xtreme2day 16-05-2025 19:03:03 56734852
कोविड-१९ पुन्हा डोकं वर काढतोय, आशियातील या देशात करोना व्हायरसचे नवे रुग्ण ; तीव्र वाढीमुळे चिंता वाढली नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - हाँगकाँग आणि सिंगापूरमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी आशियातील अनेक भागांमध्ये कोविड-१९ ची नवीन लाट पसरत असून करोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये तीव्र वाढ होण्याचा इशारा दिला आहे. हाँगकाँगच्या सेंटर फॉर हेल्थ प्रोटेक्शनमधील कम्युनिकेबल डिसीज ब्रँचचे प्रमुख अल्बर्ट औ यांनी स्थानिक माध्यमांशी बोलताना, शहरात कोविड-१९ चा प्रसार आता खूप जास्त वाढताना दिसत आहे. आशियातील अनेक भागांमध्ये कोविड-१९ च्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होत असल्याचं समोर आलं आहे. करोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये तीव्र वाढ झाल्याचा इशारा देण्यात आला असून कोविड-१९ चा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत असून गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतासह संपूर्ण जगभरात २०२० मध्ये कोविड-१९ मुळे हाहाकार माजला होता. आता पुन्हा एकदा पाच वर्षांनी आशियातील अनेक भागांमध्ये कोविड-१९ ची नवीन लाट पसरत असल्याची माहिती समोर आली आहे. ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. कोविड-१९ च्या गंभीर रुग्णांची संख्या वाढली आहे. ३ मे पर्यंतच्या आठवड्यात ३१ गंभीर कोविड-१९ रुग्णांची नोंद झाल्याची माहिती आहे. सध्याची ही करोना रुग्णांची वाढ मागील उद्रेकांइतकी मोठी नसली तरी, हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरत आहे. सांडपाण्यामुळे कोविड-१९ चं प्रमाण वाढल्याचं सांगण्यात येत आहे. कोविडची लक्षणं असलेले अनेक लोक रुग्णालयांमध्ये गर्दी करत आहेत. सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने यंदाच्या मे महिन्यात मागील वर्षाभरातील माहिती दिली. या आठवड्यात ३ मे रोजीपर्यंत करोना रुग्णांमध्ये २८ टक्क्यांची वाढ झाली. या वाढीसह रुग्णांचा आकडा १४,२०० झाली आहे. करोनामुळे रुग्णालयात दाखल होण्याचं रुग्णांचं प्रमाण ३० टक्क्यांनी वाढल्याची माहिती देण्यात आली आहे. लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने हा व्हायरस झपाट्याने वाढली असल्याची शक्यता असल्याचं आरोग्य विभागाने म्हटलं आहे. कोविडची नवी लाट अधिक संसर्गजन्य आहे किंवा अधिक गंभीर आजारांसाठी कारणीभूत ठरेल का याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती, कोणताही पुरावा समोर आलेला नाही. दुसरीकडे सिंगापूर, हाँगकाँगनंतर चीनमध्येही करोनाची नवी लाट येत असल्याचं समोर आलं आहे. ब्लूमबर्गने हे वृत्त दिलं आहे. ४ मे पर्यंत चीनमध्ये करोना चाचणी करण्याचा दर आणि चाचणीचा पॉझिटिव्हीटी दर दुप्पट झाला आहे.