Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 रिजनल न्यूज

समाजाला सृजनशील आणि विचारवंत ठेवण्याकरीता वाचन संस्कृती जीवंत ठेवणे काळाची गरज-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

xtreme2day   14-12-2024 23:18:57   4636818

समाजाला सृजनशील आणि विचारवंत ठेवण्याकरीता वाचन संस्कृती जीवंत ठेवणे काळाची गरज-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे (प्रतिनिधी) - समाजाला सृजनशील आणि विचारवंत ठेवण्यासोबतच समाजातील मूल्ये जीवंत ठेवण्याकरीता वाचन संस्कृती जीवंत ठेवणे ही काळाची गरज असून त्याकरीता अशाप्रकारच्या पुस्तक महोत्सवांचे आयोजन करणे आवश्यक आहे, हा पुस्तक महोत्सव पुण्यापुरताच मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे आयोजन केले पाहिजे, याकरीता शासन आपल्या पाठीशी नेहमी उभे राहील, अशी ग्वाही श्री. फडणवीस यांनी दिली.

नॅशनल बुक ट्रस्टच्यावतीने फर्ग्युसन कॉलेज येथील मैदानावर आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी, आमदार चंद्रकांतदादा पाटील, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार अमित गोरखे, आमदार हेमंत रासने, आमदार शंकर जगताप, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे विश्वस्त आचार्य पवन त्रिपाठी आदी उपस्थित होते. 

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, इतिहासात ग्रंथांचे महत्त्व चिरकाल आहे. आपली ग्रंथसंपदा ज्ञान किती थोर आहे हे सहाव्या शतकातील नालंदा विश्वविद्यालयाच्या ग्रंथसंपदेतून दिसून येते. त्याकाळी नालंदा विश्वविद्यालयात सर्व विद्या शाखांचा अभ्यास करण्यात येत असे. बख्तियार खिलजी याने नालंदा विश्वविद्यालयावर हल्ला केला आणि तेथील ग्रंथसंपदेला आग लावली. ती आग तीन महिने जळत होती.

 

ते पुढे म्हणाले, ग्रंथांशी आपले नाते खूप जुने असून ते चिरकाल टिकले आहे. भारतीय सभ्यता जगातल्या सर्वात जुन्या सभ्यतेपैकी आहे. जगातील इतर सभ्यता संपल्या असल्या तरीही भारतीय सभ्यता चिरंतर चालू आहे. सर्व दिशांनी येणारे ज्ञान ग्रहण केले पाहिजे अशी शिकवण आपल्या सभ्यतेने दिली आहे. म्हणूनच ग्रंथांशी आपले अतुट नाते राहिले आहे. 

 

डिजिटल युगातही आपले ग्रंथ आणि विचार टिकून राहणार आहेत. आपली ग्रंथसंपदा आणि विचार कधीही संपू शकत नाही. कोणतेही पुस्तक आता तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध भाषांमध्ये सहज वाचता येणे शक्य झाले आहे. तंत्रज्ञानाने ज्ञानाची दारे उघडी केली आहेत. आपली वाचन संस्कृती जपण्याचे काम आपण सर्वांनी केले पाहिजे. वैश्विक असलेली मराठी भाषा अभिजात भाषा झाली असून मराठी भाषेला राजमान्यता मिळाली आहे, त्यामुळे आपल्या सर्वांची जबाबदारी वाढली आहे. आपण सर्वांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम केले पाहिजे, असे आवाहन श्री.फडणवीस यांनी केले.

 

पुस्तक प्रदर्शनानिमित्त लावण्यात आलेल्या विविध दालनांना मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली आणि प्रकाशक मुद्रक विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला. यावेळी लेखिका अरुणा ढेरे, नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद मराठे, कर्नल युवराज मलिक यांनीही आपले विचार व्यक्त केले. पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी नॅशनल बुक ट्रस्टच्या पुणे कार्यालयाच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध करुन दिल्याबाबतचे पत्र हस्तांतर करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला साहित्यप्रेमी नागरिक, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्रकाशक, मुद्रक उपस्थित होते.

 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती