Xtreme Today 24-11-2026 18:42:58 294173294
पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होण्याआधी भाजपने अकाली दलासोबत केली युती; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनी केली घोषणा चंडीगढ (विशेष प्रतिनिधी) - भाजपने अकाली दलासोबत युती जाहीर केली आहे. पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होण्याआधी युती जाहीर करण्यात आली. या युतीची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनी केली. अमित शाह यांनी पत्रकार परिषद घेत घोषणा केली आहे. पत्रकार परिषदेत अमित शहा यांनी कर्तारपूर साहिब कॉरिडॉर पुन्हा सुरू करण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. एवढचं नाही तर त्यांनी कॉँग्रेसवर देखील निशाणा साधला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्तारपूर साहिब कॉरिडॉरवर भूमिका स्पष्ट केली आहे. अमित शाह म्हणाले, "भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पासून कर्तारपूर साहिब कॉरिडॉरची मागणी करण्यात येत आहे. जर त्या काळात भाजप पक्ष अस्तित्वात असता आणि सत्तेत असता तर आज कर्तारपूर कॉरिडॉर हा भारताचा भाग असता. कॉँग्रेसच्या निष्काळजीपणामुळे इतके पवित्र आणि महत्वाचे स्थळ आज भारताचा भाग नाही आहे." भाजपचा जुना साथीदार पुन्हा एकदा सत्ताधारी एनडीएमध्ये परतला आहे. पंजाबमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपनं शिरोमणी अकाली दलासोबत युती जाहीर केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनी युतीची घोषणा केली. पंजाबला अमली पदार्थ आणि भ्रष्टाचारापासून मुक्त करण्यासाठी युती केल्याचं अमित शहांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. ३१ डिसेंबर २०२९ पर्यंत पंजाब नशामुक्त करू अशी डेडलाईनही यावेळी शहांनी दिली. "2019 मध्ये पंतप्रधान मोदींनी कर्तारपूर साहिब कॉरिडॉर उभारला आणि आम्हीच तिथे तीर्थयात्रेची सुरुवात केली होती. ७० वर्षांपासून कर्तारपूर कॉरिडॉर उघडण्याची मागणी करण्यात येत होती. ही मागणी आम्हीच पूर्ण केली. मात्र ऑपरेशन सिंदूर नंतर जेव्हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा तो तात्पुरता बंद करण्यात आला. हा प्रश्न पूर्णपणे सूटताच, आम्ही संपूर्ण सन्मानासह कर्तारपूर साहिब कॉरिडॉर पुन्हा सुरू करु. दोन्ही बाजूच्या लोकांच्या धार्मिक भावना लक्षात घेतल्या जातील. कर्तारपूर साहिब कॉरिडॉरला पुन्हा सुरू करण्यासाठी सुरक्षा एजन्सी सोबत चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यांवर राजकारण करु नये." असेही त्यांनी स्पष्ट सांगितले.