xtreme2day 24-09-2025 22:37:53 119905591
राज्यातील शेतकऱ्यांचं पावसामुळे झालेलं नुकसान पाहून टीम इंडियाचा माजी कॅप्टन अजिंक्य रहाणे हेलावला ! मुंबई (क्रीडा प्रतिनिधी) - राज्यातील शेतकऱ्यांची बिकट अवस्था पाहून टीम इंडियाचा कॅप्टन अजिंक्य रहाणे हेलावला आहे. त्यानं इन्स्टाग्रामवर खास व्हिडिओ शेअर करत सर्वांना मदतीचं आवाहन केल आहे. नमस्कार, मी अजिंक्य रहाणे... आज मी थोड्या वेगळ्या विषयावर बोलणार आहे. तो विषय आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाचा आहे. म्हणजेच शेतकरी. गेले अनेक दिवस महाराष्ट्रात तसंच महाराष्ट्राच्या अनेक भागात अतिवृष्टी झालीय. त्या पावसामुळे शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालंय आणि होत आहे. हे आपण सर्वांनी वाचलं असेल आणि ऐकलं असेल. मी स्वत: शेतकरी कुटुंबातील असल्यानं या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना किती त्रास होतो याची मला जाणीव आहे. वर्षानुवर्ष शेतकरी शेतात मेहनत करतो. आपल्याला जे काही आपल्या ताटात मिळतं, जेवायला मिळतं ते शेतकऱ्यांच्या कष्टामुळे मिळतं. सरकार आपल्या परीनं मदत करतंय. पण, मला वाटतं की आपल्या प्रत्येकाची एक जबाबदारी आहे.आपण शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहून आपल्याला जे शक्य होईल ती मदत नक्की करावी. माझ्यापरीनं, माझ्या बाजूनं मी मदत करतोय. पण, मला प्रत्येकाला हेच सांगायचं आहे, या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आपल्याकडून जी मदत करता येईल, जो पाठिंबा देता येईल तो नक्की द्यावा. कारण, यावेळी शेतकऱ्याला आपल्या सर्वांची गरज आहे. मी सांगितलं तसं सरकार ही मदत करतंय. पण, प्रत्येकजण शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिला तर ते चांगलं होईल. कारण शेतकरी हा आपला कणा आहे. त्याला जी मदत होईल ती द्यावी. धन्यवाद!
v0j9dy