Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 महाराष्ट्र

चैतन्य मूर्ती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि संत मुक्ताई यांच्या पालखीने पुण्यनगरी गलबजली! उस्फूर्त स्वागताने वारकरी भारावले! पुणेकर सुखावले !!

xtreme2day   09-07-2026 23:19:34   572881092

चैतन्य मूर्ती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि संत मुक्ताई यांच्या पालखीने पुण्यनगरी गलबजली! उस्फूर्त स्वागताने वारकरी भारावले ! पुणेकर सुखावले !! 

पुणे (विशेष प्रतिनिधी) - आज चैतन्य मूर्ती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज आणि संत मुक्ताई यांच्या पालखीने पुण्यनगरी गलबजली! उस्फूर्त स्वागताने वारकरी भारावले ! पुणेकर सुखावले !! 

योगायोगाने आज गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पडत असलेल्या पावसाने उसंत घेतली होती त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा लहान थोर बालक आणि जिल्ह्यातील बहुतांशी नागरिकांनी स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती संतोष श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु संत तुकाराम आणि मुक्ताईच्या पालख्या आल्यानंतर लोकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले आणि पुष्प अर्पण केले. 

 

पुणे महानगरपालिका आणि स्थानिक प्रशासनाने पालख्यांच्या निमित्ताने मोठी तयारी केलेली दिसून आली. पोलीस यंत्रणाने सुरक्षा व्यवस्था मजबूत ठेवली आहे. आज पासून सलग दोन दिवस पालख्यांचा मुक्काम पुण्यात असणार आहे येत्या शनिवार, दिनांक 11 रोजी सर्व पालख्यांचे प्रस्थान श्रीक्षेत्र पंढरपूरकडे होणार आहे. 

 

पालखीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ५७ हिरकणी कक्ष-दोन वर्षे पर्यतच्या बालकांसाठी बाळकृष्ण कोपरा व खेळणी संच

 संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराज महाराज पालखीच्या पार्श्वभूमीवर गरोदर व स्तनदा माता आणि लहान बालकांकरिता पुणे जिल्ह्यात एकूण ५७ हिरकणी कक्ष उभारण्यात आले असून याकरिता ७ बालविकास प्रक्लप अधिकारी, ५७ अंगणवाडी पर्यवेक्षिका, १९८ गणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे यांनी दिली. 

 

या हिरकणीकक्षाअंतर्गत २ वर्षे पर्यतच्या बालकांसाठी बाळकृष्ण कोपरामध्ये राजगिरा, शेंगदाणा, मुरमुऱ्याचे लाडु फुटाणे, फळे, बिस्किट, ओरआरएस, ग्लुकॉन डी, खाऊ ठेवण्यासाठी बरण्या, कागदी डिश आदी, खेळणी संचामध्ये बॅट बॉल. खुळखुळा. बाहुली. मोठा बॉल व लहान मुलांची इतर आवश्यक खेळणी आदी, गरोदर व स्तनदा मातांना अल्हाददायी वातावरणासाठी बेड, गाद्या, बेडशीट. उश्या. उशीचे कव्हर, पार्टिशन साठी मोठे पडदे आणि नॅपकीन, प्रथमोपचार पेटी , पिण्याच्या पाण्याचे जार व ग्लास व सॅनेटरी पॅड या सुविधा आहेत. 

 

पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या गरोदर व स्तनदा माता आणि लहान बालकांना हिरकणी कक्षांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. खंडागळे यांनी केले आहे.

 

पालखी प्रस्थान सोहळ्यानंतर आळंदी नगर परिषदेच्यावतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम

 संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर तसेच पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्यानंतर आळंदी नगरपरिषदेमार्फत संपूर्ण शहरात युद्धपातळीवर स्वच्छता व निर्जंतूकीकरणाची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली आहे. 

 

पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांना कोणताही त्रास होऊ नये तसेच वारकऱ्यांची मोठी गर्दी लक्षात घेऊन नगर परिषदेमार्फत मध्यरात्रीच्या वेळेत साफसफाई, कचरा संकलन व वाहतुकीची कामे सातत्याने करण्यात आली. ज्या ठिकाणी दिंड्या मुक्कामी होत्या, जर्मन हँगर उभारण्यात आले होते तसेच मोबाईल शौचालयांची व्यवस्था करण्यात आली होती, त्या सर्व ठिकाणांची तात्काळ स्वच्छता करून परिसर पूर्ववत करण्यात आला आहे.

 

सध्या शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा संकलनाचे काम सुरू असून, अलीकडील पूरपरिस्थितीमुळे घाट परिसरात व नदीकाठावर साचलेला गाळ, कचरा व जलपर्णी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी सुमारे ४०० सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, जेसीबीच्या सहाय्याने घाट परिसरातील जलपर्णी व गाळ हटविण्याचे काम सुरू आहे.

 

यासोबतच शहरात निर्जंतुकीकरणासाठी जंतुनाशक औषधे व बीएचसी (पावडर फवारण्यात येत असून, दुर्गंधी दूर करण्यासाठी आवश्यक औषधांचीही फवारणी करण्यात येत आहे. रस्त्यांवर साचलेला गाळ व कचरा हटवून अग्निशमन दलाच्या वाहनांच्या सहाय्याने रस्ते धुऊन स्वच्छ करण्यात येत आहेत.

 

पूरामुळे अनेक दुकाने व व्यावसायिक आस्थापनांमध्ये गाळ साचला होता. अशा ठिकाणीही नगर परिषदेमार्फत स्वच्छता करण्यात येत असून, दुर्गंधी दूर करण्यासाठी ओडोफ्रेशसह आवश्यक औषधांची फवारणी केली जात आहे. शहरातील सर्व प्रकारचा कचरा संकलित करून त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याचे कामही सुरू आहे.

