हिंदू सणांमध्ये डॉल्बी वाजलेच नाही पाहिजेत; संपूर्ण देशाने हे डॉल्बी फेकून दिले पाहिजेत - शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी
Xtreme Today
08-09-2026 20:11:38
189328981
हिंदू सणांमध्ये डॉल्बी वाजलेच नाही पाहिजेत; संपूर्ण देशाने हे डॉल्बी फेकून दिले पाहिजेत - शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी
कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) - सण हे धर्माची आणि राष्ट्राची आग मनात पेटवण्यासाठी असतात, केवळ करमणुकीसाठी नाहीत. "आपला धर्म आणि संस्कृती जपण्याची जबाबदारी आपलीच आहे. अश्लील डान्स आणि कर्कश संगीत हे आपल्या संस्कृतीचे भाग नाहीत," असे सांगत त्यांनी तरुणांना यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. या मुद्द्यावरून त्यांनी केवळ आयोजकांनाच नव्हे, तर अशा कार्यक्रमांना राजाश्रय देणाऱ्या राजकीय नेत्यांना कडक शब्दांत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी सुनावले आहे. त्यांच्या या विधानांमुळे आता सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून डीजे आणि डॉल्बी बंदीचा मुद्दा गाजत असताना संभाजी भिडे यांनी या वादात उडी घेतली आहे. "डॉल्बी आणि डीजेच्या या प्रचंड गोंधळातून नक्की काय साध्य होते? त्यातून देशाला काय मिळते?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लोकप्रतिनिधी अशा 'मूर्ख' गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणावर पैसा पुरवतात, असा आरोप करत त्यांनी ही 'काळी शक्ती' गाडण्यासाठी डॉल्बीचा त्याग करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
हिंदू सण आणि उत्सवांमध्ये वाढती व्यावसायिकता, डॉल्बीचा कानठळ्या बसवणारा आवाज आणि अश्लील नृत्यांच्या आयोजनावरून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. "हिंदू सणांमध्ये डॉल्बी वाजलेच नाही पाहिजेत; संपूर्ण देशाने हे डॉल्बी फेकून दिले पाहिजेत," अशा कडक शब्दांत त्यांनी डीजे प्रेमी आणि आयोजकांना फटकारले आहे. सण-उत्सवांच्या नावाखाली सुरू असलेल्या या प्रकारांमुळे संस्कृतीचा ऱ्हास होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. कोल्हापुरात एका आंदोलनाच्या निमित्ताने संभाजी भिडे गुरुजी आले होते. यावेळी बोलताना त्यांनी डॉल्बीसह नृत्यांगना नाचवण्यावर जोरदार टीकास्त्र सोडले.
दहीहंडी उत्सवात अलीकडच्या काळात महिला नृत्यांगनांना बोलावून त्यांच्या नृत्याचे कार्यक्रम आयोजित करण्याच्या प्रथेवर भिडे गुरुजींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. "दहीहंडी हा एक पवित्र हिंदू सण आहे. अशा कार्यक्रमात महिलांना नाचवणे हे अत्यंत चुकीचे असून, ज्यांनी डान्सर नाचवल्या, ते सर्व देशद्रोही आहेत," असा गंभीर आरोप त्यांनी केला. गौतमी पाटील किंवा राधा पाटील यांच्यासारख्या नृत्यांगनांच्या कार्यक्रमांवरून त्यांनी आयोजकांना लक्ष्य केले असून, असले प्रकार करणारे स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यास पात्र नाहीत, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.