Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 रिजनल न्यूज

प्रगत शास्त्रीय अभ्यास करून तंत्रज्ञानाचा विकास आवश्यक - डॉ. वि. ल. धारूरकर

xtreme2day   16-05-2025 18:23:07   2729015

प्रगत शास्त्रीय अभ्यास करून तंत्रज्ञानाचा विकास आवश्यक - डॉ. वि. ल. धारूरकर 

संभाजीनगर (प्रतिनिधी) - प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञानातील शोध हे समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक परंपरांतून प्रकट होतात. त्या आधारे प्रगत शास्त्रीय अभ्यास करून तंत्रज्ञानाचा विकास केला पाहिजे, असे मत माजी कुलगुरू व प्रसिद्ध विचारवंत डॉ. यांनी सोमवारी, १२ रोजी येथे व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इतिहास आणि प्राचीन भारतीय संस्कृती विभागात 'ऑन जॉब ट्रेनिंग आणि कौशल्य विकास' या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. पुष्पा गायकवाड होत्या.

डॉ. धारूरकर म्हणाले, अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणाले होते की, मानवी विकासाचे कितीही प्रयत्न झाले असले तरी आपण अजूनही नवे शोध आणि नव्या कल्पनांच्या विकासाबाबत कमालीचे दरिद्री आहोत. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारतात तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला व त्या आधारे विदेशात व्याख्याने दिली. त्यांनी असे मत मांडले होते की, जेथे प्राचीन तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास होतो, तेथेच प्रगत तंत्रज्ञानही जन्माला येते. महात्मा गांधी यांनी बिर्ला भवन येथे १९३७ साली केलेल्या एका भाषणात असे सांगितले होते की, भारताचे उज्वल भवितव्य कशात असेल तर ते कौशल्य विकासात आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक धोरणात शालेय जीवनापासूनच कौशल्य विकासावर भर देण्यात आला आहे.

सामाजिक शास्त्रांमध्ये कौशल्ये कुठे आहेत, असा प्रश्न लोक विचारतात तो चुकीचा गैरसमज आहे असे सांगून डॉ. धारूरकर पुढे म्हणाले, सर्व सामाजिक शास्त्रांना कौशल्याचे अंग आहे. किंबहुना सामाजिक शास्त्रे ही सामाजिक अनुभवाच्या तप्त मुशीतून विकसित झाली आहेत. त्यामुळे इतिहासासारख्या सामाजिक शास्त्राचा संबंध पुरातत्त्व विद्या, पर्यटन, उदार कला या ज्ञानशाखांशी आहे.

वस्तूसंग्रहालये देशाचे भूषण :

जगातील सर्व देशांमध्ये वस्तूसंग्रहालये ही एक इतिहासावर आधारलेली ज्ञानशाखा उदयास आली आहे. चांगली वस्तूसंग्रहालये ही त्या देशाचे भूषण असतात. त्या आधारे मोठ्या रोजगार संधी उपलब्ध होत आहेत. जुन्या ऐतिहासिक स्थळांमध्ये लेणी मंदिरे, किल्ले, गडकोट यांची माहिती देण्यासाठी चांगले मार्गदर्शक किंवा गाईड यांची कमतरता आहे. त्याचे प्रशिक्षण घेऊन उत्तम रोजगार मिळू शकतो, असे धारूरकर म्हणाले. या सर्व कौशल्यांच्या विकासासाठी ऑन जॉब ट्रेनिंगची नितांत गरज आहे. ऑन जॉब ट्रेनिंग मधूनच सातत्याने त्यांची निष्णातता विकसित होते. अलीकडे उदार कला शिक्षणातसुद्धा ऑन जॉब ट्रेनिंगला अत्यंत महत्त्व दिले जात आहे. पर्यटन क्षेत्रातील विविध विद्याशाखांचा विकास याच दिशेने होत आहे, असे डॉ. धारूरकर म्हणाले.

 

प्रश्नोत्तरानंतर कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली. याप्रसंगी झालेल्या चर्चेमध्ये निवृत्त सेवा योजन अधिकारी शिरसाठ, पूनम कुशेर, अश्विन जोगदंड, डॉ. संदेश कांबळे, प्रसेनजित मानवर इत्यादी सहभागी झाले होते. प्रास्ताविक डॉ. बिना सेंगर यांनी केले. डॉ. संजय पाईकराव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. पुष्पा गायकवाड यांनी डॉ. धारूरकरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णमाला म्हस्के यांनी, तर प्रा. राहुल बचाटे यांनी सर्वांचे आभार मानले.

...........


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती