Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 रिजनल न्यूज

मुंबई हे स्वप्नांचे शहर , पण हे स्वप्न पुर्ण करणारी युती म्हणजे महायुती - नरेंद्र मोदी यांच प्रतिपादन

xtreme2day   14-11-2024 23:07:16   19988749

मुंबई हे स्वप्नांचे शहर , पण हे स्वप्न पुर्ण करणारी युती म्हणजे महायुती - नरेंद्र मोदी यांच प्रतिपादन

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - देशात मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे. पण स्वप्न पुर्ण करणारी युती म्हणजे महायुती आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. शिवाजी पार्क येथे महायुतीची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र यांनी संबोधित केले. या वेळी बोलताना त्यांनी मुंबई हे स्वप्नाचं शहर आहे. तर युती स्वप्न साकार करणारी महायुती आहे असं मोदी म्हणाले. मुंबईत गरीब, मध्यम वर्ग, आणि सामान्य माणूस आहे. ते एक काळ होता की स्वप्न ही बघू शकत नव्हते. पण आता ते स्वप्नही पाहात आहेत. आणि ती स्वप्नही पुर्ण करत आहेत. तुमच्या स्वप्नांसाठीच मी जगत आहे. ती पुर्ण व्हावीत यासाठी मी झटत आहेत असं मोदी यावेळी म्हणाले. या पुढेही जनतेसाठी आपण काम करत राहाणार असल्याचे ते म्हणाले. 

 

यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. आघाडी ध्रुविकरणाचे राजकारण करत आहेत. त्याचे ते गुलाम झाले आहेत. मात्र संपुर्ण महाराष्ट्रात प्रचारासाठी मी फिरलो आहे. लोकां बरोबर संवाद साधला आहे. त्यात महायुतीचे सरकार येताना स्पष्ट पणे दिसत आहे असे मोदी यावेळी म्हणाले. 

 

येत्या महायुतीच्या सरकार स्थापन करतेवेळी आपण सर्वांना उपस्थित राहावे यासाठी मी निमंत्रण देत आहे असेही नरेंद्र मोदींनी यावेळी आपल्या ओघवत्या भाषणात सांगितले. ते म्हणाले की, महाराष्ट्रातली ही माझी शेवटची सभा आहे. प्रचारासाठी मी संपुर्ण महाराष्ट्रात फिरलो आहे. यावेळी प्रत्येक भागातल्या लोकांशी संवाद साधला आहे. आता मी आमच्या मुंबईत आहे. पुर्ण महाराष्ट्राचा आशिर्वाद महायुती बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी एकच आवाज आहे भाजपा महायुती आहे तर गती आहे. महाराष्ट्राची प्रगती आहे. तत्पूर्वी मोदींनी भाषणाची सुरूवात मराठीतून केली. मुंबईकर बंधु आणि बहीणीनो, माझा तुम्हाला नमस्कार, राम राम, जय श्रीराम असं ते म्हणाले. शिवाय  सिद्धिविनायक, मुंबादेवी, महालक्ष्मीच्या पाया पडतो असं म्हणत त्यांनी भाषणाला सुरूवात केली.

 

नरेंद्र मोदी म्हणाले की, महाराष्ट्रातून नव्या नव्या गोष्टी प्रत्येक वेळी समोर आल्या आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत ज्ञानदेव, छत्रपती  शिवाजी महाराज यांनी सर्वांना प्रेरणा दिली आहे. टिळक -आगरकरांसारखे समाज सुधारक याच भूमितून आले आहे. त्यांची विचारधार हिच आमची विचार धारा आहे असे मोदी यावेळी म्हणाले. त्यांच्या विचारांवर महायुतीला गर्व आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या गौरवाचा अपमान करत असताना दिसत  आहे असा आरोपही त्यांनी केला. आघाडी ध्रुविकरणाचे राजकारण करत आहे. याच आघाडीच्या लोकांनी राम मंदीराला विरोध केला. मतांसाठी यांनी भगवा आतंकवाद हा शब्द आणला. आघाडीने सावरकरांचा अपमान केला. कश्मीरमधील 370 कलम परत लागू करण्याचा प्रस्तावही आणला आहे. त्यांचा काश्मीरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान काश्मीरमध्ये लागू करण्यास विरोध आहे असा हल्लाबोलही यावेळी केला.  राजकारणात वार पलटवार होत असतात. ते आपण समजू शकतो. पण देशाची पेक्षा कोणताही पक्ष मोठा नसतो. पण काही हे आघाडीचे लोक देशा पेक्षा पक्षाला मोठं समजत आहेत. भारत प्रगती करत आहे. त्यामुळे या आघाडीच्या लोकांना त्रास होत आहे. ते नेहमी अनेक प्रश्न उपस्थित करत असतात. याच लोकांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळू दिला नाही. आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यानंतर यांच्या पोटात दुखू लागले असंही ते म्हणाले. त्यामुळे या आघाडी पासून सावध रहा असा सल्लाही मोदींनी यावेळी दिला. 

