पुण्याच्या अवीट मैफलीत शाहीर डॉ. शेषराव पठाडेयांनी लोकरूची लोकगीतांनी जिंकली रसिकांची मने !!
xtreme2day
30-06-2025 19:52:43
7843377
पुण्याच्या अवीट मैफलीत शाहीर डॉ. शेषराव पठाडेयांनी लोकरूची लोकगीतांनी जिंकली रसिकांची मने !!
छत्रपती संभाजीनगर (सांस्कृतिक प्रतिनिधी) - छत्रपती संभाजी नगर येथील गारखेडा परिसरातील हॉटेल राधेमध्ये अवीट मैफलीत शाहीर डॉ. शेषराव पठाडे यांनी खरोखर अवीट लोकगीत-लावणीचे सादर करून ज्येष्ठ -श्रेष्ठ गायकांसह उपस्थित रसिकांची मने जिंकली. लोकारूचीच्या लोकगीतांना पुण्यातील कलावंतांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. पुण्याच्या अवीट सांगितिक ग्रुपतर्फे रविवार, २९ रोजी या आगळ्या-वेगळ्या मैफलचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्य म्हणजे सोशल मीडियावरून गायक कलावंतांचा मेळा जमला आणि पुणे आणि जालन्याचे गायक, वादक कलावंत ऐतिहासिक अशा छत्रपती संभाजीनगरमध्ये एकत्र आले, हे विशेष. व्हॉटस् ॲप आणि फेसबुकवरून आम्ही सर्व परस्परांशी जोडले गेलो आणि सांगितीक अवीट मैफलीतून एकत्र आलो, असे या ग्रुपचे प्रमुख ८२ वर्षांचे विठ्ठल वैद्य, डॉ. अनिल कुलकर्णी आणि सहआयोजक व प्रसिद्ध अँकर दीपाली कुलकर्णी यांनी सांगितले.
ज्येष्ठ-श्रेष्ठ गायक कलावंतांनी हिंदी-मराठी चित्रपटातील सदाबहार गाणी सादर करून मैफलीत रंग भरले. या मैफलीत छत्रपती संभाजीनगरसह पुणे आणि जालना शहरातील गायकांनी आपली कला प्रदर्शित केली. महानगरांमधील गायक आणि संगीतप्रेमीजनांना एकत्र येता यावे, या उद्देशाने गायन मैफलीचे आयोजन करण्यात आले होते.
पुण्याचे जेष्ठ गायक आणि आयोजक विठ्ठल वैद्य यांच्या सरस्वती वंदनेने मैफलीस सुरुवात झाली. आषाढीनिमित्त पंढरीच्या दिशेने अनेक वारकरी दिंडी घेऊन जात आहेत, या पार्श्वभूमीवर 'कानडा राजा पंढरीचा' हा अभंग ॲड. गौरांग कुलकर्णी यांनी सादर करून टाळ-मृंदंगाच्या गजरात सभागृह दणाणून गेले.
मैफलीत नव्या जुन्या हिंदी, मराठी गाण्यांची रेलचेल होती. 'मंजिले अपनी जगह है..' हे गीत जालन्याचे जेईएस कॉलेजचे प्राचार्य डॉ. गणेश कुलकर्णी यांनी सादर केले. ये शाम मस्तानी, ये समा समा है ये प्यार का ,दिल हुं हुं करे , रिमझिम गिरे सावन, तेरे नैना सावन भादो , तुम्हे याद होगा, कितने भी तू कर ले सितम आदी एकाहून एक सरस अशी गाणी मैफलीत सादर झाली.
डॉ. पठाडे यांना दाद
जालन्याचे डॉ. विजय गजेंद्रगडकर यांनी हर्मोनिकावर (माउथ ऑर्गन) 'लाखो है निगाहो..' मे गीत अप्रतिम सादर केले, तर डॉ. शेषराव पठाडे यांनी 'आधी गणाला रणी आणा हो...हा शाहीर पठ्ठे बापुराव कुलकर्णी यांचा गण आणि गुरू लोककवी वामनदादा कर्डक यांचे 'हसावी गादी बाराच्या आधी भांडण मिटवावं। प्रितीच्या फुला तरी तू मला वेळेला उठवावं...' हे पती-पत्नीतील प्रेमाचा संदेश देणारे लोकप्रिय लोकगीत सादर करून रसिकांची मने जिंकली. जुन्या जाणत्या गायक कलावंतांनी देखील लोकगीतांना भरभरून प्रतिसाद देत डोक्यावर घेतले.
डॉ. अंजली कुलकर्णी व डॉ. अनिल कुलकर्णी यांनी 'वो जब याद आए' सादर केले. डॉ. नितिशा यांच्या 'दिल है छोटासा' या गीताला सगळ्यांनीच साथसंगत केली.
'कभी अलविदा..' ने सांगता
'कभी अलविदा ना कहना...' या गीताने सदाबहार मैफलची यशस्वी सांगता झाली. अवीट सांगितीक मैफल यशस्वी करण्यासाठी डॉ. अनिल कुलकर्णी व विठ्ठल वैद्य अथक परिश्रम घेतले. ८२ वर्षांचे विठ्ठल वैद्य यांनी सगळ्या उपस्थितांना उत्स्फूर्तपणे नाचायला लावून मैफलमध्ये बहार आणली. सहआयोजक नितीन रणदिवे यांनी ध्वनी व्यवस्था सांभाळत बहुतांश कलावंतांना साथ देत गीतानुरूप नृत्य करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. दीपाली कुलकर्णी यांच्या निवेदनाने मैफल रंगतदार झाली.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.