दिल्लीतील बॉम्बस्फोटचं इंटरनॅशनल कनेक्शन; या घटनेची अत्यंत तातडीने आणि व्यावसायिकतेने तपासाचे केंद्र सरकारने दिले आदेश
xtreme2day
12-11-2025 22:22:18
179632663
दिल्लीतील बॉम्बस्फोटचं इंटरनॅशनल कनेक्शन; या घटनेची अत्यंत तातडीने आणि व्यावसायिकतेने तपासाचे केंद्र सरकारने दिले आदेश
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - दिल्लीतील बॉम्बस्फोटचं इंटरनॅशनल कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. या बॉम्बस्फोटांचा संबंध आता तुर्कीशी असल्याचे काही पुरावे समोर आले आहेत. डॉ. मोहम्मद उमर आणि डॉ. मुझम्मिल शकील यांच्या पासपोर्टमध्ये ते तुर्कीला गेले असल्याची माहिती समोर आली आहे. तुर्कीत हे दोघे नेमके कुणाला भेटले याचा सखोल तपास सुरु आहे.
दिल्लीतील बॉम्बस्फोटांमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक बोलावली होती. या बैठकीत मंत्रिमंडळाने या बॉम्बस्फोटांचा निषेध करणारा आणि जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहणारा ठराव मंजूर केला. त्याच बरोबर सरकारने या घटनेचे वर्णन एक दहशतवादी हल्ला असंही केलं आहे. तसेच या घटनेचा त्वरित तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या बैठकीत दिल्ली बॉम्बस्फोटाच्या चौकशीवर आणि सुरक्षा संस्थांच्या अहवालांवर चर्चा झाली. यानंतर सरकारने म्हटले की, ’10 नोव्हेंबर रोजी देशविरोधी शक्तींनी केलेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याचा देश साक्षीदार आहे. मंत्रिमंडळाने या घटनेची अत्यंत तातडीने आणि व्यावसायिकतेने चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे गुन्हेगार, साथीदार आणि त्यांच्या मागे असलेल्या लोकांची ओळख पटवून त्यांना शिक्षा दिली जाणार आहे. बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल उपस्थित होते. मंत्रिमंडळ समितीच्या या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात स्वतंत्र बैठक झाली. ही बैठक सुमारे अर्धातास चालली. या बैठकीत देशाच्या सुरक्षेबाबत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
भूतान दौऱ्यावरून परतल्यानंतर तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रुग्णालयात जात जखमींसोबत संवाद साधला. या भेटीत पंतप्रधानांनी गुन्हेगारांना शिक्षा मिळेल असं विधान केले. याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करताना पंतप्रधानांनी लिहिले की, “दिल्ली बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांना भेटण्यासाठी मी रुग्णालयात गेलो होतो. मी सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. या कटामागे जो कोणी असेल त्याला शिक्षा मिळेल.”
तसेच अल फलाह युनिव्हर्सिटी परिसरातून २९०० किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले असून, अजूनही ३०० किलो स्फोटके गायब आहेत. डॉ. मुजम्मिल आणि उमरने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लाल किल्ल्याची रेकी केली होती आणि २६ जानेवारीला लक्ष करण्याची त्यांची योजना होती. स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या स्फोटाचे धागे तुर्किये आणि अफगाणिस्तानपर्यंत पोहोचले असून, जैश-ए-मोहम्मदच्या बहावलपूर येथील हेडक्वार्टरवरील कारवाईचा बदला घेण्यासाठी हा स्फोट घडवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. डॉक्टर उमर नबी हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असून त्याने दिल्लीत आत्मघाती स्फोट घडवला. तपास यंत्रणांनी डॉक्टर मॉड्यूल नावाच्या एका गटाला फरिदाबादमधून अटक केली आहे, ज्यात डॉ. शाहीन, डॉ. मुजम्मिल आणि डॉ. अदिल यांचा समावेश आहे. हे हँडलर्स तुर्किये आणि अफगाणिस्तानमधून टेलिग्राम ग्रुपद्वारे संपर्कात होते अशीही माहिती मिळाली आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.