xtreme2day 13-08-2025 20:06:47 95649108
भारतीयांना अमेरिका करतंय हद्दपार! शक्य तितक्या लवकर घरी जा, असे आदेश!! वाशिंग्टन (एजन्सी वार्ता) - अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार आल्यापासून तिथे राहणाऱ्या इतर देशातील लोकांना समस्यांना सामोरं जावं लागत आहे. अनेक समस्या समोर उभ्या असल्याने जगणं कठीण झालं आहे. पहिलं तर व्हिसाचे नियम कठोर करण्यात आले. त्यामुळे अडचणीत वाढ झाली. आता तिथे राहणाऱ्या भारतीयांना हद्दपारीची नोटीस देण्यात आली आहे. शक्य तितक्या लवकर अमेरिका सोडण्यास सांगितलं आहे. खरेतर नियमानुसार त्यांच्याकडे 60 दिवसांचा वेळ होता. फायनान्शियल एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, अमेरिकेत काम करणाऱ्या एच 1बी व्हिसाधारक किंवा त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला नोकरी गमावल्यानंतर 60 दिवसात मुदतीपूर्वीच हद्दपारीची नोटीस मिळाली आहे. यामुळे त्यांना भारतात परतण्याशिवाय पर्याय नाही. अमेरिकेच्या या धोरणामुळे तिथे राहणाऱ्या लोकांची चिंता वाढली आहे. कारण तिथे राहणाऱ्या लोकांच्या हाती नोकरी नसल्याने पैसे नाहीत. त्यात महागड्या जीवनशैलीमुळे तिथे राहणं कठीण झालं आहे. अनेक भारतीय एच1बी व्हिसावर अमेरिकेत काम आहेत. अनेकांनी तिथेच स्थायिक होण्याची योजनाही आखली आहे. पण आता तिथली स्थिती बदलली आहे. अमेरिकेत नोकरीवरून काढल्यानंतर एच 1 बी कामगारांना नवं काम शोधण्यासाठी किंवा व्हिसाची स्थिती बदलण्यासाठी 60 दिवसांचा वाढीव कालावधी दिला जातो. पण 2025 या वर्षाच्या जून महिन्यापासूनच वाढीव कालावधी संपण्यापूर्वीच नोटीसा दिल्या जात आहेत. अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत. एनटीए दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत पाठवले गेले आहेत. नियमानुसार 60 दिवसांचा वाढील कालावधी अनिवार्य असला तरी हा कालावधी वाढण्याचं अधिकाऱ्यांच्या हातात आहे. एका सर्व्हेक्षणानुसार, अनेक लोकं भारतात परत येऊ इच्छित आहेत. कारण तिथे राहणाऱ्या 45 टक्के लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. 26 टक्के लोकं नोकरीसाठी इतर देशात गेलेत. तर उर्वरित लोकं भारतात परण्याचा विचार करत आहेत. कारण मुदत संपण्याआधीच नोटीसा येत असल्याने भविष्यात अडचणी वाढू शकतात. अनेकांना अमेरिका सोडण्याची भीती वाटत आहे. कारण इतका पगार पुन्हा मिळणं कठीण आहे. त्यामुळे जीवनशैलीवरही परिणाम होणार आहे. दुसरीकडे, टॅरिफ वॉरमुळे भारतासोबतचे संबंध ताणले गेले आहेत. अशा स्थितीत भारतीयांवर आणखी कठोर कारवाईचा बडगा उचलला जाऊ शकतो.