Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 महाराष्ट्र

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष कार्यान्वित

Xtreme Today   16-07-2026 22:40:27   3254239

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष कार्यान्वित

 

पुणे, प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रम दि. २० जून २०२६ पासून सुरू असून हा कार्यक्रम प्रभावी व सुरळीतपणे राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विधानसभा मतदारसंघनिहाय मदत कक्ष  कार्यान्वित केले आहेत.

 

मतदारांना पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत आवश्यक माहिती, मार्गदर्शन तसेच अडचणींचे निराकरण करण्यासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनी अथवा ई-मेलद्वारे संपर्क साधता येणार आहे.

 

ग्रामीण भागातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर,भोर व मावळ या विधानसभा मतदारसंघांसाठी श्रीमती सुरेखा माने, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. ११), जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक १९५० तसेच [email protected] हा ई-मेल उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 

चिंचवड, पिंपरी व भोसरी या विधानसभा मतदारसंघांसाठी श्री. सचिन पवार, उपआयुक्त, निवडणूक विभाग, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याशी ८८८८००६६६६ या क्रमांकावर किंवा [email protected] या ई-मेलवर संपर्क साधता येईल.

 

तर वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कँटोन्मेंट आणि कसबा पेठ या विधानसभा मतदारसंघांसाठी श्रीमती प्राची कचरे, महापालिका सहाय्यक आयुक्त, पुणे महानगरपालिका या समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांच्याशी ०२०-२५५०६६४९ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा [email protected] या ई-मेलवर संपर्क साधता येईल.

 

मतदारांनी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून मतदार यादीतील आवश्यक दुरुस्त्या, माहिती अद्ययावत करणे अथवा इतर बाबींकरिता संबंधित मदत कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

 

 मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग - मतदार यादी अचूक व अद्ययावत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे सहकार्याचे आवाहन

 

 भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुणे जिल्ह्यात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६  प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने प्रशासनाकडून व्यापक स्तरावर काम सुरू असून या मोहिमेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) मोलाची साथ दिली आहे.

 

पुणे जिल्ह्यातील ९० लाख ८० हजार १७३ मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येत असून, त्यासाठी जिल्ह्यात ८ हजार ४१७ मतदान केंद्रांवर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) तसेच विविध राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) नियुक्त करण्यात आले आहेत.

 

ही प्रक्रिया अधिक जलद, सुलभ आणि अचूक पद्धतीने पूर्ण व्हावी यासाठी पुणे कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स अँड आर्ट्स (आझम कॅम्पस) आणि सेंट मीरा कॉलेज, पुणे येथील प्रत्येकी १५० विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला आहे. मोबाईल अॅप आणि संगणकीय प्रणालीचे ज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांकडून बीएलओंना गणना अर्जांचे वितरण, माहिती संकलन आणि डिजिटल नोंदणीसारख्या तांत्रिक कामात प्रभावी सहाय्य मिळत आहे. विद्यार्थी बीएलओंसोबत घरोघरी जाऊन मतदार पडताळणी प्रक्रियेत सक्रिय योगदान देत आहेत.

 

या उपक्रमामुळे मतदार पुनरीक्षण प्रक्रिया अधिक कार्यक्षम होण्यास मदत होत असून, प्रशासन आणि युवक यांच्यातील समन्वयाचे हे एक सकारात्मक उदाहरण ठरत आहे.

 

जिल्हा निवडणूक प्रशासनाने पुणे कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स अँड आर्ट्स (आझम कॅम्पस) आणि सेंट मीरा कॉलेज यांच्या धर्तीवर जिल्ह्यातील इतर सर्व महाविद्यालये व शिक्षण संस्थांनीही या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) तसेच इच्छुक विद्यार्थ्यांनी बीएलओंना सहकार्य करण्यासाठी पुढाकार घ्यावा, जेणेकरून तरुणांच्या सहभागातून पुणे जिल्ह्याची मतदार यादी अधिक अचूक व परिपूर्ण तयार करता येईल.

 

तसेच, ३० जून ते २९ जुलै या कालावधीत आपल्या परिसरात येणाऱ्या बीएलओंना मतदारांनी आवश्यक कागदपत्रे व अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे. मतदारांच्या सक्रिय सहभागातूनच अचूक, विश्वासार्ह आणि अद्ययावत मतदार यादी तयार होणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

 

 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती