Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 महाराष्ट्र

मुंबई ते बंगळुरू 5 तासांत तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर 2 तासांत प्रवास, गडकरींचा मास्टर प्लॅन!

Xtreme Today   17-08-2026 20:58:53   325469350

मुंबई ते बंगळुरू 5 तासांत तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर 2 तासांत प्रवास, गडकरींचा मास्टर प्लॅन!

 

पुणे (विशेष प्रतिनिधी) - पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास अवघ्या दोन तासांत पूर्ण व्हावा, हे माझं स्वप्न असून त्यासाठी शानदार महामार्ग विकसित केला जात आहे, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. या सहापदरी महामार्गामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर आणि तिथून पुढे नागपूरपर्यंतचा प्रवास अत्यंत जलद आणि सुलभ होणार असून त्यासाठी विमानाची गरज नसले असंही गडकरी म्हणाले. तसेच मुंबई ते बंगळुरू हा प्रवास पाच तासात होईल, असे रस्ते बनवण्यात येत असल्याचं गडकरींनी सांगितलं. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील कार्यक्रमात 60 हजार कोटींच्या विविध रस्ते आणि महामार्ग प्रकल्पांची माहिती दिली. 

 

गडकरी यांनी सांगितले की, पुण्यात सध्या वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी येत्या दोन वर्षांत पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी तब्बल 60 हजार कोटी रुपयांच्या विविध रस्ते प्रकल्पांची कामे केली जाणार आहेत. यामध्ये 31 हजार 600 कोटी रुपयांच्या शिरूर ते पुणे प्रकल्पाचाही समावेश आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती दिली. हडपसर-यावत मार्गासाठी 5,265 कोटी रुपये, तळेगाव-चाकण-शिक्रापूर या 53 किमीच्या टप्प्यासाठी 4 हजार कोटी रुपये, तर शिरूर ते संभाजीनगर 192 किमी मार्गासाठी 15 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याशिवाय खेड ते नाशिक फाटा 30 किमीसाठी 8 हजार कोटी, रावेत ते नऱ्हे 6 हजार कोटी आणि पुणे ते सोलापूर मार्गासाठी 8 हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

 

रस्ते जाळ्याच्या विस्ताराबाबत बोलताना गडकरी म्हणाले की, अटल सेतू ते पागोटे चौक आणि तिथून पुढे पुण्यापर्यंत एक नवीन रस्ता विकसित केला जात आहे. या मार्गावरून पुढे बंगळुरूपर्यंत अवघ्या पाच तासांत पोहोचता येईल अशी व्यवस्था उभारली जात आहे. तसेच शिळफाटा ते पनवेल आणि जुन्या पुणे-मुंबई हायवेच्या सुधारणेवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यासाठी 60 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणि एआय (AI) च्या वापराचा पुनर्उच्चार गडकरींनी केला. सॅटेलाईटशी थेट जोडलेली वाहने रस्त्यांमधील त्रुटी आणि डिफेक्ट त्वरित शोधून काढतील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, पूर्वी मुंबई-पुणे प्रवासासाठी 6 ते 7 तास लागायचे, मात्र नवीन महामार्गामुळे हा वेळ दोन-अडीच तासांवर आला. चांगल्या दर्जाच्या रस्त्यांच्या सुविधा मिळवण्यासाठी टोल तर द्यावाच लागेल, असे मतही नितीन गडकरी यांनी  टोलच्या मुद्द्यावर व्यक्त केले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती