देशभरातील 12 राज्यांमध्ये SIR उद्यापासून सुरु; निवडणूक आयोगाची मोठी घोषणा
xtreme2day
27-10-2025 22:22:15
573286203
देशभरातील 12 राज्यांमध्ये SIR उद्यापासून सुरु; निवडणूक आयोगाची मोठी घोषणा
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - देशभरातील १२ राज्यांमध्ये उद्यापासून मतदार यादीचे विशेष सखोल फेरनिरीक्षण सुरू होत आहे. या प्रक्रियेत नवीन मतदार जोडले जातील आणि त्रुटी दूर केल्या जातील. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाची घोषणा केली.
१२ राज्यांमध्ये SIR चा दुसरा टप्पा उद्यापासून सुरु होईल. या टप्प्यात मतदार यादी अद्ययावत केली जाईल. नवी मतदार जोडले जातील. सोबतच त्रुटी दूर केल्या जातील. दुसऱ्या टप्प्यात १२ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सखोल फेरनिरीक्षण करण्यात येईल. यामध्ये अंदमान निकोबार, गोवा, पुद्दुचेरी, छत्तीसगढ, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, लक्ष्यद्विप यांचा समावेश आहे. या यादीत महाराष्ट्राचा समावेश करण्यात आलेला नाही. राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. ३१ जानेवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.
महाराष्ट्रातील सगळ्या विरोधकांनी एकत्र येत मतदार याद्यांमधील घोळ निस्तरण्याची मागणी केली होती. जोपर्यंत मतदार यादीतील गोंधळ संपत नाही, तोपर्यंत निवडणूक घेऊ नका, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यातील निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन केली. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे त्यांच्यासोबत उपस्थित होते. उद्यापासून १२ राज्यांमध्ये विशेष सखोल फेरनिरीक्षण सुरु होतं असलं तरी यामध्ये महाराष्ट्राचा समावेश नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जुन्याच मतदारयाद्यांच्या आधारे होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी SIR ची माहिती दिली. 'बूथ लेव्हल अधिकारी (BLO) प्रत्येक मतदाराच्या घरात किमान तीनदा जातील. नव्या मतदारांची नावं यादीत समाविष्ट करण्यात येतील. BLO घराघरांत जाऊन फॉर्म-६ आणि डिक्लेरेशन फॉर्म गोळा करतील. नव्या मतदारांना अर्ज भरण्यासाठी मदत करण्याचं कामही BLO करतील. BLO त्यांच्याकडे असलेले अर्ज ERO (इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर) किंवा AERO (असिस्टंट ERO) कडे जमा करतील,' अशी माहिती ज्ञानेश कुमार यांनी दिली.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.