरंगाबाद महानगरपालिकेच्या होत्या. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 2022 मध्ये शहराचे औरंगाबाद हे नाव अधिकृतपणे बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. त्यामुळे ही तशी पहिली निवडणूक असा उल्लेख करण्यात आला आहे.
पहिल्यांदाच बहुमत
आतापर्यंत झालेल्या सहा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेले नव्हते. म्हणजे शिवसेना सर्वात मोठा पक्ष जरूर होता पण एकहाती सत्ता त्यांना कधीही मिळविता आली नाही. 1988 च्या निवडणुकीत अत्यंत सुखद सुरवात करीत शिवसेनेने 48 जागा लढवून 27 जिंकल्या होत्या. आज त्या शिवसेनेचा वारसा सांगणाऱ्या उबाठाने 100 जागा लढवून 94 जागा गमावल्या आहेत. अवघ्या 6 जागा उबाठाला मिळविता आल्या. त्यात माजी खासदार आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे आणि बहूचर्चित रशीदमामू यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. तर दुसरीकडे पहिल्या निवडणुकीत 1988 मध्ये एकही जागा मिळवू नशकणाऱ्या भारतीय जनता पार्टीने शून्यातून आज एकहाती सत्तेपर्यंत मजल मारली आहे. शिवसेना पहिले यश मिळविल्यानंतर सुस्त झाली. सत्तेची ही चटक दुसऱ्या, तिसऱ्या निवडणुकीनंतर इतकी भिनली की आपला पाया घसरत चालल्याचे त्यांच्या लक्षातच आले नाही. भाजपाने मात्र दुसऱ्या निवडणुकीत शून्यातून 7 पर्यंत बळ वाढवित गेल्या निवडणुकीत शिवसेनेची (29) बरोबरी करीत 24 जागा जिंकल्या आणि आतातर स्वतःच्या बळावर एकहाती सत्ता खेचून आणल्या आहेत.
पालकमंत्र्याचे अपयश
मोठा गाजावाजा करीत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठा पणाला लावून हट्टाने जिह्याचे पालकमंत्रीपद भाजपाकडून हिसकावून घेणाऱ्या सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांना या निवडणुकीने अक्षरशः अस्मान दाखविले आहे. शिवसेनेला 97 जागा लढवून केवळ 15 जागा कश्याबश्या मिळवता आल्या आहेत.त्यांच्या मुला- मुलीला आणि त्यांचे काम (?) पाहाणाऱ्या राजू परदेशी यांना त्यांनी निवडून आणण्यात यश मिळवले असले तरी त्यांच्या शिवसेनेची फार दुर्दशा झाली आहे. एवढा मोठा पालकमंत्री, तोऱ्यात चालणारा आणि रोज रोज सकाळी 'बाईट ' देत साऱ्या राज्याच्या राजकारणावर चर्चा करण्यात संघटना बांधणी विसरले आणि तोंडघशी पडले. आपल्या शक्ती विषयी अवास्तव अभिमान बाळगल्याची जबरदस्त किमंत एकनाथराव शिंदे यांना चुकवावी लागणार आहे. सर्वकाही पैशाच्या जोरावर नाही करता येत हे त्यांनी आता तरी लक्षात घेतले पाहिजे. आपले विमान जमिनीवर आणले पाहिजे असे सांगावेसे वाटते. सर्वच पक्षात 'संजय ' नावाचे ओझे होऊन बसले आहे. हे ओझे एकनाथराव कितीकाळ वाहातात ते आता लवकरच दिसेल. संजय शिरसाठांचा हा प्रकार तर खासदार संदीपान भुमरे यांचे दुसरेच.. ना वक्तृत्व ना कर्तृत्व. यांना घेऊन फिरणे म्हणजे आहे त्या मतांतून वजबाकी करून घेण्यासारखे.तर दुसरे आमदार प्रदीप जैस्वाल ऋषीकेशच्या प्रभागात पाय रोवून बसलेले. शिवसेनेचा पाया उखाडला गेला तरी यांचे काय जाणार?
अंबादास दानवेचा हेकेखोरपणा उबाठाच्या मुळावर
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा मिरविणाऱ्या उद्धवबाळासाहेब ठाकरे पक्षाचे तर तीन तेरा आणि चार बारा वाजले आहेत. निवडणूक लागल्यापासून अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे या दोन नेत्यात विस्तव आडवा जाऊ नये अशी परिस्थिती. त्यात अंबादास दानवे यांनी रशीद मामू या एकेकाळच्या कट्टर सेना विरोधकाला थेट 'मातोश्री ' वर नेऊन शिवबंधन बांधले. या प्रकरणात दानवे यांनी कमालीची गुप्तता पाळली होती. चंद्रकांत खैरे यांच्या सारख्या एकेकाळच्या त्यांच्या 'रहेनुमा ' ला सुद्धा काहीच माहिती दिली नाही. त्यामुळे खैरे कमालीचे दुखावले आणि त्यांनी त्यांच्या माजी 'कल्याणशिष्य ' दानवें चा जाहीर पाणउतारा सुरु केला तो आज निकाल लागला तरी सुरु आहे. आता तर त्याला आणखी धार आली असल्याचे जाणवते. अंबादास दानवे त्यांच्या भावाला राजूला निवडून आणू शकले नाही हे त्यांचे अपयश ' मातोश्री ' च्या नजरेत भरले तर त्यांच्यावर मोठी 'आफत ' येऊ शकते.
सावेंचा दबदबा
या सर्व पार्श्वभूमीवर ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांनी अतिशय संयम दाखवित भाजपातील सर्व नेतेमंडळींना एकत्र करीत नेत्रदीपक यश मिळविले आहे. अतुल सावे यांचे हे वेगळेपण डोळ्यात भरणारे आहे. त्यांना 'देवेंद्रज बॉय ' असे म्हटलं जाते अर्थात त्यातच त्यांचे राजकीय कौशल्य दिसते. त्यात काही कमीपणा निश्चितच नाही. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचा विश्वास कमवणे काही चेष्टा नाही. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा विधीमंडळात त्यांचे जाहीरपणे कौतुक केले आहे हे विसरता येणार नाही. जमिनीवरील राजकारणात त्यांचा हात धरणारा आज जिल्ह्यात दुसरा कुणी दिसत नाही. उमेदवारीवरून झालेली रडारड आणि असंतोष पाहाता आता भाजपचे काही खरे नाही असे समजून विरोधक मनातल्या मनात सत्तेचे मांडे खाण्यात मशगुल असताना अतुल सावे यांनी आपल्या सहकारी नेत्यांना बरोबर घेऊन बंडोबाना थंडोबा केले आणि मग मागे वळून पाहिलेच नाही. प्रत्येक प्रभागात उमेदवार ठरवताना चारपैकी किमान दोन तीन तगडे उमेदवार असतील याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाल्याचे दिसून येते. आपल्या पूर्व मतदारसंघा बरोबर संपूर्ण शहरभर ते फिरले. स्वतः मतदारांशी संपर्क साधला, त्याचाच परिणाम म्हणून हा अभूतपूर्व विजय भाजपाला नोंदवता आला. खरे तर संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावर अतुल सावे यांचाच अधिकार होता पण मोठा भाऊ मोठा भाऊ करीत नाचणाऱ्या सिरसाठ यांच्या हट्टपायी त्यांनी नांदेड स्वीकारले. आणि नांदेड मध्येही यशाचे हेच सत्र सुरु ठेवल्याचे दिसते.
जबाबदारी वाढली
या एकहाती विजयाने अतुल सावे यांची जबाबदारी आणखी वाढली आहे. पक्षाची ताकद निर्विवाद वाढलेली आहे. या वाढलेल्या ताकदीला नवा आयाम द्यावा लागणार आहे. जबाबदाऱ्या वाटून द्याव्या लागणार आहेत. काही 'फुकटचंबू माझ्यामुळेच हरबरा टरारुन फुगला ' अशी हाकाटी पिटतील अशांना काबूत ठेवण्यात कसब लागणार आहे. अतुल सावे यांच्या नेतृत्वात भाजपाने फार मोठा पल्ला गाठला आहे. मोठ्या मोठ्या नेत्यांना मिळाले नाही ते भाग्य सावेना मिळाले आहे हे मात्र खरे.
वंचितचे उठावदार यश
वंचितच्या अमित भुईंगळ, अफसरखान, कुरेशीयांच्यासह चार जणांनी एका प्रभागात विजय नोंदविला आहे. मोठ्या पक्षाच्या भाऊगर्दीत भुईगळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळविलेल्या यशाला फार महत्व आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.