लोणावळा शहर, घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा हाहाकार; रस्ते पाण्याखाली, वाहतूक विस्कळीत, पर्यटक अडचणीत
xtreme2day
19-08-2025 19:23:45
6906672
लोणावळा शहर, घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा हाहाकार; रस्ते पाण्याखाली, वाहतूक विस्कळीत, पर्यटक अडचणीत
पुणे (विशेष प्रतिनिधी) - पुणे, मुंबई, रायगड, कोल्हापूर, ठाणे, पालघर जिल्ह्यांना सध्या मुसळधार पावसाने झोडपले आहे. लोणावळा शहर व घाटमाथा परिसरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी 18 ऑगस्ट 24 तासांमध्ये शहरामध्ये तब्बल 142 मिमी पावसाची नोंद झाली होती. मंगळवारी सकाळपासून देखील पावसाचा जोर वाढल्याने परिसरातील नद्या, नाले, धरणे व रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
लोणावळा येथील जोरदार पावसामुळे भुशी धरणाच्या सांडव्यावरून व पायऱ्यांवरून प्रचंड पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने धरणांच्या पायऱ्यांवर जाण्यास बंदी घातली आहे. या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक गर्दी करत असतात; मात्र यावर्षी मुसळधार पावसामुळे धोका निर्माण झाल्याने पोलिसांनी प्रवेशबंदी केली आहे. पावसाचे पाणी वेगाने रस्त्याकडे वळल्यामुळे भुशी धरणासमोरील लायन्स पॉईंटकडे जाणारा संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला आहे. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली असून पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वाहनचालकांना रस्त्यावर थांबूनच पावसाचा जोर कमी होण्याची वाट पाहावी लागत आहे.
लोणावळा शहरासह घाटमाथ्यावरील खंडाळा, अम्बी व्हॅली, कुने गाव परिसरातही मुसळधार पावसामुळे निसर्गरम्य धबधबे जोरात धावू लागले आहेत. मात्र या पावसामुळे अपघाताची शक्यता वाढल्याने पोलिस व प्रशासनाकडून पर्यटकांना अनावश्यक धोकादायक ठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मावळ, मुळशी, चाकण, खेड, जुन्नर, नारायणगाव तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.