 

विशेष म्हणजे, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथाचा मार्ग पूर्णपणे स्वच्छ, सुरक्षित व अडथळामुक्त राहावा यासाठी संपूर्ण पालखी मार्ग रातोरात स्वच्छ करण्यात आला. नागरिकांचे आरोग्य, स्वच्छता व सार्वजनिक सुरक्षितता यांना सर्वोच्च प्राधान्य देत आळंदी नगर परिषद सर्व आवश्यक उपाययोजना सातत्याने राबविण्यात येत आहे.

 

 सर्व स्वच्छता, कचरा संकलन, निर्जंतुकीकरण व पूरपश्चात पुनर्स्थापना कामे नगराध्यक्ष प्रशांत कुराडे, मुख्याधिकारी माधव खांडेकर तसेच स्वच्छता निरीक्षक दत्ता गायकवाड यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शन व देखरेखीखाली युद्धपातळीवर सुरू असून, शहरातील जनजीवन लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी आळंदी नगर परिषदेमार्फत सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने आवश्यक ती कार्यवाही सातत्याने करण्यात येत आहे, अशी माहिती श्री. खांडेकर यांनी दिली आहे.

 

पालखी मार्गाच्या स्वच्छतेसाठी महापालिकेची व्यापक मोहीम; अवघ्या दोन तासांत संपूर्ण पालखी मार्ग केला स्वच्छ*

 

 जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहरातील संपूर्ण पालखी मार्गाची स्वच्छता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने नियोजनबद्ध आणि युद्धपातळीवर राबविलेल्या मोहिमेतून पूर्ण केली. पालखीचे शहरात आगमन होण्यापूर्वी तसेच प्रस्थानानंतर अवघ्या दोन तासांत पालखी मार्ग आणि परिसराची संपूर्ण स्वच्छता करून शहरातील स्वच्छता व्यवस्था पूर्ववत करण्यात आली.

 

वारीदरम्यान शहरात मोठ्या संख्येने येणाऱ्या वारकरी बांधवांच्या सुविधा आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने पालखी मार्गावर तात्पुरती स्वच्छतागृहे, स्नानगृहे तसेच आवश्यक स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या सुविधांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि देखभाल आरोग्य विभागामार्फत करण्यात आल्या होत्या.

 

या मोहिमेत महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सलग काम करत पालखी मार्ग स्वच्छ ठेवला. विविध स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून महापालिकेच्या प्रयत्नांना बळ दिले.

 

सीवायडीए, बिसलेरी, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल गव्हर्नमेंट, संस्कार प्रतिष्ठान, ईसीए, प्रतिभा कॉलेज, संजीवनी स्वयंसेवी संस्था, अंकुश फाऊंडेशन, ज्ञानगंगा फाऊंडेशन, अल्फा फाऊंडेशन, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, म्हाळसाकांत विद्यालय, ह्यूमन राईट्स असोसिएशन, संत निरंकारी मंडळ, निर्मल वारी, यशस्वी ग्रुप, आरंभ महिला बचत गट, यशोधरा महिला बचत गट, पिंची संस्था, निर्मल फ्लॉवर फाऊंडेशन, लाईट हाऊस कम्युनिटी फाऊंडेशन, उमंग फाऊंडेशन, गुणवंत कामगार मंडळ, पितृछाया ट्रस्ट आणि एस.एन.बी.पी. कॉलेज आदी संस्थांनी या मोहिमेत सहकार्य केले.

 

याबाबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे म्हणाले, "वारी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. वारकरी बांधवांना स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने सर्व यंत्रणा कार्यरत ठेवली. प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त सहभागातून स्वच्छ वारीचा आदर्श निर्माण झाला."

 

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, "पालखी मार्गावरील स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, निर्जंतुकीकरण आणि तात्पुरत्या स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले होते. अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली."

 

अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम म्हणाले, "लोकसहभागामुळेच अशा उपक्रमांना व्यापक यश मिळते. विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे पालखी मार्गाची स्वच्छता वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करता आली."

 

उपआयुक्त (आरोग्य) डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले, "पालखी सोहळ्यादरम्यान स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यात आला होता. पालखी मार्गावर तैनात स्वच्छता पथके, तात्पुरत्या स्वच्छतागृहांची नियमित देखभाल, निर्जंतुकीकरण आणि त्वरित कचरा उचल यामुळे वारकरी बांधवांना स्वच्छ व आरोग्यदायी सुविधा उपलब्ध करून देता आल्या. या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे."

 

वारीनंतर पालखी मार्ग आणि परिसराची तातडीने स्वच्छता करून शहरातील स्वच्छता व्यवस्था पूर्ववत करण्यात आली. या उपक्रमातून महापालिकेने 'स्वच्छ वारी, सुंदर वारी' हा संदेश प्रभावीपणे दिला.

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने गेल्या अनेक वर्षांपासून आषाढी वारीदरम्यान पालखी मार्गाची स्वच्छता राखणे आणि वारकरी बांधवांना आवश्यक स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची परंपरा सातत्याने जपली आहे. यंदाही त्याच परंपरेचा आदर्श कायम राखत नियोजनबद्ध, जलद आणि प्रभावी स्वच्छता मोहीम राबवून वारकरी सेवा आणि स्वच्छतेचा उत्कृष्ट समन्वय साधला

 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती