अवकाळी पावसाचे संकट; पुण्यासह राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस
xtreme2day
30-03-2026 21:15:23
15387312
अवकाळी पावसाचे संकट; पुण्यासह राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस
पुणे (विशेष प्रतिनिधी) - पुण्यासह राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच आता हवामान विभागाच्या अंदाजाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गारपीट आणि वादळी वाऱ्या सह पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यावर अवकाळी पावसाचे संकट ओढावले आहे. राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे.राज्यातील हवामानाबाबत बोलताना नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गारपीट आणि वादळी वाऱ्या सह पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मार्च महिन्यात महाराष्ट्राच्या अनेक भागात तापमान 40 पर्यंत पोहोचलं आहे, मात्र आता एक प्रणाली विकसित झाली असून त्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यांमध्ये अचानक हवामान बदलल्याने वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीला सुरुवात झाली आहे. विजांच्या कडकडाटासह आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढली आहे. विशेषतः जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध शिवनेरी हापूस आंबा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच भाजीपाला, कांदा, बटाटा आणि इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी जोर धरत आहे. पुण्याच्या भोर तालुक्यात वादळी वाऱ्यासह आणि गारांसह पावसाने हजेरी लावली. भोर तालुक्यातील वडगाव डाळ गावात जोरदार गारांचा पाऊस झाल्याने यात्रेनिमित्त ग्रामदैवताच्या मंदिरासमोर टाकलेला मंडप, गारांच्या वजनाने कोसळला. या अवकाळी पावसामुळे वडगाव डाळ गावातील 7 घरांचे नुकसान झाले आहे. अनेक घरांच्या छतावरील पत्रे, कौल उडाली आहेत. तसेच काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. शासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
31 मार्चपासून तीन ते चार दिवस पर्यंत हवामानात मोठा बदल दिसून येणार आहे. त्यामुळे विदर्भासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच तारखेपर्यंत अनेक भागात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि सामान्य नागरिकांनी हवामान विभाग वारंवार देत असलेल्या इशाऱ्याकडे लक्ष देण्याते आवाहन करण्यात आले आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. तीन ते चार दिवस विदर्भासह महाराष्ट्राच्या इतर भागातही अशाच प्रकारची परिस्थिती राहणार आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान 42 अंशांपर्यंत पोहोचले होते, मात्र आता पावसामुळे त्यात घट होणार आहे , त्यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळणार आहे. उद्या मराठवाडाच्या काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील आणि पश्चिम विदर्भातील जास्तीत जास्त जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात वादळी वारे वाहणार असून काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. ऑरेंज अलर्ट ज्या भागामध्ये आहे त्या भागात गारपीट मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते त्यामुळे सावधगिरी बाळगण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात दुपारी रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. या अवकाळी पावसामुळे कांदा, गहू, हरभरा, मका पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. धुळे शहरासह धुळे तालुक्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. कुसुंबा गावामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला, तसेच धुळे शहरात देखील पाऊस पडला. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामिण भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मिरगाव, पाथरे, वावी परिसरात विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे पिके आणि फळबांगाचे नुकसान झाले आहे. भोंदू अशोक खरातच्या काळ्या कृत्यामुळे मिरगाव सध्या चर्चेत आहे. याच भागात आज पाऊस कोसळला. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील नायगाव, जायगाव आणि देशवंडी परिसराला आज जोरदार वारा आणि गारांच्या पावसाने झोडपून काढले. अचानक आलेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला असून पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काढणीला आलेला आणि शेतात उभा असलेला कांदा गारांच्या माऱ्यामुळे मातीमोल झाला आहे. जोरदार वाऱ्यामुळे गव्हाचे पीक जमिनीला टेकले असून, गारांमुळे दाणे गळून पडले आहेत. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसाने अवघ्या काही मिनिटांत शेतांचे रूपांतर पांढऱ्या चादरीत केले. प्रशासनाने या भागाचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी नायगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली असून भारतीय हवामान विभाग ने पुढील 48 तासांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. या कालावधीत 50 ते 60 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्यासह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. 30 आणि 31 मार्चदरम्यान हवामान अस्थिर राहणार असून 1 एप्रिलला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे, तर 2 एप्रिलला परिस्थिती काहीशी सामान्य होण्याची शक्यता आहे. दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे दुपारनंतर ढगांची निर्मिती होऊन अवकाळी पावसाला पोषक वातावरण तयार होत असल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी, कापलेले पीक सुरक्षित ठिकाणी ठेवावे आणि वादळी वाऱ्यामुळे संभाव्य धोक्यापासून सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.