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले रोखठोक भाषण

 

या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्होट जिहादचा मुद्दा उपस्थित केला. व्होट जिहाद करत असेल तर व्होटाचं धर्मयुद्ध करण्याची करण्याची वेळ आली, आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. उलेमा बोर्डाच्या 17 मागण्या काँग्रेसनं मान्य केल्या, असं वृत्त मध्यंतरी प्रसिद्ध झालं होतं. त्या विषयावर बोलताना फडणवीसांनी काँग्रेसला या मागण्या तुम्ही वाचल्या होत्या का? हा प्रश्न विचारला. उलेमांच्या 17 मागण्या मान्य करताना तुम्ही त्या वाचल्या होत्या का? त्यामधील एक मागणी त्यांनी मान्य केलीय. त्यामध्ये  2012 ते 2024 या काळात महाराष्ट्रात ज्या दंगली झाल्या त्या दंगलीतील मुसलमान आरोपींना सोडून द्या अशी मागणी उलेमांनी केली. ती मागणी तुम्ही मान्य केली आहे, असा दावा फडणवीस यांनी केला. 

 

पुढच्या 5-7 वर्षांमध्ये माझा धारावीचा माणूस धारावीमध्येच पक्क्या, चांगल्या सुंदर घरात बसलेला आपल्याला पाहायला मिळेल. मोदींच्या प्रेरणेतून आपण 18 निर्णय घेतले. 1600 प्रकल्प येत आहेत. रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून 100 स्क्वेअर फुटांच्या घरात राहणाऱ्या माणसाला 500 स्क्वेअर फुटांचं घर मिळणार आहे असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात महायुतीच्या काळात मुंबईची वाहतूक सुरळीत करण्यासाठी केलेल्या सुविधा सांगितल्या. BDD चाळीचा पुर्नविकास, धारावीचं पुनर्विकास, अशा 100 गोष्टी मी सांगू शकतो, असं त्यांनी स्पष्ट केलं. 

 

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा घणाघात

 

दरम्यान, महायुतीची जाहीर सभा शिवाजी पार्क मैदानावर आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जोरदार फटकेबाजी केली. बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेसला विरोध केला. पण उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसलाच जवळ केली. बाळासाहेबांनी तुम्हाला हेच शिकवलं का असा खडा सवाल रामदास आठवले यांनी केला. तुम्ही आम्हाला सोडून गेला. गेलात तर जा पण शिंदे आमच्याकडे 40 आमदार घेवून आलेत असं ते म्हणाले. आता तुमची आम्हाला गरज नाही. आता अजित पवार ही आमच्याकडे आहेत असंही त्यांनी सांगितलं. यावेळी भाषणाची सुरूवात आठवलेंनी आपल्या चारोळीतून केली. ते म्हणाले मै यहा आया हूं, महायुती के उमेदवारोंको चुनके देने के लिये, और मै जा रहा हूं महाविकास आघाडी का बदला लेने के लिए. आर.पी.आय. महायुती सोबत आहेत. सध्या संविधान बदलाचं बोललं जात आहे. पण संविधान कोणी बदलू शकत नाही. राहुल गांधी चुकीचं बोलत आहेत. मी त्यांना सांगतो कोणी संविधान बदलू शकत नाही. जे संविधान बदलण्याचा प्रयत्न करतील त्यांना आम्ही अद्दल घडवू. मोदींनी संविधान मजबूत केलं असंही आठवले यावेळी म्हणाले. परदेशी लोकांनी आम्हाला संविधान शिकवू नये. राहुल गांधी यांच्या हातात नेहमी संविधानाचे पुस्तक असते. पण त्यात काय आहे हे त्यांना माहित नाहीत असंही ते म्हणाले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती