मेट्रोला ९३ कोटींचे उत्पन्न; पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ३ वर्षांत ६ कोटी नागरिकांनी केला प्रवास
xtreme2day
08-03-2025 16:41:31
12397655
मेट्रोला ९३ कोटींचे उत्पन्न; पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ३ वर्षांत ६ कोटी नागरिकांनी केला प्रवास
पुणे (विशेष प्रतिनिधी) - पुण्यातील मेट्रोला आत्तापर्यंत ९३ कोटींचे उत्पन्न मिळाले असून पुणे, पिंपरी -चिंचवड दरम्यान ३ वर्षांत ६ कोटी नागरिकांनी केला प्रवास आहे. त्यामुळे मेट्रो पुणे-पिंपरी-चिंचवडकरांच्या पसंतीस उतरली आहे. पुणे शहरात सुरक्षित, वेगवान, ान, आरामदायक, विश्वासार्ह आणि टिकाऊ शहरी वाहतूक उपलब्ध करून देण्यात पुणे मेट्रोने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. पुणे मेट्रो विस्तारित मार्ग आणि फेज-२ मेट्रो नेटवर्कवर शहराचा जास्तीत जास्त भाग जोडला जाईल, असे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
ब्ल्यू लाईन वनाझ ते गरवारे कॉलेज आणि पिंक लाईन पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या मार्गांवरील मेट्रोच्या प्रवासी सेवेचे उद्घाटन सहा मार्च २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. सुरुवातीला मेट्रो नवीन असल्यामुळे त्यातून फिरण्याचा अनुभव घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. त्यानंतर, पुढील टप्पा सुरू होण्यास जवळपास दीड वर्षे वेळ लागला. एक ऑगस्ट २०२३मध्ये वनाझच्या सेवेचा विस्तार रुबी हॉल क्लिनिकपर्यंत आणि फुगेवाडी सेवेचा विस्तार जिल्हा न्यायालयापर्यंत करण्यात आला. गेल्या वर्षी सहा मार्चला रामवाडीपर्यंत मेट्रो सेवा सुरू झाली, तर सप्टेंबरमध्ये स्वारगेटपर्यंतचा टप्प्याचे लोकार्पण झाले. त्यामुळे मेट्रोची दैनंदिन प्रवासीसंख्या दीड लाखांच्या घरात पोहोचली. मेट्रो सेवा सुरू झाल्यापासून रात्री दहापर्यंत कार्यरत होती. मात्र, प्रजासत्ताक दिनापासून मेट्रो रात्री ११ पर्यंत प्रवाशांसाठी कार्यरत आहे. मेट्रो सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत मेट्रोतून पाच कोटी ९८ लाख प्रवाशांनी प्रवास केल्याचे दिसून आले .
पिंपरी-चिंचवड ते निगडी दरम्यानच्या मार्गिकेचे सध्या काम सुरू आहे. त्याचबरोबर स्वारगेट ते कात्रज दरम्यान (५.५ किलोमीटर) मेट्रो मार्गिकेवर दोन नवी स्थानके प्रस्तावित आहेत. त्याबरोबरच
-वनाझ ते चांदणी चौक (१.१२ किमी, २ स्थानके)
■ रामवाडी ते वाघोली /विठ्ठलवाडी (११.६३ किमी, ११ स्थानके)
■ खडकवासला-स्वारगेट-हडपसर
-खराडी (३१.६४ किमी, २८ स्थानके)
■ नळ स्टॉप ते वारजे-माणिकबाग (६.१२ किमी, ६ स्थानके)
■ हडपसर ते लोणी काळभोर (१६.९२ किमी, १४ स्थानके) आणि हडपसर ते सासवड रस्ता (५.५७किमी, ४ स्थानके) या नवीन मार्गिका कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.