Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 महाराष्ट्र

अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर राबविलेल्या विशेष मोहिमेत नांदेड, पुणे, बीड, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे धडक कारवाईत लाखो रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

xtreme2day   10-07-2026 22:52:41   164355904

अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर राबविलेल्या विशेष मोहिमेत नांदेड, पुणे, बीड, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे धडक कारवाईत लाखो रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

 

पुणे (विशेष प्रतिनिधी) - अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर ८ ते १० जुलैदरम्यान राबविलेल्या विशेष मोहिमेत नांदेड, पुणे, बीड, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे धडक कारवाईत लाखो रुपयांचा संशयास्पद साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच मुंबईत FDA ची मोठी कारवाई; नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ करणारा अटकेत; संभाजीनगरमधील धाडीत भेसळीची मोठी साखळी उघडकीस आली आहे. 

 

पुण्यातील शुक्रवार पेठेतून धक्कादायक प्रकार समोर आला. कोणताही परवाना नसताना मोठ्या प्रमाणावर भस्म आणि रस औषधांचे उत्पादन व विक्री सुरू असल्याची माहिती FDAला मिळाली होती. छापा टाकल्यानंतर औषधांवर बॅच क्रमांक, उत्पादकाचे नाव, मुदत अशा अनिवार्य नोंदीच नसल्याचे आढळले. मालकीची कागदपत्रेही सादर करता आली नाहीत. त्यामुळे ५०.३६ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

 

 दरम्यान, या मोहिमेतील सर्वाधिक मोठी कारवाई नांदेडमध्ये झाली आहे. पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त धाड टाकल्यानंतर 'अफराह कलेक्शन' या दुकानात पाकिस्तानमध्ये तयार झालेल्या ब्युटी क्रीमचा मोठा साठा आढळला. 'गोरी'सह विविध ब्रँडची ही सौंदर्यप्रसाधने विक्रीसाठी ठेवण्यात आली होती. संबंधित व्यापाऱ्याकडे खरेदीची वैध कागदपत्रे नसल्याने जवळपास ३९.७० लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरेपणाचं स्वप्न दाखवणारी पाकिस्तानात तयार झालेली ब्युटी क्रीम. कर्करोगाच्या रुग्णालाही बाहेरून औषध खरेदी करू न देणारी मेडिकल स्टोअर्स. तर दुसरीकडे कोणताही परवाना नसताना लाखोंच्या आयुर्वेदिक औषधांचं उत्पादन. महाराष्ट्रात अवघ्या तीन दिवसांत उघडकीस आलेल्या या प्रकारांनी अन्न व औषध प्रशासनालाही धक्का बसला आहे. 

 

बीडमध्ये 'मेरा रूप श्रृंगार क्रीम' या उत्पादनावर त्वचा उजळणे, डाग कमी होणे अशा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आढळल्या. संबंधित उत्पादनाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून ३६ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र कारवाईचा केंद्रबिंदू ठरले हॉस्पिटलमधील मेडिकल स्टोअर्स. सोलापूरच्या नोबल हॉस्पिटलमधील मेडिकल स्टोअरमध्ये रुग्णांना तेथूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याची तक्रार खरी ठरली. तपासात प्रिस्क्रिप्शन न देणे, नियमबाह्य औषधविक्री, एक्सपायरी औषधांची अयोग्य साठवण यांसह अनेक गंभीर त्रुटी आढळल्याने स्टोअरला स्टॉप अॅक्टिव्हिटीचे आदेश देण्यात आले. छत्रपती संभाजीनगरमधील एका कर्करोगाच्या रुग्णाला केमोथेरपीसाठी आवश्यक इंजेक्शन बाहेरून खरेदी करण्यास मज्जाव केल्याचा प्रकारही समोर आला. त्यानंतर झालेल्या तपासणीत मेडिकल स्टोअरमध्ये अनेक गंभीर नियमभंग आढळल्याने संबंधित विक्री परवाना रद्द करण्याचे आदेश देण्यात आले.अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर अशा प्रकारच्या बिनपरवान्याच्या, बनावट किंवा दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या औषधे व सौंदर्यप्रसाधनांविरोधातील मोहीम आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. संशयास्पद उत्पादनांची माहिती नागरिकांनी जवळच्या FDA कार्यालयात देण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

 

मुंबईत FDA ची मोठी कारवाई; नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ करणारा अटकेत; संभाजीनगरमधील धाडीत भेसळीची मोठी साखळी उघड

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभर भेसळखोरांवर धाडसत्र सुरू असून राजधानी मुंबईतही मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील दहिसर परिसरात दूध भेसळीविरोधात धडक कारवाई करून एकाला अटक करण्यात आली आहे. तसंच दहिसर पोलिस स्टेशन येथे एफ.आय.आर दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण ४७० लीटर दूध नष्ट करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत दूध भेसळ करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे. फुलंब्री येथील सिद्धेश्वर दूध डेअरीवर कारवाई केली. ४९६ कि.ग्रॅ. Govardhan Whey Permeate Powder आणि Mlekpol Whey Permeate Powder च्या आधारे भेसळयुक्त दुध बनवून विकत असल्याचं समोर आलं आहे. भेसळयुक्त दूध व पावडर जप्त करून २ आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.

दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी मागील काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाकडून राज्यभरात धाडसत्र सुरू आहे. विविध दुकानांवर धाडी टाकण्यात येत असताना आता एफडीएने थेट मोठ्या कंपन्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बुधवारी इंदापूर आणि मंचर परिसरातील दोन बड्या दुग्धजन्य पदार्थ उत्पादक कंपन्यांची तपासणी केली. यापूर्वी कारवाई झालेल्या दूध संकलन केंद्र, दूध शीतकरण केंद्र (चिलिंग सेंटर) किंवा संबंधित आस्थापनांकडून या कंपन्या दूध खरेदी करतात का, त्यांच्याशी कोणताही व्यावसायिक संबंध आहे का, तसेच भेसळयुक्त दूध पुरवठ्याशी काही सबंध आहे का, याची पडताळणी करण्यासाठी तपासणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. एफडीए’च्या पथकाने दूध खरेदीच्या नोंदी, पुरवठादारांची माहिती, गुणवत्ता याबातची तपासणी केली. ही मोहीम आणखी दोन दिवस सुरू राहणार असून, त्यानंतर मिळालेल्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. एफडीए आणि पोलिस प्रशासनाने रविवारी पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे जिल्ह्यांतील १३ आस्थापनांवर धाडी टाकून कारवाई केली होती. तपासात पाणी, स्किम्ड मिल्क पावडर, व्हे (डेअरी परमिएट) पावडर, इमल्सिफायर, डिटर्जंट किंवा शाम्पू, पामतेल यांचे मिश्रण करून कृत्रिम दूध तयार केले जात होते. हे कृत्रिम दूध नैसर्गिक दुधात मिसळून बाजारात विकले जात असल्याचे तपासात उघड झाले होते, असे ‘एफडीए’च्या पथकाने केलेल्या तपासणीत उघड झाले होते. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (कात्रज डेअरी) संदर्भातील तक्रारींची सखोल चौकशी करून, दोन महिन्यांत अहवाल सादर करण्यात येईल. चौकशीत बोगस दूध संस्था, आर्थिक गैरव्यवहार किंवा अन्य अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत दिली.

 

राज्यातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ, कृत्रिम दूधनिर्मिती आणि अन्नसुरक्षा नियमांच्या उल्लंघनाला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर कठोर मोहीम हाती घेतली आहे. नव्या आदेशानुसार, कच्च्या दुधाच्या विक्रीसाठी स्वतंत्र नियम लागू करण्यात आले असून प्रत्येक पात्रावर ‘कच्चे दूध’ असा स्पष्ट उल्लेख आणि “हे दूध सेवनापूर्वी उकळणे आवश्यक आहे” अशी सूचना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. पाश्चराइज्ड दूध हे केवळ सीलबंद, लेबलयुक्त आणि छेडछाड न होणाऱ्या पॅकेजिंगमध्येच विकता येणार आहे. तसेच दूध संकलनापासून अंतिम विक्रीपर्यंत संपूर्ण पडताळणी, शीतसाखळीचे पालन, योग्य अन्न प्रक्रिया उपकरणांचा वापर आणि अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शुक्रवारी राज्यव्यापी दूध पुरवठा साखळीतील प्रत्येक घटकासाठी कठोर नियम लागू केले आहेत. या आदेशानुसार दूध संकलन केंद्रे, डेअऱ्या, प्रक्रिया उद्योग, वाहतूकदार, वितरक तसेच घाऊक आणि किरकोळ विक्रेते यांना नव्या नियमांचे पालन बंधनकारक राहणार आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती