आयुक्त तुकाराम मुंढे यांचा दणका; अन्न आणि औषध प्रशासनाकडून पुणे आणि नागपुरात मोठी कारवाई
xtreme2day
23-06-2026 21:27:58
92185768
आयुक्त तुकाराम मुंढे यांचा दणका; अन्न आणि औषध प्रशासनाकडून पुणे आणि नागपुरात मोठी कारवाई
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - अन्न आणि औषध प्रशासनाकडून पुणे आणि नागपुरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. नागपुरात तर बोगस डॉक्टरचा भंडाफोड करण्यात आला आहे. तर पुण्यात नामांकीत कॉस्मेटिक कंपनीचे बनावट उत्पादन आढळले आहे. महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा धडाका सुरुच आहे. विशेष म्हणजे नागपुरात एका बोगस डॉक्टरचा भंडाफोड झाला आहे. त्याच्याकडे 1 लाखांचे औषध जप्त करण्यात आले आहे. तर पुण्यात नामांकित Cosmetic बॅन्ड Cetaphil चे बनावट उत्पादन जप्त करण्यात आलं आहे. तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार, अधिकाऱ्यांनी केलेल्या या कामाचे कौतुक होत आहे. या दोन्ही कारवायांची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नागरिकांना उच्च गुणवत्तेची, सुरक्षित औषधे आणि सौंदर्यप्रसाधने मिळावीत यासाठी अन्न व औषध प्रशासन दक्षता बाळगत आहे. बेकायदेशीर औषध विक्री, बनावट औषधे आणि दिशाभूल करणाऱ्या औषधे व सौंदर्यप्रसाधने उत्पादनांविरुद्ध कठोर कारवाई केली जात आहे. त्याच अनुषंगाने अन्न-औषध प्रशासनाकडून नागपूर आणि पुणे येथे करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये गंभीर स्वरूपाचे उल्लंघन उघडकीस आले आहे.
22 जूनला नागपूर जिल्ह्यातील कोथुळना, ता. सावनेर, येथे बोगस डॉक्टरद्वारे संचालित प्राथमिक सामुदायिक इलेक्ट्रो होमिओपॅथिक उपचार केंद्रामध्ये विना परवाना औषध विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सदर केंद्राची तपासणी केली. तपासणीदरम्यान संबंधित ठिकाणी विना परवाना मोठ्या प्रमाणात अॅलोपॅथिक औषधसाठा आढळून आला. केंद्राचे मालक तथा बोगस डॉक्टर मोनिदीप सरकार यांच्याकडे औषधांच्या खरेदीची कागदपत्रे मागविण्यात आली असता त्यांनी कोणतीही खरेदी बिले सादर केली नाहीत. तसेच वैध औषध विक्री परवाना नसताना विक्रीसाठी औषधांची खरेदी, साठवणूक आणि विक्री केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम, 1940 मधील कलम 18(C), 18A तसेच नियम, 1945 मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याने 1,07,000 रुपये किमतीचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे. जप्त औषधांमध्ये प्रामुख्याने Antibiotics, Antifungal (Ketoconazole), Injections आणि Multivitamins यांचा समावेश आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे कार्यालयाने सौदर्यप्रसाधनांची तपासणी केली असता, Cetaphil या प्रसिद्ध ब्रँडचे Cetaphil Gentle Skin Cleanser (118 ml), बॅच क्रमांक B5NA1110, हे सौंदर्यप्रसाधने मूळ उत्पादक आणि विपणनकर्ता कंपन्यांनी केलेल्या पडताळणीत सदर उत्पादन त्यांच्या अधिकृत उत्पादन प्रक्रियेतून तयार झालेले नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे हे उत्पादन "स्प्युरियस कॉस्मेटिक" (बनावट सौंदर्यप्रसाधन) असल्याचे निश्चित करण्यात आले. या निष्कर्षांच्या आधारे दिनांक 22 जूनला पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील मे. ओम केमिस्ट या विक्रेत्याकडून सदर बनावट सौंदर्यप्रसाधनाचा एकूण 5,508 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, 1940 मधील तरतुदींनुसार करण्यात आली. तपासादरम्यान उपलब्ध झालेल्या पुराव्यांच्या आधारे पुण्याच्या चतुःशृंगी पोलीस स्टेशन येथे 22 FIR नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 318(4), 336 (3) आणि 340 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या दोन्ही कारवायांवर प्रतिक्रिया दिली आहे. "नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि विश्वासार्ह औषधे व सौंदर्यप्रसाधने उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. बनावट किंवा बेकायदेशीर उत्पादनांच्या व्यवहारात सहभागी असणाऱ्यांविरुद्ध कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करण्यात येईल", अशी प्रतिक्रिया तुकाराम मुंढे यांनी दिली.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.