xtreme2day 07-05-2025 18:02:52 98750674
भारताच्या कारवाईबद्दल जगात सर्वत्र खळबळ! भारताच्या कारवाईचे इस्त्रायलने उघड समर्थन केलं आहे. भारतातील इस्रायलचे राजदूत रुवेन अझर यांनी म्हटलंय की, आम्ही भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचे समर्थन करतो. दहशतवाद्यांना त्यांच्या गुन्ह्यांची किंमत चुकवावी लागेल. इस्त्रायलने या आधीही भारताला पाठिंबा दिला आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा म्हणाल्या की, आम्हाला भारत-पाकिस्तान तणावाची चिंता आहे आणि आम्ही दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन करतो. रशियाने या आधीच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. ते भारताच्या दहशतवादविरोधी धोरणाचे समर्थन करतात. परंतु लष्करी कारवाईमुळे परिस्थिती बिघडू नये यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव ही एक गंभीर परिस्थिती आहे. आम्हाला आशा आहे की लवकरच शांतता प्रस्थापित होईल. तर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो म्हणाले की, अमेरिका या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि दोन्ही देशांशी संपर्कात आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानने शांतता राखावी आणि परिस्थिती आणखी गुंतागुंतीची बनवणाऱ्या अशा कृती टाळाव्यात. चीनचे हे वक्तव्य राजकीय संतुलन दर्शवते. चीनचा पाकिस्तानला पाठिबा आहे पण उघडपणे भारताला विरोध केला गेला नाही. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले की, आम्हाला नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील लष्करी कारवायांबद्दल चिंता आहे. भारत आणि पाकिस्तान दोघांनीही संयम बाळगावा. तर आखाती देशांना दोन्ही बाजूंशी चांगले संबंध राखायचे आहेत. ते कोणत्याही लष्करी उपायापेक्षा राजनैतिक पर्यायांना प्राधान्य देतात. भारताच्या कारवाईवर युएईचे उपपरराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद म्हणाले की, तणाव शांततेने सोडवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे राजनैतिक आणि संवाद. अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.