Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 रिजनल न्यूज

“आपत्तीला तोंड देण्यासाठी एकात्म आणि जागरुक समाजाची आवश्यकता” - आयुक्त नवलकिशोर राम

xtreme2day   14-07-2025 16:38:21   1775116

“आपत्तीला तोंड देण्यासाठी एकात्म आणि जागरुक समाजाची आवश्यकता” - आयुक्त नवलकिशोर राम

 

पुणे (प्रतिनिधी) -“निसर्गात बदल हे होतच राहणार त्यामुळे आपत्ती ही अपरिहार्य आहे. त्या अनुभवातून धडा घेऊन मूलगामी उपाय करण्याची गरज आहे. त्यासाठी एकात्म आणि जागरुक समाजाची आवश्यकता आहे. लोभ ही आपत्ती व्यवस्थापन करताना येणारी सर्वात मोठी अडचण असून संतुलित जीवन पद्धती हाच त्यावरील उपाय आहे. आपत्ती व्यवस्थापनाचा अंतर्भाव शिक्षणात केला पाहिजे. आपत्तीला तोंड देण्यासाठी केवळ भावना पुरेशी नसते तर कौशल्य देखील आवश्यक असते. त्यादृष्टीने सेवा भारतीने चांगले काम केले आहे,” असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांनी आज येथे केले. 

राष्ट्रीय सेवा भारती आणि सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय सेवा साधना - आपदा प्रबंधन’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त शेखर सिंह, मुंबईतील सोमय्या विद्यापीठाचे प्र-कुलगुरु आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ञ प्रा. डॉ. सतीश मोढ आणि सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र या संस्थेचे अध्यक्ष विजय काळे उपस्थित होते. 

बृहन् महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सच्या पद्मश्री डॉ. सायरस पूनावाल ऑडिटोरियममध्ये हा समारंभ झाला. 

या प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “आपत्तीला तोंड देण्यासाठी कितीही तयारी केली तरी प्रत्यक्षात त्या व्यवस्थेत कमतरता जाणवतेच. ग्रामीण भागात गावकरी तातडीने मदतीसाठी पुढे येतात, मात्र त्यांनाही प्रशिक्षणाची गरज असल्याचे जाणवते. आपद्ग्रस्त परिसरातून नागरिकांचे स्थलांतर करताना खूप सतर्क रहावे लागते. भूकंपाला तोंड देऊ शकतील अशा इमारती बांधल्या आहेत का? असा प्रश्न काही प्रदेशातील बांधकामे बघितल्यावर पडतो. शहरी भागात पाणी तुंबण्याची मोठी समस्या आहे, त्याला अनेक घटक कारणीभूत असतात. नद्यांची लांबी लक्षात घेता नदी किनाऱ्यांवर नजर ठेवणे शक्य होत नाही. आपत्ती व्यवस्थापनासाठी पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका सेवा भारतीच्या सहकार्याने काही उपक्रम राबवत आहे.”

प्रमुख वक्ते प्रा. डॉ. सतीश मोढ म्हणाले, “दुर्घटना घडते त्या वेळी अनपेक्षित परिस्थितीला सामोरे जावे लागते. त्यासाठी शाळेपासून शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. कोणती दुर्घटना कशामुळे घडते हे सांगणे गरजेचे आहे. आपला जीव कसा वाचवायचा याचे ज्ञान नसते, त्यामुळे हानी होते आणि संकट ओढावते. हे दुष्टचक्र तोडणे आवश्यक आहे. नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण नसल्यामुळे परिस्थितीची जाणीव न झाल्याने अनेक ठिकाणी चेंगराचेंगरीच्या घटना घडल्या आहेत. दुर्देवाने अशा घटनांचे राजकारण केले जाते. आपला अमूल्य जीव वाचवणे ही नागरिकांची जबाबदारी आहे. मुंबईमध्ये मोकळ्या मैदानांवर असणारे केबलचे जाळे ही आपत्कालीन स्थितीत तिथे हेलिकॉप्टर उतरवण्यातील सर्वात मोठी समस्या आहे. मुंबईतील ६० टक्के लोकसंख्या झोपडपट्ट्यांमध्ये राहते, ही कच्ची घरे भूकंपाला तोंड देण्यास सक्षम नाहीत. सुमारे १६ हजार इमारती पावसाळ्यात धोकादायक ठरतात. त्यामुळे भूकंप किंवा वादळासारख्या आपत्तीत सुमारे एक कोटी नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. सरकारने या नागरिकांना मोफत घरे बांधून दिल्यास मानवतेसाठी ते एक वरदान ठरेल. नियम डावलून केलेले बांधकाम म्हणजे आपणच बांधलेली आपली कबर असते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. सार्वजनिक स्वच्छता, नागरी कर्तव्ये आणि कायद्याचे पालन हे आपत्ती व्यवस्थापनासाठी अतिशय आवश्यक आहे.”

हिंदी आणि इंग्रजी भाषेतील या पुस्तकातील लेखकांच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय तज्ञ डॉ. राजन गेंगजे यांनी या वेळी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “आपत्ती व्यवस्थापन हा विषय वैदिक काळापालून भारतात अस्तित्वात आहे. भगवान श्रीकृष्णांनी हाताच्या करंगळीवर उचलेल्या गोवर्धन पर्वताखाली आसरा घेतलेले गोकुळवासी हे त्याचे उदाहरण आहे. नेतृत्व, निर्णयक्षमता आणि सामुहिक कृती या आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक बाबी आहेत. इसवी सनाच्या ३ ऱ्या आणि ४ थ्या शतकात चाणक्याने चंद्रगुप्त आणि बिंबिसार या राजांना मार्गदर्शन करताना आपत्तीच्या प्रसंगी मदत न करणाऱ्यांना दंड ठोठावण्याचा उपदेश केला होता. २००१ साली गुजरातमध्ये झालेला भूकंप आणि २००४ साली आलेली त्सुनामी या महाप्रलयंकारी घटनांनंतर केंद्र सरकारने उच्चसत्रिय समिती स्थापन केली. त्यानंतर एनडीआरएफ सारख्या यंत्रणा उभ्या राहिल्या आणि आपत्ती व्यवस्थापनाचे चित्र बदलेल. तोपर्यंत देशाची सैन्यदले आपत्तीत मदतकार्य करत होती, वास्तविक त्यासाठी सैन्य तयार केले जात नाही. समाजाला प्रशिक्षण देणे महत्वाचे काम असून सेवा भारती ते करत आहे. समाजाला प्रोत्साहित करण्यासाठी प्रभावशाली व्यक्तींची मदत सेवा भारतीने घ्यावी.”  

सेवा भारती पश्चिम महाराष्ट्रचे सचिव प्रदीप सबनीस यांच्या हस्ते डॉ. गेंगजे यांचा प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला. 

समारंभाच्या प्रास्ताविकात विजय काळे यांनी सेवा भारती पश्चिम महाराष्ट्रच्या कार्याचा आढावा घेताना शिक्षण, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयांना प्राधान्य देत लहान शाळांमध्ये फिरत्या प्रयोगशाळा,लहान गावांमध्ये फिरते दवाखाने, शहरातील वस्त्यांमध्ये संस्कारवर्ग, अभ्यासिका आदी उपक्रम सुरू असल्याचे सांगितले.    

या कार्यक्रमास रा स्व संघांचे प्रांत सहकार्यवाह महेशराव करपे,सेवा प्रमुख शैलेंद्रजी बोरकर तसेच सेवा भारती प्रांत सचिव प्रदीपजी सबनीस आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवा भारती पश्चिम महाराष्ट्रचे प्रांत कोषाध्यक्ष सुधीर जवळेकर यांनी केले. 

.

 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती