xtreme2day 20-03-2025 19:05:39 4790508
अलिबागचा कु. व्योम भगतचा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये पहिला क्रमांक; पी. एन पी. एज्युकेशन चे नाव जगभरात! अलिबाग, ( डॉ. जयपाल पाटील यांजकडून ) - तालुक्यातील कोळीवाडा-मेटपाडा येथील कु. व्योम मिताली केतन भगतने आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित SOF इंटरनॅशनल ऑलिम्पियाड लेव्हल-२ गणित परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. महाराष्ट्र-गोवा झोनमध्ये प्रथम क्रमांक पटकावत त्याने ६० पैकी ५९ गुण मिळवले, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर २५ वा क्रमांक मिळवत आपली बुद्धिमत्ता सिद्ध केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल SOF इंटरनॅशनल ऑलिम्पियाडतर्फे त्याला रोख पारितोषिक रुपये ५०००/- व महाराष्ट्र-गोवा झोनल गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. कु. व्योम सध्या पी. एन. पी. एज्युकेशन सोसायटीच्या होली चाईल्ड CBSE स्कूल, वेश्वि-अलिबाग येथे इयत्ता ५ वी मध्ये शिक्षण घेत आहे. त्याने याआधीही विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने हिंदुस्तान टाईम्स प्रायोजित सतिश अकॅडमी वेदिक मॅथस ॲन्ड अबॅकस टीचर ट्रेनिंग संस्थेतर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. या कामगिरीबद्दल संबंधित संस्थेतर्फे त्याला गोल्ड मेडल व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले आहे. कु. व्योमच्या या अपूर्व यशाबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत असून, त्याचे माता पिता व शाळेतील सर्व शिक्षक वर्गाचे ही अभिनंदन केले जात आहे. त्याच्याकडून भविष्यात आणखी मोठ्या यशाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
99jn5n