राज्यातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! वर्षानुवर्षांच्या तक्रारींवर सरकारची दखल; आता पंधराऐवजी चारच समित्या कार्यरत!
xtreme2day
21-11-2025 21:52:43
370329477
राज्यातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! वर्षानुवर्षांच्या तक्रारींवर सरकारची दखल; आता पंधराऐवजी चारच समित्या कार्यरत!
नाशिक (विशेष प्रतिनिधी) - शालेय शिक्षकांवरील कामाचा ताण कमी होणार आहे. आता पंधराऐवजी चारच समित्या कार्यरत राहतील. यामुळे शिक्षकांना अध्यापनासाठी अधिक वेळ मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आता देशभरातील शाळांमध्ये शिकवला जाईल. मराठी भाषा शिकवणे आणि 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत गाणे बंधनकारक झाले आहे. चौथी आणि सातवीसाठीही शिष्यवृत्ती परीक्षा सुरू होणार आहे. शैक्षणिक कामासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठी बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
ज्ञानदानाव्यतिरिक्त अवांतर कामांमध्ये शिक्षक भरडले जाऊन ज्ञानदानाच्या मुख्य कार्यावर परिणाम होतो. याबाबत वर्षानुवर्षे शिक्षकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे आता शालेय स्तरावरील पंधराऐवजी चार प्रमुख समित्याच कार्यरत राहतील. त्याद्वारे वाचणारा वेळ शिक्षकांना ज्ञानदानासाठी खर्च करता येईल, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी येथे केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विविध स्तरांवर चांगले शैक्षणिक काम करणाऱ्यांसाठी मंत्री भुसे यांनी प्रोत्साहनपर पारितोषिकांची घोषणा केली. त्यानुसार प्रथम क्रमांकासाठी पाच कोटी रुपये, द्वितीय क्रमांकासाठी तीन कोटी रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी दोन कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागातर्फे परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्यमंत्री नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, शिक्षणाधिकारी सरोज जगताप, शिक्षणाधिकारी डॉ. प्रशांत दिग्रसकर, भास्कर कनोज, शिवसेना (शिंदे गट) महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, संपर्कप्रमुख विलास शिंदे, राजू लवटे, भाऊलाल तांबडे आदी उपस्थित होते. मंत्री भुसे म्हणाले, की केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत झालेल्या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशपातळीवर सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांतून ज्ञात होण्यासाठी तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. राज्यात सर्व माध्यमांच्या शाळांमधून मराठी भाषा शिकविणे व राष्ट्रगीतानंतर 'गर्जा महाराष्ट्र माझा' हे राज्यगीत गायले जाणे बंधनकारक केले असल्याचेही मंत्री भुसे यांनी सांगितले.
शाळेत विद्यार्थांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी व आठवीसह चौथी व सातवीसाठीही सुरू करण्यात येणार असल्याचेही नमूद केले. जिल्हा परिषदेचे सीईओ पवार, पुरस्कारार्थी शिक्षक रमाकांत जगताप, वंदना भामरे आदींनीही मनोगत व्यक्त केले. महापालिकेचे पुरस्कार्थी शिक्षक भास्कर साळवे यांनी कवी वामनदादा कर्डक यांची कविता सादर केली. शिक्षणाधिकारी कनोज यांनी प्रास्ताविक केले.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.