xtreme2day 31-01-2026 19:51:18 96752702
राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वोच्च पदाबरोबरच, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजीत पवार आरूढ! मुंबई (विशेष प्रतिनिधी) - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. या सोबतच राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वोच्च स्थानावर त्या आरुढ झाल्या आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत त्यांच्या नावाला सर्वांमध्ये पसंती देण्यात आली, सर्वाधिकार त्यांच्याकडे सोपविण्यात आले. आज दुपारी दोनच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक झाली. या बैठकीत मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. सुनेत्रा पवार यांना विधिमंडळ गटनेत्या करण्याचा प्रस्ताव एकमतानं मंजूर झाला. या प्रस्तावाला मंत्री छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिलं. विधिमंडळ पक्षाचे सर्व घटनात्मक अधिकार आमदारांनी एकमुखानं सुनेत्रा पवार यांच्याकडे दिले. यानंतर आज संध्याकाळी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.संध्याकाळी पाच वाजता लोकभवनात त्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्राने आजवर अनेक दिग्गज नेते पाहिले आहेत, परंतु राज्याच्या सर्वोच्च पदांपैकी एक असलेल्या उपमुख्यमंत्रीपदावर आजपर्यंत एकाही महिलेची नियुक्ती झालेली नाही. सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतल्यानंतर त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नोंदवल्या गेल्या आहेत. ही घटना केवळ राष्ट्रवादी काँग्रेससाठीच नव्हे, तर राज्याच्या राजकीय इतिहासातील महिला नेतृत्वाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड ठरू शकते. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच तिथे उपस्थित असलेल्या दादा समर्थकांनी अजित दादा अमर रहेच्या घोषणा दिल्या. त्यामुळे लोकभवनाच्या हॉलमधील वातावरण काहीसं भावुक झालं. सुनेत्रा पवारदेखील भावुक झालेल्या दिसल्या. सुनेत्रा पवार यांनी आजच त्यांच्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. २०२४ पासून त्या राज्यसभेच्या खासदार होत्या.उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांनी खासदारकी सोडली. सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत. २८ जानेवारीच्या सकाळी पावणे नऊच्या सुमारास अजित पवार यांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार यांच्या अस्थी काल नीरा नदीत विसर्जित करण्यात आल्या. यानंतर रात्रीच्या सुमारास सुनेत्रा पवार त्यांचे पुत्र जय यांच्या सोबत मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्याकडे अर्थ, राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि अल्पसंख्याक विभाग होते. यापैकी केवळ अर्थ व नियोजन विभाग वगळता इतर सर्व खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवली जातील. अर्थ मंत्रालयाची जबाबदारी आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळणार आहेत. आगामी 2026-27 चा राज्य अर्थसंकल्प अजित पवार यांनी अत्यंत बारकाईने तयार केला होता. त्यांचे हे व्हिजन पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः या अर्थसंकल्पाच्या कामावर देखरेख ठेवणार आहेत. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली. महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष म्हणून भाजप अजित पवार यांच्या कुटुंबीयांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.