Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 नॅशनल न्यूज

भारतीय रेल्वेचं प्रवाशांना मोठं गिफ्ट, दलालांना बसणार चाप; तिकीट बुकिंगचा 8 तासांचा नियम लागू

xtreme2day   05-01-2026 18:00:24   6573174

भारतीय रेल्वेचं प्रवाशांना मोठं गिफ्ट, दलालांना बसणार चाप; तिकीट बुकिंगचा 8 तासांचा नियम लागू

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - आजपासून रेल्वे तिकीट बुकिंगचा नवा नियम (5 जानेवारी 2026) लागू झाला आहे. यामुळे घरबसल्या काही मिनिटांमध्ये ट्रेनचं तिकीट बुक करता येणार आहे. मोबाइलवरून कुठेही आणि कधीही तिकीट बुक करता येईल, महत्त्वाचे म्हणजे दलालांना फायदा घेता येणार नाही. IRCTC च्या नव्या नियमांनुसार, 5 जानेवारीपासून आधार कार्डशी आयडी लिंक केलेले युजर्सच सकाळी 8 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तिकीट बुक करू शकतील. अ‍ॅडव्हान्स तिकीट बुकिंग कालावधी 60 दिवस आधी सुरू होतो. त्यानुसार संबंधित ट्रेनची तिकीट बुकिंग विंडो खुली होईल, त्याच ट्रेनसाठी हा नियम लागू असेल. भारतीय रेल्वेने (IRCTC) हा नियम तीन टप्प्यात लागू केला आहे. पहिला टप्पा 29 डिसेंबर 2025 रोजी सुरू झाला. दुसरा टप्पा 5 जानेवारी रोजी लागू करण्यात आला आणि तिसरा टप्पा 12 जानेवारी 2026 रोजी सुरू होईल.

 

 

IRCTC च्या या नियमाचा उद्देश सामान्य प्रवाशांना ऑनलाइन तिकीट बुकिंगची अधिक संधी देणे आहे. अनेकदा दलाल आणि तिकीट बुकिंगचा व्यवसाय करणारे लोक मोठ्या प्रमाणावर अ‍ॅडव्हान्स तिकीट बुक करून घेतात. त्यामुळे गरजू प्रवाशांना तिकीट मिळत नाही. होळी, दिवाळी किंवा अन्य कोणतेही सण असो 60 दिवस आधी तिकीट बुकिंग सुरू होताच, काही मिनिटांतच जागा फुल झाल्याचे दिसते. याबाबत रेल्वेकडे तक्रारी येत होत्या. रेल्वेचा नवा नियम फक्त जनरल कोट्यातील आरक्षित तिकीट बुकिंगसाठी लागू करण्यात आलाय. ट्रेन तिकीट दलाली आणि सॉफ्टवेअरच्या माध्यमातून झपाट्याने तिकीट बुक करणाऱ्यांवर यामुळे आळा बसेल. प्रत्येक रेल्वे प्रवाशाला ठराविक तारीख, सण, लग्नकार्य इत्यादींसाठी आधीच तिकीट बुक करणे सोपे होईल. तिकीट बुकिंगच्या पहिल्या दिवशी आठ तासांपर्यंत एजंट तिकीट बुक करू शकणार नाहीत. फक्त सामान्य प्रवाशांनाच याचा फायदा मिळेल.

 

 

सर्वसामान्य प्रवासी घरबसल्या आरामात तिकीट बुक करू शकतील. रेल्वे तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशाचे IRCTC खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. तिकीट बुक करताना तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी येईल. ओटीपी सबमिट केल्यानंतरच तिकीट बुकिंग पूर्ण होईल. जर तुमचे IRCTC लॉगइन आयडी आधार कार्डशी लिंक नसेल, तर ते तत्काळ लिंक करा किंवा आयडी नसेल तर नवीन आयडी तयार करा. आधारकार्ड लिंक नसेल तर 60 दिवस आधी बुकिंग सुरू होणाऱ्या पहिल्या आठ तासांत तुम्हाला तिकीट बुक करता येणार नाही. तुम्ही रेल्वे स्टेशनवर किंवा बाहेरील काउंटरवरून तिकीट बुक करत असाल, तरीही ओटीपी येईल आणि त्याच आधारे तिकीट बुक होईल. यासाठी प्रवाशाचा मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. नातेवाईक किंवा अन्य कोणी तिकीट घेत असले तरीही ओटीपी क्रमांक आवश्यक आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती