महाकुंभात 40 कोटी भाविकांचा अंदाज; मात्र आले 65 कोटी, जागतिक उच्चांक

महाकुंभ प्रयागराज नगर (विशेष प्रतिनिधी) - जगातील सर्वात मोठा अध्यात्मिक आयोजन असलेला महाकुंभमेळा आता समाप्तीकडे येत आहे. 13 जानेवारी 2025 पासून सुरु झालेला महाकुंभचा समारोप 26 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नासिक या चार पवित्र स्थानावर कुंभमेळा होता. त्यातील प्रयागराजमध्ये 144 वर्षांनी यंदा महाकुंभ आला. आता 2025 नंतर थेट 2169 मध्ये महाकुंभ होणार आहे. आताच्या या महाकुंभातून अनेक विक्रम रचले गेले. धार्मिकपासून अर्थव्यवस्थेपर्यंत अनेक गोष्टींना नवीन आयाम दिला गेला. जगभरातील सनातनीच्या असलेल्या लोकसंख्येपैकी अर्ध्या लोकसंख्येने भक्तीची डुबकी महाकुंभात लगावली. महाकुंभात 40 कोटी भाविक येण्याचा अंदाज होता. परंतु 22 फेब्रुवारीपर्यंत 60 कोटी भाविक आले. महाशिवरात्रीपर्यंत भाविकांची ही संख्या 65 कोटी जाण्याचा अंदाज आहे.
उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभ सुरु होण्यापूर्वी 40 कोटी भाविक येण्याचा अंदाज व्यक्त केला होता. परंतु आतापर्यंत 60 कोटी भाविक आले. ही संख्या 65 कोटींपर्यंत जावू शकते. महाकुंभात इतकी गर्दी का वाढली? असा प्रश्न आहे. त्याची मुख्यत्या दोन कारणे आहेत. सोशल मीडियातून झालेला प्रचार आणि 144 वर्षांनी महाकुंभ येणार असल्याचे बिंबवलेली गोष्टी. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभ सुरु होण्यापूर्वी सोशल मीडिया क्रिएटर्सची लखनऊमध्ये बैठक घेतली. या बैठकीत शंभर पेक्षा जास्त क्रिएटर आले होते. त्यांनी कुंभसंदर्भातील रिल्स, व्हिडिओ आपल्या प्लॅटफॉर्मवर शेअर केली. त्यामुळे कुंभ टॉपिक्स ट्रेडींगमध्ये आला. कुंभ मेळ्याच्या रिल्समधून त्यांनी महाकुंभात सहभागी होण्याचे अपील केले. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे 144 येणारा महाकुंभ होय. 2025 मध्ये महाकुंभाचा अमृतयोग आला. त्यानंतर असा योग 144 वर्षांनी 2169 मध्ये येणार आहे. त्यामुळे आपल्या आधीच्या पिढीला आणि येणाऱ्या पिढीला हा योग मिळणार नाही. त्याचा जोरदार प्रचार केला गेला. डिजिटल माध्यमांनी याचा जोरदार प्रचार केला. महाकुंभामुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेमध्ये 3 लाख कोटी रुपयांची भर पडणार आहे. महाकुंभामुळे देशाच्या जीडीपीमध्ये 0.3 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे.
महाकुंभ संगमावर अपेक्षापेक्षा जास्त गर्दी झाली. त्यामुळे काही वेळा नियोजन कोसळले आणि दुर्घटनाही घडल्या. 13 जानेवारीला महाकुंभ सुरु झाल्यावर 21 जानेवारीपासून गर्दी वाढू लागली. 29 जानेवारी रोजी मौनी अमावस्याच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली. चेंगराचेंगरी झालीत अनेक भाविकांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा 2 ते 7 फेब्रुवारीपर्यंत गर्दी प्रचंड वाढली होती. 25 ते 30 किलोमीटरपर्यंत रांगा प्रयागराजमधील रस्त्यांवर लागल्या होत्या. अनेक किलोमीटर पायी चालत जावून संगमापर्यंत जाता येत होते.
वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू, प्यू रिसर्चनुसार, भारताची लोकसंख्या अंदाजे 143 कोटी आहे. त्यापैकी 110 कोटी सनातन धर्माचे अनुयायी आहेत. म्हणजेच भारतातील 55 टक्क्यांहून अधिक लोकांनी महाकुंभात सहभाग घेतला. प्यू रिसर्च 2024 नुसार, जागतिक स्तरावर सनातन अनुयायांची संख्या 120 कोटी आहे. म्हणजेच जगभरातील 50 टक्क्यांहून अधिक सनातनींनी संगमात भक्तीची डुबकी लावली. येत्या महाशिवरात्रीच्या दिवशी शेवटचे स्नान आहे. महाशिवरात्रीला 26 फेब्रुवारी रोजीच्या स्नानाला अमृत स्नान म्हणून नाही तर संगम स्नान म्हणून मान्यता आहे. या स्नानामुळे ही संख्या 65 कोटीपेक्षा जास्त होईल. महाकुंभात नेपाळमधून 50 लाखांहून अधिक भाविक त्रिवेणी संगमात स्नानासाठी आले.
कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांची मोजणी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने हायटेक उपकरणांची मदत घेतली आहे. यावेळी एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आधारित कॅमेऱ्यांच्या मदतीने लोकांची गणना केली जात आहे. भाविकांची गणना करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने एक विशेष टीम तयार केली. या टीमचे नाव आहे क्राउड असेसमेंट टीम ठेवले. ही टीम महाकुंभला येणाऱ्या लोकांची रिअल टाईमवर मोजणी करत होती. त्यासाठी खास कॅमेऱ्यांची मदत घेतली जात होती, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने लोकांची मोजणी करत आहेत. महाकुंभात आलेल्या भाविकांचे चेहऱ्यांचे स्कॅनिंग हे कॅमेरे करतात. त्यावरुन किती तासांत किती लाख लोक महाकुंभ मेळा परिसरात आले आहेत, याचा अंदाज बांधतात. यासाठी 1800 कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच ही टीम लोकांची मोजणी करण्यासाठी ड्रोनची मदत घेत आहे. जे एका विशिष्ट भागात गर्दीची घनता मोजते आणि एका दिवसात महाकुंभ कार्यक्रमात किती लोक उपस्थित आहेत हे शोधतात. तसेच इतर काही पद्धतींद्वारे गर्दीची मोजणी केली जात आहे. एक म्हणजे पीपल फ्लो… एखाद्या विशिष्ट मार्गावरून किती लोक येत आहेत ते महाकुंभात प्रवेश केल्यावर मोजले जात आहेत. कोणत्या भागात गर्दीची घनता किती आहे, कोणते संवेदनशील क्षेत्र आहेत, कोणते महत्त्वाचे क्षेत्र आहेत, त्यामधील गर्दीची घनता किती आहे, याचे मूल्यांकन या कॅमेऱ्यांद्वारे केले जात आहे.
जगातील सर्वात मोठ्या धार्मिक आयोजनात व्यापार आणि अर्थव्यवस्थेला मोठा फायदा झाला. नवीन विक्रम निर्माण झाला. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनुसार, महाकुंभात 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यापार झाला. विविध उद्योगांमध्ये भरभरात मोठ्या प्रमाणात झाली. महाकुंभातील उलढाल फक्त प्रयागराजपर्यंत मर्यादीत नव्हती. तिचे परिणाम देशभरात दिसत होते. तसेच प्रयागराजच्या 150 किलोमीटर परिसरात त्याचा प्रभाव जास्त होता. उत्तर प्रदेश सरकारने या कार्यक्रमासाठी 7,500 कोटी रुपयांची निधी दिला. या निधीमुळे प्रयागराज आणि परिसरातील रस्ते, उड्डाणपूल आणि अंडरपासमध्ये सुधारणा करण्यात आली. या रकमेपैकी 1,500 कोटी रुपये विशेषत: महाकुंभशी संबंधित व्यवस्थेसाठी देण्यात आले होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अंदाजानुसार महाकुंभामुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेमध्ये 3 लाख कोटी रुपयांची भर पडणार आहे. महाकुंभामुळे देशाच्या जीडीपीमध्ये 0.3 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे.