ध्येयविरहीत शिक्षणप्रणाली राष्ट्रासाठी घातक -डॉ. मनमोहन वैद्य
xtreme2day
19-10-2024 18:59:52
3436840
ध्येयविरहीत शिक्षणप्रणाली राष्ट्रासाठी घातक -डॉ. मनमोहन वैद्य
'अरूण रंग' पुस्तकाचे प्रकाशन
पुणे (प्रतिनिधी) - भौतिक प्रगतीसाठी उत्पन्नाचे साधन चांगले असायलाच हवे. मात्र तेच जीवनाचे ध्येय होऊ शकत नाही. समाज परिवर्तन हे आयुष्याचे ध्येय असायला हवे. दुर्दैवाने आजची शिक्षण प्रणाली ध्येयविरहीत झाली असून, साध्याला अधिक महत्त्व दिले जात आहे. ध्येयविरहीत शिक्षणप्रणाली राष्ट्रासाठी घातक आहे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य डॉ. मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले.
टिळक रस्ता येथील श्रीगणेश सभागृहात 'विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीच्या महाराष्ट्र प्रांता'च्या वतीने आयोजित 'अमृत मिलन' सोहळ्यात डॉ. वैद्य बोलत होते. कार्यक्रमात केंद्राचे जीवनव्रती विश्वास लपालकर यांच्या अनुभवांवर आधारीत 'अरूण रंग' पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सुनिल कुलकर्णी आणि कांचन जोशी यांनी विश्वास लपालकर यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमाला रा.स्व. संघाचे अखिल भारतीय सह-प्रचार प्रमुख प्रदीप जोशी, विवेकानंद केंद्राचे महासचिव भानुदासजी, विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाचे सचिव सुधीर जोगळेकर, केंद्राचे महाराष्ट्र प्रांताचे प्रमुख अभय बापट उपस्थित होते. अरूण रंग या पुस्तकाचे शब्दांकन दिलीप महाजन यांनी केले.
जीवनातील ध्येय आणि साध्य यात अंतर असल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले. ते म्हणाले, "डॉक्टर किंवा अभियंता बनविणे हे शिक्षणाचे साध्य असू शकते पण ध्येय नाही. समाज परिवर्तन हेच शिक्षणाचे ध्येय असायला हवे. एक व्यक्ती म्हणून आपले जीवन यशस्वी होण्यापेक्षा सार्थकी होणे आवश्यक आहे. समाजाचे सामाजिक भांडवल वाढवित राहणे, म्हणजे जीवन सार्थकी लागेल." असेही ते म्हणाले.
लखलखत्या दिव्यांच्या उजेडात आपला दिवा लावण्यापेक्षा, जिथे अंधार आहे, अशा ठिकाणी कार्य करावे, या भावनेने पूर्वांचलात जीवनव्रती म्हणून काम केल्याचे लपालकर यांनी यावेळी सांगितले. स्वामी विवेकानंदांचे कार्य प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. कारण आजच्या समाजाची अवस्था प्रत्येकाने उत्तिष्ठ जागृतः व्रत घेणे आवश्यक आहे, असे मत भानुदासजी यांनी व्यक्त केले.
पू्र्वांचलाबाबत खोटा नॅरेटीव्ह
आदिवासी समाज हा आपल्यापेक्षा जास्त संघटीत आणि सुसंस्कृत असल्याचे मत प्रदीप जोशी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले,"देशाच्या पूर्वांचल भागाबद्दल स्थानिकांपेक्षा बाहेरील नागरीकांनीच जास्त अपप्रचार करत खोटा नॅरेटीव्ह उभा केला. स्वतःचे कायदे, संस्कृती, नवतंत्रज्ञान आणि भाषा समृद्धीचा विचार असलेला आदिवासी समाज हा अधिक समृद्ध आहे. त्यांच्यातील सकारात्मक आणि सृजनात्मक गोष्टी उर्वरीत भारतीयांपर्यंत पोहोचायला हव्यात." या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेंद्र बोरकर यांनी केले.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.