xtreme2day 07-05-2026 21:32:23 215732762
तमिळनाडूच्या राजकारणात नवा ट्विस्ट; एकच आमदार असलेल्या भाजपनं ४७ आमदार असलेल्या अण्णाद्रमुकला टाकलं धर्मसंकटात! थलपती विजय होणार मुख्यमंत्री? बंगळुरू (विशेष प्रतिनिधी) - तमिळनाडूमध्ये भाजपचा केवळ १ आमदार आहे. त्यांची अण्णाद्रमुक पक्षाशी युती आहे. त्यांचे ४७ आमदार आहेत. एकच आमदार असलेल्या भाजपनं ४७ आमदार असलेल्या अण्णाद्रमुकला धर्मसंकटात टाकलं आहे. भाजप नेतृत्त्वाच्या तिरक्या चालीमुळे त्यांच्याच मित्रपक्षाची गोची झाली आहे. मित्रपक्ष धर्मसंकटात सापडला असून पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. विजयच्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी ११८ आमदारांचा पाठिंबा गरजेचा आहे. पक्षानं १०८ जागा जिंकल्या आहेत. पाच आमदार असलेल्या काँग्रेसनं त्यांना पाठिंबा दिला आहे. पण अद्यापही टीव्हीके बहुमतापासून दूर आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये भाजपनं अचानक एन्ट्री घेतली आहे. भाजपच्या तिरक्या चालीनं विजय यांचा फायदा होणार आहे. तमिळनाडूमध्ये विजय यांच्या टीव्हीके पक्षाची सत्ता यावी, अशी भाजपची इच्छा आहे. त्यामुळे भाजपनं आपला मित्रपक्ष अण्णाद्रमुकवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. अण्णाद्रमुक सत्तेत गेल्यास काँग्रेसचं महत्त्व आपोआप कमी होईल, असा भाजप नेतृत्त्वाचा होरा आहे. यामुळे विजय यांची चांदी झाली आहे. भाजपच्या तिरक्या चालीनं अण्णाद्रमुक संकटात सापडला आहे. पक्षाचे ४७ पैकी ३० आमदार सत्तेत जाण्याच्या मताचे आहेत. पण पक्षप्रमुख ई. पलानीस्वामी टीव्हीकेशी हातमिळवणी करण्याच्या विरोधात आहे. त्यामुळे अण्णाद्रमुकमध्ये दोन गट पडले आहेत. भाजपकडून येणारा दबाव पाहता ही दुफळी वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेसची कोंडी करण्यासाठी भाजपनं रचलेली चाल मित्रपक्षासाठी अडचणीची ठरत आहे. पक्षात फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अण्णाद्रमुकची शिवसेना होण्याची शक्यता आहे. २०२२ मध्ये भाजप सोबत जाण्यावरुन उद्धव ठाकरेंच्या पक्षाची दोन शकलं झाली होती. त्यावेळी ठाकरे आमदारांच्या मागणीच्या विरोधात ठाम राहिले आणि पक्ष फुटला. आता तीच वेळ अण्णाद्रमुकचे प्रमुख पलानीस्वामींवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसनं तमिळनाडूच्या सत्तेत असू नये यासाठी भाजपनं चाली रचण्यास सुरुवात केली आहे. भाजपकडे केवळ १ आमदार असल्यानं त्यांच्या पाठिंब्यानं टीव्हीकेला फारसा फायदा होणार नाही. त्यामुळेच भाजपनं मित्रपक्ष अण्णाद्रमुकवर टीव्हीके सोबत जाण्यासाठी दबाव टाकला आहे. भाजपच्या रणनीतीनं अण्णाद्रमुक अडचणीत सापडला असून फुटीची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्त्वानं आपल्या २५ आमदारांना पुद्दुचेरीतील एका रिसॉर्टमध्ये शिफ्ट केलं आहे.
sg2683