यंदाचा गणेशोत्सव हा राज्य शासनाचा राज्योत्सव : पुण्यात जोरदार तयारी सुरु ; गणेशोत्सव निर्विघ्न व निर्भयपणे साजरा करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे - पोलीस आयुक्त
xtreme2day
19-08-2025 19:50:50
378074496
यंदाचा गणेशोत्सव हा राज्य शासनाचा राज्योत्सव : पुण्यात जोरदार तयारी सुरु ; गणेशोत्सव निर्विघ्न व निर्भयपणे साजरा करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे - पोलीस आयुक्त
पुणे (सांस्कृतिक प्रतिनिधी) - यंदाचा गणेशोत्सव हा राज्य शासनाने राज्योत्सव म्हणून जाहीर केला आहे. पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सव जगभर प्रसिध्द आहे. त्यामुळे यावर्षी सुध्दा गणेशात्सव शांततेत व निर्विघ्नपणे आणि मोठ्या उत्सहात साजरा व्हावा यासाठी प्रशासन, महानगरपालिका, पोलिस विभाग व सर्व गणेशमंडळांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.
शहरातील गणेशोत्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पडावा या दृष्टीने शहरातील सर्व गणपती मंडळाचे अध्यक्ष यांची संयुक्त बैठकीचे आज बाल गंधर्व रंग मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पोलिस उपायुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त् मनोज पाटील, शहरातील गणपती मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीच्या सुरूवातीला गणपती मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या अडचणी व समस्या जाणून घेण्यात आल्या यानंतर बोलतांना पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार म्हणाले की, शासनाने यावेळी गणेशोत्सवास राज्योत्सवाचा दर्जा दिला आहे. पूर्वीपासूनच आपल्या शहरातील गणेशोत्सव खूप प्रसिध्द आहे त्यामुळेच आपल्या शहरातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने, शांततेत व निर्विघ्नपणे तसेच निर्भयमुक्त वातावरणात पार पाडण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. शहरातील गणपती मंडळांनी कोणतेही वाद विवाद घडतील असे देखावे करू नयेत. पाऊस सुरू आहे त्यामुळे वीजेची कामे करतांना काळजी घ्यावी. मंडळांनी आपल्या मंडळामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत. आपातकालीन घडना घडू नयेत यासाठी सर्व मंडळांनी दक्षता घ्यावी. पोलिस विभागाकडून वाहतूकीसंदर्भात, गर्दीच्या नियोजनाबाबत योग्य दक्षता घेण्यात येत आहे.
गणपती मंडळांनी विर्सजन मिरवणूकीबाबत व इतर काही मांडलेल्या अडचणीबाबत लोकप्रतिनिधी, समाजातील प्रतिष्ठीत नागरिक, समाजसेवक यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर मार्ग काढण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रशासन आणि पोलिस विभाग गणपती मंडळांच्या मदतीसाठी सदैव सोबत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले की, आपल्या जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव खूप उत्सहाने व मोठ्या प्रमाणात साजरा होतो. यावेळी गणेशोत्सवाला शासनाने राज्योत्सव म्हणून जाहिर केले आहे. त्याअनुषंगाने गणेशोत्सवामध्ये शासनामार्फत विविध उपक्रम व स्पर्धा घेण्यात येणार आहेत त्यामध्ये सर्व मंडळांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवावा. आपल्या शहरातील गणेशोत्सव आपल्या शहरापुरता मर्यादित न रहाता त्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. उत्सव साजरा करतांना मंडळांना सुरळीत वीज पुरवठा, वाहतूकीबाबतच्या अडचणी तसेच इतर काही अडचणी सोडविण्यासाठी व सोई सुविधा पुरविण्यासाठी संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे प्रभाग निहाय गट तयार करण्यात आले असून त्यांच्या मार्फत आपल्या सर्व अडचणी सोडवल्या जातील व गणेशोत्सवात गणेश भक्तांना, नागरिकांना जास्तीत जास्त सोई सुविधा देखील पुरवल्या जातील.
तसेच गणपती मंडळांनी मांडलेल्या अडचणी देखील सोडविण्यात येतील व सूचनांचा देखील विचार करण्यात येईल. गणेशात्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सर्वांचे सहकार्य करावे असे त्यांनी यावेळी सांगितले. महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी गणेशोत्सवावेळी महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या सर्व सोई सुविधा विषयक माहिती दिली. तसेच मागील वर्षी देण्यात आलेल्या सोई सुविधा पेक्षा जास्त सोई सुविधा यावर्षी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याकडे इंग्रजांच्या काळापासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. या गणेशोत्सवामधून सामाजिक बांधिलकी जपली जाते. यावर्षी गणपती मंडळांनी देखावे सादर करताना सामाजिक संदेश असलेले देखावे सादर करावेत. सर्व शासकीय विभागातील अधिकारी देखील गणेशोत्सवात सहभागी होवून आपणाला कोणत्याही सोई सुविधेची कमतरता भासणार नाही यासाठी नियोजनबध्द काम करत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी केले.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.