Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 महाराष्ट्र

महागणेशोत्सव २०२६’: उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी होण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन; तालुका ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत भरघोस पारितोषिकांची संधी; अर्जाची अंतिम मुदत ७ सप्टेंबर

Xtreme Today   01-09-2026 18:51:03   535428893

'महागणेशोत्सव २०२६’: उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभागी होण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन; तालुका ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत भरघोस पारितोषिकांची संधी; अर्जाची अंतिम मुदत ७ सप्टेंबर

 

पुणे, (विशेष प्रतिनिधी) -  महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या निर्णयानुसार गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या वतीने ‘उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील नोंदणीकृत तसेच परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

यंदा स्पर्धेची व्याप्ती वाढवून तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा विविध स्तरांवर करण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना आपली सांस्कृतिक, सामाजिक व पर्यावरणपूरक कामगिरी सादर करून मोठ्या पारितोषिकांची संधी उपलब्ध होणार आहे.

 

*पारितोषिकांचे स्वरूप*

तालुकास्तर : प्रत्येक तालुक्यासाठी प्रथम क्रमांकास २५ हजार रुपये व प्रमाणपत्र.

जिल्हास्तर : प्रथम ५० हजार, द्वितीय ४० हजार आणि तृतीय ३० हजार रुपये.

राज्यस्तर : प्रथम ७.५० लाख, द्वितीय ५ लाख आणि तृतीय २.५० लाख रुपये.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तर : प्रथम ७.५० लाख, द्वितीय ५ लाख आणि तृतीय २.५० लाख रुपये अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

 

*१०० गुणांवर होणार मूल्यांकन*

 

स्पर्धेसाठी मंडळांच्या विविध उपक्रमांचे एकूण १०० गुणांवर मूल्यांकन केले जाणार आहे. त्यामध्ये 

कलेचे जतन व संवर्धन – २० गुण : गायन, वादन, नृत्य, नाट्य, लावणी, पोवाडा, दशावतार तसेच लुप्त होणाऱ्या पारंपरिक कलांचे जतन व सादरीकरणाचा समावेश असेल.

संस्कृतीचे जतन व संवर्धन – २० गुण : ग्रंथालय, दुर्मीळ वस्तूंचे प्रदर्शन, कवी संमेलन, पारंपरिक व देशी खेळ आदी उपक्रम असावेत.

निसर्ग व सार्वजनिक संपत्तीचे जतन – २० गुण : गडकिल्ले, राज्य व राष्ट्रीय स्मारके, वनांचे जतन, स्वच्छता मोहीम आणि पर्यावरण जनजागृती.

सामाजिक कार्य – २० गुण : महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक व वंचित घटकांसाठी उपक्रम, आरोग्य शिबिरे, रक्तदान, शिक्षण, कृषी व शासकीय योजनांचा प्रचार-प्रसार.

गणेशोत्सव आयोजनातील विधायकता – २० गुण : पर्यावरणपूरक मूर्ती व सजावट, प्रदूषणमुक्त परिसर, शिस्तबद्ध व्यवस्थापन, भाविकांसाठी पाणी व प्राथमिक उपचारांसारख्या सुविधा, ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम तसेच कार्यकारिणीत महिलांचा किमान ३० टक्के सहभाग यांचा विचार केला जाणार आहे.

 

संबंधित शासकीय यंत्रणेकडे नोंदणीकृत किंवा स्थानिक प्रशासनाकडून परवानाधारक असलेली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेच या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. इच्छुक मंडळांनी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या अधिकृत पोर्टलवर विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी आपली सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणपूरक बांधिलकी जपत या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. अधिक माहितीसाठी https://ganeshotsav.pldmka.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती