पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना, रिफॉर्म टास्क फोर्स, देशात पहिली 'मेड इन इंडिया' सेमीकंडक्टर चिप, राष्ट्रीय डीपवॉटर एक्सप्लोरेशन मिशन आणि ग्रामविकास आणि महिला सक्षमीकरणावर विशेष भर
xtreme2day
15-08-2025 21:28:40
150346058
पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना, रिफॉर्म टास्क फोर्स, देशात पहिली 'मेड इन इंडिया' सेमीकंडक्टर चिप, राष्ट्रीय डीपवॉटर एक्सप्लोरेशन मिशन आणि ग्रामविकास आणि महिला सक्षमीकरणावर विशेष भर
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून 12 व्यांदा देशवासीयांना संबोधित केले. विशेष म्हणजे, पंतप्रधानांचे ऐतिहासिक भाषण ऐकण्यासाठी 26 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 85 गावांच्या सरपंचांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील सरपंचांनी या भाषणाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त करत पंतप्रधानांचे कौतुक केले आहे, ज्यात ग्रामविकास आणि महिला सक्षमीकरणावर विशेष भर होता. पंतप्रधानांचे ऐतिहासिक भाषण ऐकण्यासाठी 26 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 85 गावांच्या सरपंचांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
या सोहळ्याला उपस्थित असलेल्या सरपंचांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणामुळे प्रबोधन झाल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील सरपंच संदीप ढेरंगे यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणाची विशेष प्रशंसा केली. ढेरंगे म्हणाले की, भाषणात कृषी, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण या विषयांवर भर दिला होता, जे खूप महत्त्वाचे आहे. पंतप्रधानांनी गावच्या विकासाला देशाच्या विकासाचा पाया मानले, ही गोष्ट ऐकून त्यांना अभिमान वाटला. या भाषणातून त्यांना गावामध्ये नवीन गोष्टी लागू करण्याची प्रेरणा मिळाली. पंतप्रधान मोदींनी तरुणांसाठी 'विकसित भारत रोजगार योजना' जाहीर केल्यामुळे देशातील तरुणांना मोठा फायदा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्याने सरपंच अंजली यांनी आनंद व्यक्त केला. 'आजचा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. पंतप्रधानांना थेट ऐकणे हा एक अभिमानास्पद क्षण होता,' असे त्या म्हणाल्या. महाराष्ट्रातील सरपंचांसाठी हा अनुभव विशेष होता कारण त्यांना देशातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. यावेळी, महाराष्ट्रातील सरपंचांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. 'व्हीव्हीआयपी' पाहुण्यांप्रमाणे मिळालेल्या आदरातिथ्यामुळे भारावून गेले. तसेच महाराष्ट्रातील आणखी एक सरपंच डॉ. अनुप्रीता यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान मोदींचे भाषण ऐकून त्यांना खूप आनंद आणि अभिमान वाटला. भाषणात महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिल्याचे पाहून त्या भारावून गेल्या. 'एक महिला म्हणून महाराष्ट्रातून येताना, राष्ट्रनिर्माणात महिला योगदान देत आहेत हे ऐकून खूप छान वाटले,' असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, नोकरीच्या शोधात असलेल्या देशभरातील तरुणांना मोदी सरकारनं मोठं गिफ्ट दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना लागू झाल्याची घोषणा केली आहे. या योजनेमुळे पुढील 2 वर्षांत 3.5 कोटी नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या योजनेअंतर्गत, ज्या तरुणांना पहिली नोकरी लागेल, त्यांना 15 हजार रुपये दिले जातील.
1 जुलै, 2025 रोजी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात रोजगाराला प्रोत्साहन देणाऱ्या या योजनेला मंजुरी दिली होती. ही योजना आता लागू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित भाषण करताना सांगितलं की, "आज 15 ऑगस्ट आहे आणि आम्ही देशातील तरुणांसाठी 1 लाख कोटी रुपयांची योजना सुरू करत आहोत. ही तुमच्यासाठी चांगली बातमी आहे की पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना आजपासून लागू होत आहे." पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेत खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना 15,000 रुपये मिळतील. याशिवाय, त्यांना रोजगार देणाऱ्या कंपनीलाही सरकारकडून प्रोत्साहन रक्कम दिली जाईल. सुमारे 99,446 कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या या योजनेचे उद्दिष्ट 2 वर्षांत 3.5 कोटींहून अधिक नोकऱ्या तयार करणे आहे. यापैकी 1.92 कोटी लाभार्थी पहिल्यांदा नोकरी मिळवणारे असतील.
2047 पर्यंत भारताला 10 लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी 'रिफॉर्म टास्क फोर्स' स्थापन केली जाईल, असे मोदींनी जाहीर केले. याचे उद्दिष्ट आर्थिक विकासाला गती देणे, लाल फितीचा कारभार कमी करणे आणि प्रशासनाचे आधुनिकीकरण करणे आहे.
लाल किल्ल्यावरून देशाच्या भविष्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. आपल्या 12 व्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात त्यांनी भारताला 2027 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याच्या संकल्पावर भर दिला. सेमीकंडक्टरपासून ते जेट इंजिन बनवण्यापर्यंत आणि आण्विक ऊर्जा क्षमता दहा पटीने वाढवण्यापासून ते युवकांसाठी 1 लाख कोटी रुपयांच्या रोजगार योजनेपर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. गेल्या 50-60 वर्षांपूर्वी सेमीकंडक्टर फॅक्टरी सुरू करण्याचे प्रयत्न कसे अयशस्वी झाले, याची आठवण करून देत पंतप्रधान मोदींनी आता भारत मिशन मोडमध्ये असल्याचे सांगितले. या वर्षाच्या अखेरीस देशात पहिली 'मेड इन इंडिया' सेमीकंडक्टर चिप तयार केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
पुढील दोन दशकांत देशाची अणुऊर्जा निर्मिती क्षमता दहा पटीने वाढवण्याच्या उद्दिष्टाने 10 नवीन अणुभट्ट्यांवर काम सुरू असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. यामुळे ऊर्जा क्षेत्रात भारत अधिक आत्मनिर्भर बनेल. सीमावर्ती भागातील घुसखोरी आणि बेकायदेशीर स्थलांतरामुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय असंतुलनावर पंतप्रधान मोदींनी चिंता व्यक्त केली. या राष्ट्रीय सुरक्षेच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी 'हाय-पॉवर्ड डेमोग्राफी मिशन' सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. भारताच्या मोठ्या अर्थसंकल्पाचा मोठा हिस्सा पेट्रोल, डिझेल आणि गॅस आयात करण्यासाठी खर्च होत असल्याचे सांगत पंतप्रधान मोदींनी 'राष्ट्रीय डीपवॉटर एक्सप्लोरेशन मिशन' सुरू करण्याची घोषणा केली. या मिशनद्वारे समुद्रातील संसाधनांचा उपयोग केला जाईल. पंतप्रधानांनी वैज्ञानिक आणि तरुणांना 'मेड इन इंडिया' जेट इंजिन बनवण्याचे थेट आव्हान दिले. ज्याप्रमाणे कोविडच्या काळात लस आणि डिजिटल पेमेंटसाठी यूपीआय (UPI) तयार केले. त्याचप्रमाणे आपण स्वतःची जेट इंजिन तयार करावी, असे ते म्हणाले.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.