मुक्त विद्यापीठा'च्या प्रवेशास २५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; एकाच वेळी दोन पदव्या घेण्याची सुवर्णसंधी!
Xtreme Today
17-09-2026 19:47:27
82139674
'मुक्त विद्यापीठा'च्या प्रवेशास २५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; एकाच वेळी दोन पदव्या घेण्याची सुवर्णसंधी!
पुणे (विशेष प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या १३३ विविध पदव्युत्तर पदवी, पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र शिक्षणक्रमांसच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांसाठी विनाविलंब शुल्कासह २५ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील जुलै सत्रासाठी ही ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू असून, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नवीन नियमानुसार विद्यार्थ्यांना नियमित पदवीसोबत दूरशिक्षणाद्वारे अधिकची एक पदवी घेता येणार आहे किंवा मुक्त विद्यापीठाच्याच दोन पदव्यांना एकाचवेळी प्रवेश घेता येणार आहे.
मुक्त विद्यापीठात विद्यापीठात पारंपारिक शिक्षणक्रमांसह नवीन आणि व्यावसायिक शिक्षणक्रम प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यात विशेषतः संगणकशास्त्र, विज्ञान व माहिती तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, ऑटोमोबाइल तंत्रज्ञान, शिपिंग मॅनेजमेंट, मीडिया ग्राफिक्स, नाट्यशास्त्र, पाली भाषा, सायबर क्राईम तपास, सहकार व्यवस्थापन, डेटा ॲनालिटिक्स, कार्यालयीन सहाय्यक (न्यायिक), मानवी हक्क, शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन, श्वानपालक प्रबोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, मूल्य शिक्षण, भारतीय ज्ञान प्रणाली, समुपदेशन आणि मानसिक स्वास्थ्य, योगशिक्षक आदी शिक्षणक्रम यांचा समावेश आहे.
या मुक्त विद्यापीठामध्ये निरंतर शिक्षण, मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे, विज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, कृषिविज्ञान, शिक्षणशास्त्र, आरोग्य विज्ञान, स्कूल ऑफ डिजिटल एज्युकेशन, संगणकशास्त्र, महाज्ञानदीप, ग्रामीण विकास व उद्योजकता, ललित कला केंद्र तसेच व्यावसायिक शिक्षण व कौशल्य विकास या १३ विद्याशाखांचे शिक्षणक्रम उपलब्ध आहेत.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.