राज्यात भाजपची तर मुंबईत ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला; नागरिकांना निकालाबद्दल मोठी उत्सुकता
xtreme2day
14-01-2026 23:28:47
182431048
राज्यात भाजपची तर मुंबईत ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला; नागरिकांना निकालाबद्दल मोठी उत्सुकता
राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीसाठी आज (15 जानेवारी) मतदान; सर्वच ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीसाठी उद्या (15 जानेवारी) मतदान पार पडणार आहे. मुंबई महानगर पालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहेच,मुंबईत चौरंगी निवडणूक होत आहे.या निकालातून राज्यातील साल २०२९ चे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.
या निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अशातच आता ही निवडणूक व्यवस्थित पार पडावी यासाठी सर्वच ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. जवळपास प्रत्येक शहरात पोलिसांच्या वतीने वेगवेगळ्या भागात रूट मार्च काढण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनची मदत घेतली जात आहे.
एकीकडे सत्ताधारी महायुती ( भाजपा–शिवसेना शिंदे गट–राष्ट्रवादी अजित पवार गट ) मैदानात आहेत. तर दुसरीकडे महाविकास बहुजन आघाडी ( काँग्रेस–शिवसेना उद्धव गट – राष्ट्रवादी शरद पवार गट ) असा विरोधी सामना असला तरी विविध मुंबई, ठाणे वगळता पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना या 14 महानगरपालिकांच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी स्वंतत्र लढा देत आहेत. याशिवाय मनसे, AIMIM, वंचित बहुजन आघाडी आणि अनेक स्थानिक आघाड्या आहेत. मुंबईत काँग्रेस आणि वंचित एकत्र लढत आहेत.
मुंबईतील निवडणूक प्रक्रियेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक सुरक्षा आराखडा राबवण्यात आला आहे. यानुसार उद्या मुंबईत 10 अतिरिक्त पोलीस आयुक्त, 33 पोलीस उपायुक्त (DCP) आणि 84 सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) तैनात असणार आहेत. त्यासोबतच 3000 हून अधिक पोलीस अधिकारी आणि 25000 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी/होमगार्ड यांचा फौजफाटाही सज्ज असणार आहे. तर 15 जानेवारी पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. शहरातील एकूण 3 हजार 4 मतदान केंद्रांपैकी 321 केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. या संवेदनशील केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा, पोलिसांचे अतिरिक्त मनुष्यबळ आणि कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी 16 हजार अधिकारी कर्मचारी आणि 5 हजार पोलिस तैनात असणार असणार आहेत.
पुणे महानगरपालिकेच्या रिक्त जागांसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान पार पडणार आहे. या कालावधीत शहरातील विविध मतदान केंद्रांवर नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. प्रशासनाकडून मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागण्याची शक्यता लक्षात घेता कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतदानाची ही प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी, तसेच मतदारांना केंद्रांपर्यंत पोहोचताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी पुणे शहराच्या विविध भागांतील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.