xtreme2day 03-10-2024 20:11:43 3478667
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 'आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' नोंदणी उपक्रमाचा शुभारंभ बारामती (प्रतिनिधी) - 'आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना' नोंदणी उपक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती येथील वृंदावन लॉन्स येथे करण्यात आला. या अंतर्गत चार वाहनातून तालुकाभरात योजनेविषयी जनजागृती करण्यासह पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची माहिती तालुक्यातील ग्रामीण भागातील कुटुंबापर्यंत पोहोचविणे, त्या माध्यमातून नोंदणी करणे, लाभार्थीना 'आभा' कार्ड वितरित करणे आणि या योजनेच्या लाभाच्या अनुषंगाने माहिती देऊन जनजागृती करणे ही या उपक्रमाची वैशिष्ट्ये आहेत. हा उपक्रम राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असून त्यासाठी ४ नोंदणी व्हॅन एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या सौजन्याने पुरविण्यात आल्या आहेत. राज्यशासन हे मेडीकेअर हेल्थ सर्व्हिसेसच्या माध्यमातून नोंदणी उपक्रम राबविणार असून त्यासाठी प्रत्येक वाहनासाठी ४ स्वयंसेवक मानधन तत्त्वावर नेमण्यात आले आहेत, आदी माहिती यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांना देण्यात आली. यावेळी एचडीएफसी बँकेचे विभाग प्रमुख राजा उपाध्याय, पुणे व बारामतीचे सिटी हेड पियूष शेठ, मेडीकेअर हेल्थ सर्व्हिसेसचे समन्वयक कौस्तुभ बुटाला, नरेश चौधरी, संचालक डॉ. मिनल राघमवार, अभियान व्यवस्थापक सुनीता पवार आदी उपस्थित होते.
सरकारी योजनेतील आभा कार्ड रजिस्टर करून सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला असून आजपर्यंत आमच्या दोघांची आभा कार्ड आम्हाला मिळाली तर नाहीच, आणि आम्हाला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत किंवा हाॅस्पिटल मधून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही, आणि त्यातच माझ्या धर्म पत्नीचे आताच 15 दिवसांपूर्वी निधन झाले... अशा प्रकारे लोकांची फसवणूक तर करू नका. काय करायचे आभा कार्ड रजिस्टर करून, लोणचं घालायचं का ? म्हणे आभा कार्ड रजिस्टर केल्यानंतर दोन तीन महिन्यांत सेंट्रल वरून आभा कार्ड पोस्टाने घरी येईल, धर्म पत्नीचे निधन तर झाले आहे, मी सुद्धा हार्ट बायपास सर्जरी झालेला पेशंट आहे. डायबेटिस सुद्धा आहे, हाॅस्पिटल मध्ये खर्च करण्यासाठी मोठ मोठ्या रकमा आणायचे कुठून ? काय करू, काहीच मार्ग दिसत नाही. आमच्या दोघांच्या नावावर कोणत्याही कंपनीची मेडिकल पाॅलीसी नाही की मेडिक्लेम आणि हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी सुद्धा नाही.. आम्ही दोघेही पेशंट होतो आणि आता मी उरलो आहे, आणि आभा कार्ड येण्याची वाट पाहत आहे, मरेपर्यंत तरी सेंट्रल वरून आभा कार्ड मिळावे आणि चांगल्या हाॅस्पिटल मध्ये काही ईलाज कधी करता येईल का असे स्वप्न पाहत आहे.. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रोज धडाधड काही ना काही जनतेसाठी योजना सुरू करत तर आहेत, पण मला वाटतं की *एक ना धड पण भाराभर चिंध्या.* हा असला घाणेरडा प्रकार सध्याच्या सरकारने थांबवावा. जनतेच्या समस्या निवारण करा, जनतेला लाॅलीपाॅप दाखवणं बंद करा.