'चैतन्य मूर्ती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आळंदी मंदिर परिसरात; टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात वारकरी चिंब! 'ज्ञानोबा माऊली', 'माऊली, माऊली' चा गजर
xtreme2day
08-07-2026 20:47:33
374532675
'चैतन्य मूर्ती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आळंदी मंदिर परिसरात; टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात वारकरी चिंब! 'ज्ञानोबा माऊली', 'माऊली, माऊली' चा गजर

पुणे (विशेष प्रतिनिधी) - चैतन्य मूर्ती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी येथील संजीवन समाधी मंदिरामध्ये ज्ञानेश्वर आळंदी येथील मंदिर परिसरात टाळ-मृदुंगाच्या तालावर भक्तिरसात चिंब झालेले वारकरी, 'ज्ञानोबा माऊली', 'माऊली, माऊली' चा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका घेतलेले वारकरी अशा भक्तिमय वातावरणाची अनुभूती वारकऱ्यांना अनुभवाला मिळत आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत विधीवत पूजा करण्यात आली, यावेळी त्यांनी पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उप विभागीय अधिकारी अनिल दौंडे, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ, पालखी सोहळा प्रमुख तथा विश्वस्त ऍड. राजेंद्र उमाप, विश्वस्त चैतन्य लोंढे, डॉ. रोहणी पवार, पुरूषोत्तम पाटील आदी उपस्थित होते.
आळंदी परिसरात येणाऱ्या भाविकांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामध्ये सार्वजनिक आरोग्य सुविधा, निवारा, शौचालय, पिण्याचे पाणी, हिरकणी कक्ष, महिला स्नानगृह, मोबाईल चार्जिंग चार्जिंग स्टेशन, चौकाचौकात पोलीसांचा कडेकोड बंदोबस्त, स्वच्छता पथक तैनात, भाविकांना सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपण उद्घोषण यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा याला भाविकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
‘सेवा वारी’ उपक्रमांतर्गत पालखी सोहळ्यासाठी पुणे महानगरपालिका सज्ज; वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांमध्ये मोठी वाढ
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा गुरुवार, ९ जुलै २०२६ रोजी पुणे शहरात दाखल होणार असून वारकरी भाविकांच्या स्वागतासाठी व सेवेसाठी पुणे महानगरपालिकेने ‘सेवा वारी’ हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम, .अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर, ओमप्रकाश दिवटे, पालखी नोडल अधिकारी निखिल मोरे आणि उपायुक्त माधव जगताप यांनी पालखीच्या अंतिम मुक्कामस्थळांची पाहणी करून सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे.
यंदा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या मुक्कामस्थळी उपलब्ध जागा पाचपट वाढवून ५ हजार चौ. फूट करण्यात आली आहे. या विस्तारित जागेत महिला व पुरुष वारकऱ्यांसाठी स्वतंत्र व सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे.
पालखी सोहळ्याच्या इतिहासात प्रथमच विशेष जर्मन हँगर उभारण्यात आला असून, लांबचा प्रवास करून आलेल्या वारकऱ्यांना फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांमार्फत मोफत फिजिओथेरपी व मालिश सेवा देण्यात येणार आहे.
शहरातील विविध ठिकाणी वारकऱ्यांच्या सोयीसाठी १९५ वॉटरप्रूफ मांडव उभारण्यात आले आहेत. या मांडवांमधून पुणे महानगरपालिका व स्थानिक नागरिकांच्या सहभागातून आवश्यक साहित्य व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
शहरात आगमन होणाऱ्या वारकरी बांधवांच्या निवासासाठी पुणे महानगरपालिकेच्या १०१ शाळा खुल्या करण्यात आल्या असून, तेथे निवासाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सर्व शाळांमध्ये मनपाच्या आरोग्य पथकांकडून चोवीस तास मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार व औषध पुरवठा केला जाणार आहे.
वारीच्या कालावधीत शहरातील पाणीपुरवठ्यात विशेष वाढ करण्यात आली असून, वारकऱ्यांना पाण्याची कमतरता भासू नये यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता घेण्यात आली आहे. मार्गावरील व मुक्कामस्थळी मोठ्या संख्येने मोबाईल शौचालये उपलब्ध करून देण्यात आली असून, त्यांची स्वच्छता राखण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी चोवीस तास कार्यरत राहणार आहेत.
पुणे महानगरपालिका ‘सेवा वारी’ उपक्रमाच्या माध्यमातून वारकरी भाविकांना अधिकाधिक व सर्वोत्तम सेवा-सुविधा पुरविण्यास कटिबद्ध आहे. मनपाचे सर्व वरिष्ठ अधिकारी, नोडल अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष मैदानात उतरून कार्यरत असून, पुणेकर नागरिकांनीही माऊलींच्या सेवेत उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
संत श्री ज्ञानेश्वर महाराज व संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्या ९ जुलै रोजी पुणे शहरात एकत्रित येणार असून, १० जुलै रोजी मुक्काम आणि ११ जुलै रोजी पुणे शहराबाहेर प्रस्थान करणार आहेत. पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने वारकरी पायी सहभागी होत असल्याने वाहतूक सुरक्षित, सुरळीत व नियोजनबद्ध राहावी यासाठी पुणे शहरात विशेष वाहतूक व्यवस्थापन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचा वापर करून पोलीस उपआयुक्त (वाहतूक) डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी ९ जुलै रोजी पहाटे ००.०१ वाजल्यापासून ते ११ जुलै २०२६ रोजी रात्री २४ वाजेपर्यंत पालखी मार्ग व परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहने (अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका, पेट्रोल-डिझेल वाहतूक करणारी वाहने, लग्नसमारंभाची वाहने आदी) या निर्बंधातून वगळण्यात आली आहेत.
समर्थ वाहतूक विभागांतर्गत खालील मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांच्या प्रवेशास मनाई करण्यात आली आहे
इनामदार चौक, समाधान चौक, नाना चावडी व चाचा हलवाई चौकाकडुन अरुणा चौककडे सर्व प्रकारची वाहने घेऊन जाणेस मनाई करण्यात येत आहे. मनुषा मस्जिद चौककडून पारशी अग्यारी चौकाकडे वाहने घेऊन जाण्यास मनाई करण्यात येत आहे. पारशी आग्यारी चौक व संतकबिर चौकाकडून अरुणा चौकाकडे सर्व प्रकारची वाहने घेवुन जाण्यास मनाई करण्यात येत आहे. अशोक चौक, अनमोल ट्रेडर्स, डावरे चौक, वटेश्वर भवन, मारुती मंदिर, रामोशी गेट, खासकर मस्जिद चौक, चमडे गल्ली चौक व ए.डी. कॅम्प चौकाकडुन पालखी विठोबा चौकाकडे सर्व प्रकारची वाहने घेऊन जाणेस मनाई करण्यात येत आहे.
वाहतूक बदलांबाबत अधिक माहितीसाठी नागरिकांनी वाहतूक मुख्य नियंत्रण कक्ष, पुणे येथे दूरध्वनी क्रमांक ०२०-२६६८५००० किंवा ०२०-२६६८४००० वर संपर्क साधावा, असे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेने केले आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.