पुण्यातील गणेशोत्सव : वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पुणे प्रशासनाचे नवीन नियम
xtreme2day
02-09-2025 00:17:55
87098722
पुण्यातील गणेशोत्सव : वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पुणे प्रशासनाचे नवीन नियम
पुणे (विशेष प्रतिनिधी) - सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदा गणेशोत्सवानिमित्त पुणे शहर प्रशासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. गणेशोत्सवामुळे मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. एकाच दिवसात म्हणजे ३० ऑगस्ट रोजी मेट्रोच्या प्रवाशांची संख्या तब्बल एक लाखाने वाढून ती ३ लाख ६८ हजार ५१६ वर पोहोचली. या वाढीमुळे मेट्रोचे उत्पन्नही १३ लाखांनी वाढले आहे. पुणेकरांची सोय लक्षात घेऊन गणेशोत्सवादरम्यान मेट्रोची सेवा रात्री २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रोला पुणेकरांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी शनिवार ३० ऑगस्ट, रविवार ३१ ऑगस्ट, सोमवार १ सप्टेंबर, मंगळवार २ सप्टेंबर, बुधवार ३ सप्टेंबर, गुरुवार ४ सप्टेंबर, शनिवार ६ सप्टेंबर या एकूण ७ दिवसांच्या कालावधीत सदर निर्बंधांना सूट देण्यात आली होती. मात्र आता त्यात दुरुस्ती करण्यात आली असून दिनांक १ सप्टेंबर २०२५, सोमवार (सहावा दिवस) या दिवशीच्या ऐवजी आता दिनांक ५ सप्टेंबर २०२५, शुक्रवार (दहावा दिवस) असा बदल करण्यात आला आहे.
ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० च्या अंमलबजावणीबाबत सन २०२५ मध्ये ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांच्या वापरासाठी दिलेल्या शिथिलीकरणाच्या आदेशात दुरुस्ती करण्यात आली आहे. गणपती उत्सवासाठी निश्चित करण्यात आलेल्या कालावधीतील दिनांक १ सप्टेंबर २०२५, सोमवार (सहावा दिवस) या दिवशीच्या ऐवजी आता दिनांक ५ सप्टेंबर २०२५, शुक्रवार (दहावा दिवस) असा बदल करण्यात आला आहे. हा दुरुस्त आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हाधिकारी, पुणे यांनी जारी केला आहे.
केवळ गर्दीचे व्यवस्थापनच नाही, तर नागरिकांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. वाहतुकीच्या नियमांपासून ते ध्वनीप्रदूषण आणि मद्यविक्रीच्या नियमांपर्यंत अनेक गोष्टींमध्ये बदल करण्यात आले आहेत. हा उत्सव शांततेत आणि सुरक्षिततेत पार पडावा, हाच यामागीच उद्देश आहे. यात पुणे मेट्रोच्या प्रवाशांची वाढलेली संख्या, तसेच विसर्जन मिरवणुकीसाठी पार्किंगची विशेष व्यवस्था कुठे याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी पुण्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक शाखेने २७ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल, निलयम टॉकीज, फर्ग्युसन कॉलेज आणि एसपी कॉलेज यांसारख्या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. यातील काही ठिकाणी दुचाकी तर काही ठिकाणी चारचाकी वाहनांचे पार्किंग देण्यात आले आहे. ज्यामुळे भाविकांना आपली वाहने सुरक्षितपणे पार्क करता येतील.
विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी दुचाकी पार्किंग व्यवस्था :
न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग
शिवाजी आखाडा वाहनतळ
देसाई कॉलेज – पोलिस पार्किंग १७
विमलाबाई गरवारे हायस्कूल
गोगटे प्रशाला
आपटे प्रशाला
मराठवाडा कॉलेज
पेशवा पथ
रानडे पथ
पेशवे पार्क सारसबाग
हरजीवन रुग्णालयासमोर सावरकर चौक
काँग्रेस भवन रस्ता
पाटील प्लाझा पार्किंग
पर्वती ते दांडेकर पूल
दांडेकर पूल ते गणेशमळा
गणेशमळा ते राजाराम पूल
विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी चारचाकी पार्किंग व्यवस्था :
निलायम टॉकीज
हमालवाडा, पत्र्यामारुती चौकाजवळ
आबासाहेब गरवारे कॉलेज
संजीवनी मेडीकल कॉलेज मैदान
फर्ग्युसन कॉलेज
एसएसपीएमएस शिवाजीनगर
जैन हॉस्टेल बीएमसीसी रस्ता
एसपी कॉलेज
पीएमपीएमएल मैदानपुरम चौकाजवळ
न्यू इंग्लिश स्कूल टिळक रस्ता
नदी पात्र भिडे ते गाडीतळ पूल
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.