महाराष्ट्रातील संतांनी देशाला अध्यात्मिक उर्जा दिली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
xtreme2day
21-02-2025 23:22:15
49756121
महाराष्ट्रातील संतांनी देशाला अध्यात्मिक उर्जा दिली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन


नवी दिल्ली - (सांस्कृतिक प्रतिनिधी) अनेकानेक भाषा या समाजात जन्म घेतात आणि समाजाच्या निर्मितीसाठी महत्वाची भूमिका बजावतात. मी जेव्हा मराठीचा विचार करतो तेव्हा मला संत ज्ञानेश्वर महाराज यांचा अभंग आठवतो. माझ्या मराठीची बोलू कौतुके, परि अमृतासेही पैजासे जिंके. मराठी भाषा अमृताहून गोड आहे. त्यामुळे मराठीबाबत माझे प्रेम आहे. ते तुम्हाला माहीतच आहे. भारताला अध्यात्मिक उर्जाची गरज होती तेव्हा महाराष्ट्रातील संतांनी ती पूर्ण केली. मराठीतील अनेक संतांनी भक्ती आंदोलनातून समाजाला नवीन दिशा दिली. समृद्ध दलित साहित्य मराठी भाषेने देशाला दिले. विज्ञान साहित्य दिले. नवीन विचार, नवीन प्रतिभा महाराष्ट्राने दिली असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
देशभर छावा चित्रपटाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास कोट्यवधी लोकांपर्यंत गेला. या चित्रपटाने अनेक विक्रम तयार केला. छावा चित्रपटाबद्दल प्रत्येकाला आकर्षण वाटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही छावा चित्रपटाने मोहिनी घातल्याचे दिसून आले. नवी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात बोलताना त्यांनी त्याचा उल्लेख केला. ते म्हणाले, छावाची धूम सुरू आहे. संभाजी महाराजांच्या शौर्याचा परिचय शिवाजी सावंत यांच्या कादंबरीनेच करून दिला आहे.
मुंबईने मराठीसह हिंदी सिनेमालाही नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. भारत जगातील सर्वात प्राचीन सभ्यतेपैकी एक आहे. साहित्य समाजाचा आरसा आहे. साहित्य समाजाचे पथप्रदर्शक आहे. त्यामुळे साहित्य संमेलनासारख्या कार्यक्रमाची देशात महत्त्वाची भूमिका असते. गोविंद रानडे, हरी नारायण आपटे, आचार्य अत्रे, सावरकर यांनी आदर्श निर्माण केले आहे. साहित्य महामंडळ ही परंपरा पुढे नेईल अशी आशा करतो, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. दिल्लीत आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून बोलण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, मी तुमच्या प्रमाणे मराठी भाषा बोलू शकत नाही. परंतु नवनवीन मराठी शब्द शिकण्याचा आणि बोलण्याचा मी नेहमी प्रयत्न करत आलो. आज तर जागतिक मातृभाषा दिवस आहे. त्यामुळे मराठी साहित्य संमेलनासाठी तुम्ही दिवस पण चांगला दिवस निवडाला. माझ्यासारख्या लाखो लोकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशासाठी जगण्याची प्रेरणा दिली. संघामुळेच मी मराठी भाषेशी जोडलो गेलो असेही ते म्हणाले.
आज दिल्लीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा रंगला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील उपस्थिती होती. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. मराठी मानसाने अटकेपार झेंडा फडकवला आहे. मराठी संमेलन देशाच्या राजधानीत दुसऱ्यांना होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले याचा आनंद आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी मोदींनी जी भुमिका घेतली ती महत्वाची आहे. मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. त्यानंतर आता दिल्लीतील ७० वर्षानंतर या संमेलनाची पुनरावृत्ती होत आहे. नरेंद्र मोदी यांना आमंत्रण दिल्यानंतर त्यांनी लगेच होकार दिला. मला गुरूस्थानी असलेले यशवंत राव चव्हाण उत्तम साहित्यिक होते, त्यामुळे मी सुद्धा उत्तम लिहिता झालो. इतकी संमेलनं झाली, माञ केवळ चार महिलांनाच संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं. तारा भवाळकर यांना संमेलनाचं अध्यक्षपद मिळालं हे आनंददायी आहे. दिल्ली आणि महाराष्ट्राचे एक नातं आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीचे राजकीय आणि सांस्कृतिक संबंध आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, साहित्य क्षेत्रात अनेक भगिनींनी भर घातली आहे. साहित्य संमेलन म्हटलं की राजकारण्यांचा इथे काय संबंध अशी चर्चा सुरू होते. राजकारण आणि साहित्य यांच्यातील संबंध जवळचा आहे. सध्या संवाद कठीण आणि नाजूक परिस्थिती मधून जात आहे. त्यामुळे आता साहित्यिकांची जबाबदारी वाढली आहे. संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित आहेत, त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो, असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना बसण्यासाठी खुर्ची दिली. तसेच त्यांनी स्वत:च्या हातानं बाटलीमधील पाणी शरद पवार यांच्यासमोर ठेवलेल्या ग्लासामध्ये त्यांना पिण्यासाठी ओतलं. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कृतीनं सर्वांचं मन जिकलं. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, आज दिल्लीमध्ये मराठी भाषेचा हा गौरवशाली कार्यक्रम आयोजित होत आहे. संघामुळेच मला मराठी भाषा अवगत झाली. काही दिवसापूर्वी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. देशात आणि जगात १२ कोटींहून अधिक मराठी भाषिक लोक आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही कोट्यवधी मराठी भाषिकांची इच्छा होती. दशकांपासून हे काम अपूर्ण होतं. मला ते पूर्ण करण्याची संधी मिळाली. हे माझं भाग्य आहे. भाषा केवळ संवादाचं माध्यम नाही. तर भाषा ही संस्कृतीची वाहक आहे. भाषा समाजात जन्म घेत असते. पण भाषा समाजाच्या निर्माणात देखील तेवढीच महत्त्वाची भूमिका निभावते.
केसरी आणि मराठा सारख्या वृत्तपत्रांनी, गोविंदाग्रजांच्या कविता, राम गणेश गडकरींचे नाटक यातून राष्ट्रप्रेमाची धारा निघाली. त्यातून स्वातंत्र्याच्या चळवळीला प्रेरणा मिळाली. सामाजिक मुक्तीचे द्वार उघडण्याचं काम मराठी भाषेनं केलं, असं यावेळी मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.