पायाभूत सुविधांच्या विकासामुळे २०३० पर्यंत पुणे देशाचे 'ग्रोथ इंजिन' बनणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Xtreme Today
18-07-2026 21:20:22
67388282
पायाभूत सुविधांच्या विकासामुळे २०३० पर्यंत पुणे देशाचे 'ग्रोथ इंजिन' बनणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
'तीन उन्नत मार्गांमुळे पुण्याची वाहतूक कोंडी व प्रदूषणाचा प्रश्न सुटणार' – केंद्रीय मंत्री नितीन गडक
पुणे (विशेष प्रतिनिधी) - पुणे शहर हे भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान (डीप टेक) आणि जागतिक क्षमता केंद्रांचे (जीसीसी) प्रमुख केंद्र बनण्याच्या मार्गावर असून सन २०३० पर्यंत पुणे हे देशातील अत्यंत आधुनिक शहर व प्रमुख विकास केंद्र (ग्रोथ इंजिन) म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शहराची वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राज्य शासनाने पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत या तीन महत्त्वपूर्ण उन्नत मार्ग प्रकल्पांना गती दिली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून 'बांधा, वापरा व हस्तांतरित करा' तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या या नाविन्यपूर्ण प्रकल्पांतून शासनाला अनुक्रमे ५००, ३०० आणि १५० कोटी असा एकूण ९५० कोटी रुपयांचा आगाऊ निधी प्राप्त होणार आहे. या प्रकल्पांमुळे पुण्याची वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल, असेही ते म्हणाले.

पुणे - शिरुर, तळेगाव - चाकण - शिक्रापूर, हडपसर - यवत या ३ उन्नत मार्गांच्या प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर व हडपसर-यवत या तीन महत्त्वपूर्ण प्रकल्पांमुळे पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर व विशेषतः औद्योगिक वसाहतींना जोडणाऱ्या रस्त्यांवरील समस्येवर कायमस्वरूपी उपाय मिळणार आहे. भविष्यातील सार्वजनिक वाहतुकीचा वेध घेत या तिन्ही उन्नत मार्गांवरून पुढील काळात मेट्रो नेण्याचे नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले.
या उन्नत मार्गांवरच भविष्यात मेट्रो मार्गिका उभारण्यासाठी आतापासूनच आवश्यक ती डिझाईन तयार केली आहे. यामुळे भविष्यात जेव्हा मेट्रोचे काम सुरू होईल, तेव्हा कोणताही अडथळा निर्माण होणार नाही व या एकत्रित रचनेमुळे मेट्रोच्या खर्चात किमान ४० टक्क्यांची बचत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नव्या पुरंदर विमानतळाशी जोडणी (कनेक्टिव्हिटी) वाढविण्यावरही शासनाचा भर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दिवेघाटामध्ये दुहेरी बोगदा तयार करून त्यातून रस्ता व मेट्रो नेल्यास पुरंदर विमानतळावर पोहोचण्याचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल व विनाअडथळा प्रवास शक्य होईल, यादृष्टीने विचार सुरु आहे. या विमानतळासाठी ५० टक्क्यांहून अधिक भूसंपादन पूर्ण झाले असून, देशाच्या इतिहासात इतक्या वेगाने भूसंपादन होण्याचा हा विक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच १७३ किलोमीटरचा बाह्य व ८६ किलोमीटरचा अंतर्गत वर्तुळाकार रस्ता (रिंग रोड) दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून यामुळे शहरातील वाहतूक कोंडी ३० टक्क्यांनी कमी होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पुणे व पीएमआरडीए क्षेत्राच्या पुढील ३० ते ४० वर्षांच्या विकासाचा विचार करताना पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक असल्याचे श्री. फडणवीस म्हणाले. वाढती लोकसंख्या लक्षात घेता केवळ पाण्याचे नवे स्रोत शोधण्यावर अवलंबून न राहता, वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यावर शासनाने भर दिला आहे. जायका व जागतिक बँकेच्या सहकार्याने अनेक जलशुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) उभारण्यात येत असून, नद्या व तलावांना प्रदूषित करणारे शहरी सांडपाणी शुद्ध करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविल्या जात असल्याची माहिती श्री. फडणवीस यांनी दिली.
पुणे शहर हे अभियांत्रिकी व नवउद्यमांचे (स्टार्टअप) प्रमुख केंद्र असून पुढील काळात ते अत्याधुनिक तंत्रज्ञान (डीप टेक) व जागतिक क्षमता केंद्रांचे (जीसीसी) प्रमुख हब बनेल. देशातील एकूण जीसीसीपैकी जवळपास ३५ टक्के केंद्रे एकट्या पुण्यात उभी राहत आहेत. इतर शहरांसारखी पुण्याची वाहतूक कोंडीची अवस्था होऊ नये, यासाठी हे सर्व प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण केले जातील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
पुणे ग्रँड टूरच्या माध्यमातून ६७० किलोमीटरचे उत्कृष्ट रस्ते तयार करण्यात आले आहेत. आता ग्रँड टूरला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाल्यामुळे पुण्याला केवळ जागतिक नकाशावरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावरही स्थान मिळाले आहे. त्यामुळे हे कामही अतिशय वेगाने पुढे नेणार आहोत. त्याचबरोबर पुणे शहरातील १३० किलोमीटर रस्त्यांचे उन्नतीकरण करण्याचाही प्रयत्न केला जात असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
*'तीन उन्नत मार्गांमुळे पुण्याची वाहतूक कोंडी व प्रदूषणाचा प्रश्न सुटणार' – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी*
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले, पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाची गंभीर समस्या दूर करण्यासाठी पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत हे तीन उन्नत मार्गांचे प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाची मोठी अडचण असल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे उन्नत मार्ग उभारले जात आहेत. या तिन्ही प्रकल्पांच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत असून, त्यामुळे पुण्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पांच्या उभारणीसाठी राज्य शासनाने दिलेल्या महत्त्वपूर्ण सहकार्याबद्दल गडकरी यांनी समाधान व्यक्त केले. या प्रकल्पांमध्ये वापरण्यात येणाऱ्या पोलाद आणि सिमेंटवरील राज्य शासनाच्या हिश्श्याचा वस्तू व सेवा कर माफ करण्यात आला आहे. तसेच, वाळू, खडी आणि अन्य बांधकाम साहित्यावरील स्वामित्व धन माफ करण्याबरोबरच भूसंपादन प्रक्रियेलाही शासनाने मोठे सहकार्य केले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळेच या प्रकल्पांना अपेक्षित गती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
रस्ते आणि पुलांच्या बांधकामात जागतिक दर्जाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला जात असल्याचे श्री.गडकरी यांनी सांगितले. मलेशियामध्ये विकसित करण्यात आलेल्या 'अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्समेंट काँक्रिट' या तंत्रज्ञानामुळे पुलांतील दोन खांबांमधील अंतर ३० मीटरवरून १२० मीटरपर्यंत वाढविणे शक्य झाले आहे. त्यामुळे खर्चात बचत होण्याबरोबरच एकाच खांबावर रस्ता, पूल आणि मेट्रो अशी अत्याधुनिक रचना उभारता येणार आहे. पुलांची सुरक्षितता आणि गुणवत्ता अबाधित राहण्यासाठी रबरी बेअरिंग्ज व एक्स्पान्शन जॉइंट्सच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड करू, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना दिल्या.
श्री. गडकरी म्हणाले, पुणे आणि मुंबईतील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी कमी करण्यासाठी उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारी वाहतूक शहराबाहेरून वळविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सुरत-नाशिक-अहिल्यानगर-सोलपू र या नव्या महामार्गामुळे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारी सुमारे ४० ते ४५ टक्के वाहतूक पुणे आणि मुंबईत प्रवेश करणार नाही. तसेच, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम ऐतिहासिक स्वरूपाचे झाले असून, या मार्गावर वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच ज्ञानेश्वरीत उल्लेख असलेल्या वृक्षांची लागवड करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
राज्यातील इतर महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांनाही गती देण्यात येत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. नाशिक फाटा ते खेड या ३० किलोमीटर लांबीच्या सुमारे ८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, भूसंपादन पूर्ण होताच कामाला सुरुवात केली जाईल. खंबाटकी घाटातील नवीन बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात असून, त्याचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार आहे. तसेच, जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ठाणे ते पुणे आणि पुढे शिरूरमार्गे छत्रपती संभाजीनगरपर्यंत जोडणाऱ्या सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या नव्या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
*पुण्याच्या विकासाला नवी गती देणारे मार्ग 'गेम चेंजर' ठरतील - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार*
उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार म्हणाल्या, पुण्याचा वाढता विस्तार आणि त्यामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर व हडपसर-यवत या तीन उन्नत महामार्ग प्रकल्पांमुळे पुण्याच्या विकासाला नवी गती मिळेल आणि हे मार्ग खऱ्या अर्थाने 'गेम चेंजर' ठरतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्व व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागल्याचे त्यांनी नमूद केले.
पुणे-शिरूर उन्नत मार्ग अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि बहुविध वाहतूक जोडणी या संकल्पनेवर आधारित असून, त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुकर होणार आहे. हडपसर-यवत मार्गामुळे वाहतुकीचा ताण कमी होऊन वेळेची बचत होईल, तर तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गामुळे औद्योगिक पट्ट्याला आधुनिक रस्ते संपर्क उपलब्ध होऊन मालवाहतुकीला वेग मिळेल तसेच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले.
पुणे हे केवळ विद्येचे माहेरघर नसून उद्योग, तंत्रज्ञान आणि रोजगाराचे महत्त्वाचे केंद्र म्हणून वेगाने विकसित होत आहे. पुणे मेट्रो, रिंग रोड, विमानतळाच्या नवीन टर्मिनलचा विस्तार, पिंपरी-चिंचवड व हिंजवडी आयटी पार्कचा विस्तार तसेच चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे काम प्रभावीपणे सुरू असल्याचे श्रीमती पवार यांनी नमूद केले.
नाशिक फाटा ते राजगुरूनगर उन्नत महामार्ग हा पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उत्तर महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे सांगून, भूसंपादनातील तांत्रिक अडचणी दूर करून हा प्रकल्पही लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी सूचना श्रीमती पवार यांनी केली.
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.भोसले म्हणाले की, पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर व हडपसर-यवत या तीन महत्त्वाकांक्षी उन्नत मार्ग प्रकल्पांमुळे पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. देशाला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था व महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सक्षम पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर शासनाचा भर असून, बदलत्या हवामानालाही तोंड देऊ शकणारी दर्जेदार कामे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येला, औद्योगिक विकासाला, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या विस्ताराला व शिक्षणासाठी येणाऱ्या नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन भविष्योन्मुख नियोजन करण्यात येत आहे. सासवड-पुरंदर विमानतळ, वाढती वाहतूक व शहराचा विस्तार विचारात घेऊन पुण्याला जागतिक दर्जाचे शहर बनविण्याचे उद्दिष्ट आहे. शहरात ३०० किलोमीटरहून अधिक लांबीच्या सायकल मार्गांच्या विकासालाही गती देण्यात येणार असल्याचे श्री. भोसले म्हणाले.
या प्रकल्पांमध्ये चौपदरी, सहापदरी व उन्नत मार्गांचा समावेश असून, हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक लांबीचा उन्नत मार्ग निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच राज्याने उभारलेल्या विविध पायाभूत सुविधांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही वेगळी ओळख निर्माण केल्याचे मंत्री भोसले यांनी नमूद केले.
यावेळी आमदार सर्वश्री श्रीमती उमाताई खापरे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, विक्रम काकडे, भीमराव अण्णा तापकीर, राहुल कुल, बापूसाहेब पठारे, सुनील कांबळे, चेतनजी तुपे, सुनील शेळके, बाबाजी काळे, हेमंतजी रासने, शंकरजी मांडेकर, शंकर जगताप, ज्ञानेश्वर कटके माऊली, पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, विभागीय आयुक्त शीतल तेली - उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी प्रास्ताविक केले.
*तिन्ही रस्ते प्रकल्पाचे वैशिष्ट्य :-*
पुणे–शिरूर महामार्ग प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय महामार्ग ७५३ एफ वरील सुमारे ५४ किलोमीटर मार्गाचा विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पात पहिल्या ३१ किलोमीटरमध्ये सहा पदरी उन्नत महामार्ग, तर स्थानिक वाहतुकीसाठी समांतर चार पदरी रस्ता विकसित केला जाणार आहे. उन्नत महामार्गाच्या सुरुवातीच्या सात किलोमीटर भागात भविष्यातील मेट्रो मार्गासाठीही तरतूद करण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे ते शिरूर प्रवासाचा कालावधी सुमारे दीड ते दोन तासांवरून ४५ ते ५० मिनिटांपर्यंत कमी होणार असून, वाहतूक अधिक सुरक्षित आणि गतिमान होईल.
हडपसर–यवत महामार्ग प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे ३१.५ किलोमीटर असून, त्यामध्ये सुमारे २५ किलोमीटरचा उन्नत बहुस्तरीय महामार्ग आणि सहा पदरी भूपृष्ठावरील रस्ता विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पात उरुळी कांचनपर्यंत भविष्यातील मेट्रो मार्गासाठीही स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे. तसेच हा मार्ग पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ आणि पुणे रिंगरोडशी जोडला जाणार असल्याने वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होऊन प्रवास सुलभ व सुरक्षित होईल.
तळेगाव–चाकण–शिक्रापूर कॉरिडॉर हा सुमारे ५३ किलोमीटर लांबीचा महत्त्वाचा प्रकल्प असून, त्याअंतर्गत सुमारे २६ किलोमीटरचा उन्नत बहुस्तरीय महामार्ग आणि ५३.२ किलोमीटर लांबीचा चार पदरी भूपृष्ठावरील रस्ता विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे जलदगती वाहने आणि स्थानिक वाहतूक स्वतंत्र मार्गाने होणार असल्याने वाहतूक कोंडी कमी होईल. चाकण औद्योगिक परिसर, पुणे रिंगरोड आणि राष्ट्रीय महामार्गांना प्रभावी जोडणी मिळाल्याने औद्योगिक, व्यापारी आणि लॉजिस्टिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, पुणे परिसरातील वाहतूक अधिक वेगवान, सुरक्षित आणि आधुनिक होणार आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.