मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता; ठिकठिकाणी आंदोलक आक्रमक
Xtreme Today
16-09-2026 20:45:41
386432686
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता; ठिकठिकाणी आंदोलक आक्रमक
पाटोदा/ पुणे (विशेष प्रतिनिधी) - माझ्या शरीरापेक्षा दौरा महत्त्वाचा नाही. दौरा रद्द करावा लागेल. माझ्या जागेवर कोणीही असू द्या, समाजासाठी एक बळी जाऊ द्या', असं मनोज जरांगे म्हणाले. जरांगेंच्या या शब्दांनी आंदोलनाचा संघर्ष टोकाला पोहोचला आहे याची प्रचिती पुण्यात दिसून आली. पुण्यात मराठा आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच घेराव घालण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी आले असला मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न मराठा आंदोलकांनी केला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत गोंधळ घालणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत तर दुसरीकडे राज्यभर मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता असून ठिकठिकाणी आंदोलक आक्रमक झाले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निवासस्थानी गणेशाचं दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी मराठा आंदोलकांनी या ठिकाणी जात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्नही यावेळी करण्यात आला.
पुणे पोलिसांनी हस्तक्षेप करत मराठा आंदोलकांना सुरुवातीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलकांची घोषणाबाजी सुरूच असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
मराठा आरक्षणाच्या लढ्याची धग मुंबईच्या दिशेने वाढत आहे, पण या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचंच शरीर आता होरपळून निघत आहे. 19 दिवसांचं उपोषण... हजारोंचा जनसमुदाय... आणि आरक्षणासाठी मुंबई गाठण्याचा निर्धार... पण पाटोद्यात पोहोचलेल्या जरांगेंची प्रकृती खालावली आहे. डॉक्टरांनी तपासणी केली, सलाईन लावलं. वडिलांच्या डोळ्यात अश्रू आहेत. पण जरांगेंचा मुंबई गाठण्याचा निर्धार मात्र कायम आहे. प्रश्न आता केवळ मुंबई गाठण्याचा नाही, तर प्रश्न आहे तो या आंदोलनाची पुढची दिशा काय? त्यातच मुंबई पोलिसांनी गणेशोत्सव आणि कायदा-सुव्यवस्थेचं कारण देत आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. त्यावर जरांगे उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याच्या तयारीत आहेत. त्यातच जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत, आपल्याला गोळ्या घालण्याचा कट रचला जात असल्याचा दावा केला. या सगळ्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, जरांगे मुंबईपर्यंत पोहोचतील? की प्रकृती त्यांना या लढ्यात अडवणार?
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 19 वा दिवस असून सध्या ते बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे आहेत. उपोषणामुळे अशक्तपणा आल्याने त्यांनी पाटोद्यात सलाईन घेतले असून पाणीही प्यायल्याचे त्यांनी स्वत: सांगितले. दरम्यान, डॉक्टरांकडून जरांगे पाटलांच्या प्रकृतीची तपासणी केली जात असून त्यांनी प्रवास करु नये असा सल्लाही देण्यात आला आहे. मात्र, जरांगे पाटील आपल्या मुंबई दौऱ्यावर ठाम असून उद्या आपण मुंबईसाठी रवाना होणार असल्याचं त्यांनी म्हटलं. मी मुंबईला जाणार आहे, थांबणार नाही, मुंबईसाठी मी उद्या दुपारी निघणार. आज मला जाता आला नाही, आजच्या ऐवजी मी उद्या दुपारी 1 नंतर मुंबईला जाणार आहे, अशी माहिती जरांगे पाटलांनी पत्रकार परिषदेतून दिली.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.