Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 इतर घडामोडी

राममंदिर झाले आता राष्ट्रमंदिराची उभारणी -सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

xtreme2day   02-12-2025 21:33:20   31890721

राममंदिर झाले आता राष्ट्रमंदिराची उभारणी -सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

 

पुणे (विशेष प्रतिनिधी) - विश्वकल्याणाची पताका फडकविणारे श्रीराममंदिर उभे राहिले. आता पूर्वीपेक्षा अधिक भव्य, सामर्थ्यसंपन्न आणि सुंदर राष्ट्रमंदिर उभे करायचे आहे, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला.

 

कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित, आदित्य प्रतिष्ठान प्रस्तुत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञता सोहळ्यात सरसंघचालक बोलत होते. यावेळी कांचीकामकोटी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती स्वामी, आदित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकर अभ्यंकर, अपर्णा अभ्यंकर उपस्थित होते. आपल्याच समाजाचे कार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात उपकाराची अथवा अहंकाराची भावना नाही, असे मत कृतज्ञता पुरस्कार स्वीकारताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, "संघाला संपूर्ण समाजाचे संघटन अभिप्रेत आहे. कारण समाज संघटित झाला तरच राष्ट्र वैभवसंपन्न होईल. राष्ट्र बलसंपन्न झाले तरच विश्वाला सुखशांती लाभेल. यातही देशाचे कल्याण संघच करेल, अशी आमची वल्गना नाही. तर समाज उभा राहिला तरच देश उभा राहील." कठीण काळामध्ये समाजानेच संघाला साथ दिली, म्हणून संघ मोठा झाल्याचेही सरसंघचालक म्हणाले.

 

शंकर अभ्यंकर म्हणाले, "आक्रमणांमुळे जगातील अनेक संस्कृती नष्ट झाल्या. मात्र संपूर्ण वसुंधरेलाच कुटुंब मानणारी भारताची हिंदू संस्कृती आजही टिकून आहे. भौतिक आक्रमणांबरोबरच आंतरिक आक्रमणही भारतावर झाले. ब्रिटिशांनी भारताचा 'स्व' मोडण्याचा प्रयत्न केला." भारताची सनातन संस्कृती ही विश्वकल्याणासाठी मानवतेला मार्गदर्शक असून, हिंदू संस्कृतीच सर्वांचा स्वीकार करते, असे मत शंकराचार्यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, "अनेक भाषा, परंपरा, प्रांत असतानाही भारतात आधुनिक लोकशाही यशस्वी झाली आहे. कारण प्रजातंत्र हा सनातन धर्माचा भावच आहे. आज लोकशाहीला सामर्थ्यशाली करण्याची गरज असून, चांगल्या लोकांना बळ दिले पाहिजे." कार्यक्रमात वैश्विक संत भारती महाविष्णू मंदिराच्या कोनशिलेचे अनावरण, 'भारतीय उपासना' या विश्वकोष खंडाच्या तिसऱ्या आवृत्तीचे आणि जितेंद्र अभ्यंकर कृत 'पंढरीश' या ध्वनिफितीचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात रामायणावर आधारित 'निरंतर' या संगीत नाटिकेने झाली. सूत्रसंचालन डॉ. आदित्य अभ्यंकर यांनी केले. जितेंद्र अभ्यंकर यांनी संपूर्ण वंदे मातरम सादर केले.

 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती