तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडच्या दिग्गजांना दणका! शाहरूख खानसह अजय देवगण आणि टायगर श्रॉफने नियमांचं उल्लंघन केल्याचं स्पष्ट, कारवाई होणार
Xtreme Today
30-10-2026 18:51:42
435287293
तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडच्या दिग्गजांना दणका! शाहरूख खानसह अजय देवगण आणि टायगर श्रॉफने नियमांचं उल्लंघन केल्याचं स्पष्ट, कारवाई होणार
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्यासह अभिनेता अजय देवगण , टायगर श्रॉफ यांना ‘विमल इलायची’ची जाहिरात केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) काही महिन्यांपूर्वी नोटीस बजावली होती. याप्रकरणी आता महत्त्वाची माहिती समोर आली असून तिन्ही अभिनेत्यांनी जाहिरात करताना नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आलं आहे, अशी माहिती आज अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.
अभिनेत्यांवरील कारवाईबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना तुकाराम मुंढे म्हणाले की, "जाहिरात आणि दाव्यांबाबत आपण तीन अभिनेत्यांना जी नोटीस पाठवली होती, त्याबाबत आपण त्यांचं सर्व म्हणणं ऐकून घेतलं आहे. हे म्हणणं ऐकून घेतल्यानंतर ज्यांनी याबाबतची नोटीस पाठवली होती त्या सहाय्यक आयुक्तांनी याबाबत आपलं निरीक्षण नोंदवलं आहे. या अभिनेत्यांनी जाहिरात करताना नियमांचं उल्लंघन केल्याचं निदर्शनास आलं आहे," अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली आहे. त्यामुळे शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्यावर याप्रकरणी कायदेशीर कारवाई होणार, हे आता जवळपास निश्चित झालं आहे.
तुकाराम मुंढे यांनी पुढे म्हटलं की, याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार ज्यांना आहे, अशा सहआयुक्तांना हे प्रकरण देण्यात येणार असून पुढील आठवड्यापर्यंत हे प्रकरण त्यांच्याकडे जाईल. त्यानंतर सहआयुक्तांसमोर याप्रकरणी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात येईल. याप्रकरणी अभिनेते अजय देवगण यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली असून याचिका दाखल केली आहे, अशी माहितीही मुंढे यांनी दिली आहे. या तीनही अभिनेत्यांवर जाहिरातींमध्ये उत्पादनाचे कथित चुकीचे सादरीकरण केल्याचा आरोप आहे. विमल इलायचीची जाहिरात वरकरणी जाहिरात स्वरूपात असल्याचे दाखवण्यात येत असले, तरीही या ब्रँडचा संबंध पान मसाल्याशी निगडित आहे. त्या अनुषंगाने एफडीएकडून अभिनेत्यांना ऑगस्ट महिन्यात नोटीस पाठवण्यात आली होती. राज्यात पान मसाल्याच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर संबंधित प्रतिबंध लागू असल्याचे नोटिशीत स्पष्ट केले होती. अशा प्रकारे जाहिरात करण्यावर निर्बंध आहेत.
विमल पान मसाला/इलायची जाहिरातींमधील सहभाग, उत्पादनाचे समर्थन त्वरित थांबवण्यात यावे,’ असे नोटिशीत स्पष्ट केले होते. ‘त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावरून संबंधित जाहिरात, प्रचारात्मक मजकूर हटवावा किंवा त्याचा प्रसार थांबवावा. भविष्यात या जाहिरातीचे प्रसारण, प्रकाशन वा प्रचारासाठी कोणतेही सहकार्य करू नये, विमल इलायची हे स्वतंत्र उत्पादन आहे, की विमल पान मसाला/तंबाखू उत्पादनाच्या ब्रँड विस्ताराची जाहिरात आहे याविषयी कागदपत्रे सादर करावीत,’ असेही यात नमूद करण्यात आले होते.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.