सहभागी प्रत्येक विद्यार्थी हा विजेताच ! राष्ट्रीय कला उत्सवाचा जल्लोषपूर्ण समारोप
xtreme2day
23-12-2025 21:44:31
2980427
सहभागी प्रत्येक विद्यार्थी हा विजेताच ! राष्ट्रीय कला उत्सवाचा जल्लोषपूर्ण समारोप
पुणे (विशेष प्रतिनिधी) - राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कलेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने पार पडलेला हा कला उत्सव येथे आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रोत्साहन देणारा ठरला आहे. काहींना या ठिकाणी पुरस्कार मिळाले आहेत परंतु यामध्ये सहभागी झालेला प्रत्येक विद्यार्थी आज जिंकलेला असून तो विजेताच आहे, अशा शब्दात भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. राष्ट्रीय कला उत्सव २०२५ च्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. कलेला प्राधान्य देणाऱ्या या उत्सवाच्या आयोजनासाठी त्यांनी महाराष्ट्र शासनाचे, एनसीईआरटी आणि यशदाचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहन द्यावे जेणेकरून विद्यार्थी आपल्या कल्पकतेने शिकतील असेही संजय कुमार म्हणाले.
यावेळी केंद्रीय शिक्षा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव श्री. आनंदराव पाटील, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री. रनजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त श्री. सचिन्द्र प्रताप सिंह, एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी, एससीईआरटीचे संचालक श्री. राहूल रेखावार, एनसीईआरटीच्या विभाग प्रमुख प्रा. ज्योत्स्ना तिवारी व शिक्षण विभागातील मान्यवर अधिकारी उपस्थित होते. एनसीईआरटी, नवी दिल्लीद्वारे या उत्सवाचे २०१५ पासून दरवर्षी आयोजन केले जाते.
एकमेकांच्या कला संस्कृतीची देवाण घेवाण करणे हाच खरा `एक भारत श्रेष्ठ भारत` आहे. आगामी काळात तुम्ही ही प्रतिभा जगभरात घेऊन जाल आणि यशस्वी व्हाल अशी अपेक्षा यावेळी केंद्रीय शिक्षा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव श्री. आनंदराव पाटील यांनी व्यक्त केली.
प्रत्येकासाठी हा एक वेगळा अनुभव होता. दिल्लीच्या बाहेर पहिल्यांदाच हा कलाउत्सव इतक्या सुंदर प्रकारे साकार झाला. कला उत्सव हे तुमच्यासाठी एक व्यासपीठ होते. तुम्ही जगभरात तुमची कला पोहचवाल याची मला खात्री आहे असा विश्वास शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री. रनजीतसिंह देओल यांनी व्यक्त केला.
कला आपल्या संस्कृतीचा प्राण आहे. अशा कार्यक्रमांना शासनाकडून देखील चांगले प्रोत्साहन मिळत आहे. ही आनंदाची बाब आहे. परंतू येथे आलेला विद्यार्थी कलाकार एनसीईआरटीसोबत आयुष्यभर जोडला गेला पाहिजे अशी अशी इच्छा एनसीईआरटीचे संचालक दिनेश प्रसाद सकलानी यांनी व्यक्त केली.
यावेळी संगीत गायन (समूह),संगीत वादन,तालवाद्य अशा विविष १२ कलाप्रकारामध्ये विद्यार्थ्यांना पारितोषके देण्यात आली.
कलेच्या माध्यमातून सर्व शैक्षणिक संस्था एकमेकांशी जोडल्या जाऊ शकतात हे या उत्सवाने दाखवून दिले आहे. अस म्हणत शर्वरी बॅनर्जी यांनी कला उत्सव २०२५ मध्ये पार पडलेल्या सादरीकरणाबाबतची माहिती दिली. यंदाचा कला उत्सव नेमका कसा झाला, त्यामध्ये काय काय विशेष होते याबाबतची माहिती देणारी चित्रफित देखील यावेळी सादर करण्यात आली.
राष्ट्रीय कला उत्सव २०२५ महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या समन्वयाने तसेच श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी यांच्या सहकार्याने दि. २० ते २३ डिसेंबर २०२५ या कालावधीत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये देशभरातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत कलेची देवाण घेवाण केली. या समारोप सोहळ्याचे सूत्रसंचालन स्वरूपा बने आणि प्रिया मोर यांनी केले तर आभार प्रियंवदा तिवारी यांनी मानले.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.